चंद्रकिनार
मावळतीच्या चंद्रकिनारी
श्रावणाची चिंब पहाट
उतरुन आला शुक्र
निळी निळी पाऊलवाट
सावळ्या तरुंच्या छायेत
पसरला धुक्यांचा फुलोरा
थरथरणाऱ्या पानांतून सांडला
शुभ्र कवडसा लाजरा
संथ उभ्या जळांत
मधुर ओले चांदणे
निशब्द ही लहर
गाते मंजुळ गाणे
वेलींवरचा धुंद गारवा
घेवून पंखांच्या कुशीत
एक थेंब जागलेला
गंध हिरवा वेचित