माझी कविता

काळाचे गीत

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
9 May 2017 - 10:45 am

तूहि नव्हतीस, मीही नव्हतो
बघ काळ कसा बदलतो
तारे ते जे सदाच असती
आपल्या जागी नभात वरती
आज मोजण्या जागे कोणी
मनात अन् मोगरे माळूनि
फेऱ्या आपुल्या पाणवठ्याच्या
चर्चा साऱ्या गावकुसाच्या
कशी न कळली तू गेलेली
नियती अशी उलटलेली
पुन्हा भेटलीस का वळणावर?
घेऊन कुंकू परके, भांगावर
उभय उरातहि ते काही
आधीसारखे हलले नाही
        तूहि नव्हतीस मीही नव्हतो
        पुरते आपण अनोळखी होतो
        तू आहेस अन आज मीही
        समोरासमोर अगदी, तरीही
        त्याच्या हाती सर्व आहे

प्रेम कवितामाझी कविताकरुणकलाकविताप्रेमकाव्यसाहित्यिक

मग्न तळ्याकाठी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
7 May 2017 - 10:00 am

जा॑भळ्या टेकडी तळिचे
ते तळे खुणावुन हसले
अन पहाटफुटणी मधल्या
केशरात अलगद लपले

थरथरली तीरावरची
गवताची पाती ओली
वाऱ्याची फु॑कर येता
पाण्यावर झु॑बर फुटले

घनदाट शा॑तता तिथली
तोलून थिरकत्या प॑खी
पाखरू एक इवलेसे
क्षण एक लकेरुन गेले

नि:शब्द, तरल जे सारे
ते इथेच जन्मा आले
कोवळे ऊन टिपताना
झिरझिरित धुके शिरशिरले

चल पुन्हा तळ्याच्या काठी
चल पुन्हा, पुन्हा चल जाऊ
अस्वस्थ जगाचे मागे
कोलाहल सोडुनी सगळे.

- उदय

माझी कविताकविता

संध्याराणी

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
6 May 2017 - 2:26 pm

निष्पाप कळी तुटताना गहिवरली संध्याराणी
हलक्याच प्रकाशामध्ये डोळ्यांतुन झरले पाणी

पानांची सळसळ नाही थिजलेली अवघी सृष्टी
अन् उनाड वेडा वारा निमिषातच झाला कष्टी

थरथरल्या दुःखी फांद्या भ्रमरांची खंडीत गाणी
संध्येच्या ह्रदयामधली अगतिकता पानोपानी

अनिवार बुडाल्या शोके लतिकाही लेकुरवाळ्या
कोमेजुन झुकल्या खाली सुंदरशा उंच डहाळ्या

फुललेली हजार पुष्पे आक्रंदती मुक बिचारी
नटलेल्या वनराईच्या ही कशी अवकळा दारी

विणलेली अपार स्वप्ने संध्येने कळीच्याभवती
दुष्टांच्या पुरवित मोहा नियतीला पर्वा नव्हती

माझी कविताकविता