तूहि नव्हतीस, मीही नव्हतो
बघ काळ कसा बदलतो
तारे ते जे सदाच असती
आपल्या जागी नभात वरती
आज मोजण्या जागे कोणी
मनात अन् मोगरे माळूनि
फेऱ्या आपुल्या पाणवठ्याच्या
चर्चा साऱ्या गावकुसाच्या
कशी न कळली तू गेलेली
नियती अशी उलटलेली
पुन्हा भेटलीस का वळणावर?
घेऊन कुंकू परके, भांगावर
उभय उरातहि ते काही
आधीसारखे हलले नाही
तूहि नव्हतीस मीही नव्हतो
पुरते आपण अनोळखी होतो
तू आहेस अन आज मीही
समोरासमोर अगदी, तरीही
त्याच्या हाती सर्व आहे
बघ काळ बदलला आहे
आता यातून व्हावे काय?
आयुष्य प्रवाही, वाहत जाय
नसशील तू अन् मीही यापुढे
नसेल चिंता अगम्य अन् कोडे
फक्त काळ तो एक नव्याने
घडवील नाट्य कळाकळाने
फुलतील काही, काही तुटतील
त्यातलेच काही हे गुणगुणतील
गीत अधुऱ्या आपुल्या वचनांचे
निष्ठुर नियती अन् काळाचे!
- संदीप चांदणे
प्रतिक्रिया
11 May 2017 - 2:25 pm | प्रचेतस
सुंदर
11 May 2017 - 2:26 pm | पद्मावति
सुरेख!
11 May 2017 - 2:32 pm | अभ्या..
मस्त जमलीय सॅन्डीबाबा.
आवडले एकदम
14 May 2017 - 7:35 pm | समाधान राऊत
कशी न कळली तू गेलेली
नियती अशी उलटलेली
पुन्हा भेटलीस का वळणावर?
घेऊन कुंकू परके, भांगावर
उभय उरातहि ते काही
आधीसारखे हलले नाही
>>>>१९८०:९० स्टोरी टाईप वाटले हे वाचताना
प्रेमकाव्य आवडली आहे ....