कुणी म्हणाले दलित
भटक्या कुणी म्हणाले
हाडाचा कुणबी तो
ठणकावून सांगितले
बिनकाम रित्या डोक्यांना
विषय चघळाया नवा
खडा तुरट जातीचा
बेशर्म जिभांना हवा
स्वये श्रीरामप्रभू मातले
जनचर्चा त्या बाधली
जनसामान्य इथे तर सारे
नेत्यांच्या आधीच हवाली
देवळाबाहेरच्या रांगेतला
एकेक मोजला जाईल
हक्काचा मतदार, त्याची
जात पडताळणी होईल
लोकशाहीला नाही वर्ज्य
कुणीही, माणूस वा देव
तुझ्यावरच आले आता
मारूतीराया, तुझी जात समोर ठेव
<\p>
- संदीप चांदणे (२२/१२/२०१८)