पदार्पण (सिक्वल कथा)
एक हॉस्पिटल, बाहेर वर्दळ पण वॉर्डमधे गूढ भयाण शांतता, बाहेर नर्सची लगबग, औषधांचा कडूजहर वास, सातव्या मजल्यावरच्या स्पेशल वॉर्डमधे तो सलग वर्षभर बेडवर खिळून होता… सुरुवातीला काही विसीटर्स यायचे, फुलं बुके वैगरे उशाजवळ ठेवून जायचे, पण एक दोन महिन्यांतच ते थंडावलं. त्या रात्रीसुद्धा त्याच्या जवळचा मॉनिटर बीप बीप असं कोकलू लागलेलं, त्याच्या शरीरात कुठेतरी काहीतरी उलथापालथ होत असावी, आवाजामुळे दोन नर्स धावत आल्या. एक ड्युटीवरची सिनिअर व दुसरी नुकतीच दोन आठवड्यापूर्वी रुजू झालेली नवखी. नर्स जवळ येऊन इंजेक्शन देत म्हणाली, 'सालभरसे बेचारा कोमामे है '…….