अपरात्रीचे चित्रपट: द बॅण्ड्स विझिट
संध्याकाळची सात-साडेसातची वेळ. निघताना एकदा घरी फोन करावा काय असा विचार डोक्यात असताना मोबाइल वाजतो. अनोळखी नंबर. एकदा फोन टाळण्याची इच्छा होते, पण सवयीच्या नाइलाजाने फोन घेतो. समोरचा आवाज ओळखीचा नाही, पण निरोप घणघणत डोक्यात जातो. कुणीतरी अचानक गेलं आहे. बर्याच वर्षात संपर्कही नाही. पण आयुष्याच्या मैलोगणती विणलेल्या पटात उभे-आडवे धागे गेलेल्या माणसानी विणले आहेत. घरी फोन करतो. "उशीर होईल. झोपा. वाट बघू नका."