विस्कळखाईत कोसळताना
रेणुबंध होतील खिळखिळे
खळकन् फुटतील ठाशीव साचे
हादरून जातील स्तंभही
तर्काच्या भक्कम इमल्यांचे
गाभ्यातून जर्जर पृथ्वीच्या
लाव्हारस येईल उधाणून
अगणित जीवांचा कोलाहल
उरेल भवतालाला कोंदून
विस्कळखाईत कोसळताना
असेच काही घडेल? किंवा,
विज्ञानाचे ज्ञात नियम मग
वागतील वेगळेच तेव्हा?