||चाफा..||
तुझी आठवण
भुइचाफा जो
आत लपवता
कंद मृण्मयी
पहिली सर अन्
रुजून येई.
तुझी आठवण
हिरवा चाफा
मोहवणारा
खुणावणारा
दृष्टीला परि
नच दिसणारा.
तुझी आठवण
पिवळा चाफा
मधुगंधाने
दरवळणारा
सुकला तरिही
जाणवणारा.
तुझी आठवण
कवठी चाफा
तिन्हिसांजेला
हळू उमलतो
रात्रि सुगंधी
सोबत करतो.
तुझी आठवण
खुरचाफ्यासम
अपर्ण होउन
मूक फुलांनी
भरून अंगण
तुलाच अर्पण.