मुक्तक

#तू म्हणालास...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
18 May 2021 - 9:28 am

तू म्हणालास, पाऊस मला मुळी सुद्धा आवडत नाही.
चिखल ओला सगळीकडे, एक काम होत नाही.

ऐकून इकडे माझ्या डोळ्यात काळे ढग जमून आले.
बरसणार होतेच पण मी निग्रहाने घालवून दिले.

पाऊस म्हणजे वेडेपणा, खूप मस्ती तुझ्या कुशीत,
पाऊस म्हणजे कटींग चहा अर्धा कप अर्धा बशीत.

पाऊस म्हणजे चिंब मी, थोडी धीट थोडी भित्री.
पाऊस म्हणजे आशिकीच्या पोस्टरवरची मोठ्ठी छत्री

पण तुझ्यासारखं असं कुणी पावसावरती रुसतं का?
भिजणं बिजणं सोडून कोरडं पावसात घरी बसतं का?

भावकविताकवितामुक्तक

मन आणि मांस

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
15 May 2021 - 10:46 pm

मनाला मांस असते का? आपल्या सगळ्याच अवयवांत मग अगदी मेंदूपासून ते पायाच्या करंगळी पर्यंत मांस असते. आणि मन, ते कशाचे बनलेले असावे? कुठे पडला, ठेच लागली, वार झाला की माणूस जखमी होतो. थोडक्यात आपल्या मांसाला धक्का लागतो. कधी एखादा लचकाही तुटतो. पुढे जखम भरते म्हणजे गमावलेले किंवा बिघडलेले मांस पूर्ववत होते. जखमा मनालाही होतात असं ऐकलंय मी. अनुभवलं सुद्धा! मग तेव्हा कोणत्या मांसाला धक्का लागतो आणि मन जखमी होते? जखमी व्हायचं असेल तर मांस असणे आवश्यक आहे. म्हणजेच मनाला मांस आहे. आपल्यात नाही एवढेच. आपल्या प्रियजनांच्या जखमांनी आपल्या ही मनाला वेदना का व्हाव्यात?

वाङ्मयमुक्तकप्रकटनविचार

तर...

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
11 May 2021 - 10:04 pm

मळभ हटले की सूर्य सापडतोच असं नाही. तोवर रात्रही झालेली असू शकते. प्रकाश वाट्याला आला की तो मनाप्रमाणे नसतो उधळायचा. आपलं मन म्हणजे खोल गुहा- उभी की आडवी ते नाही माहीत. कदाचित दोन्हींच मिश्रण असावं. त्यामुळेच तर कधी खूप खोलात गेल्यासारखं वाटतं तर कधी खूप मागे. कुठून आणायचा मग इतका सारा प्रकाश, स्वत:चं मन पादाक्रांत करायला? बरं गुहेचं हे भारी असतं नाही- बाहेरून कितीही आग लागू देत, आतला अंधार अचल, अविरत आणि जवळपास अजिंक्य! म्हणून सूर्य माथ्यावर असला की डोक्यात अंधारात चाचपडायचं बळ आणि अनुभव दोन्ही गोळा करावा. ज्यांनी वचन दिलं नाही त्यांना गृहीत का धरावं? उद्या पृथ्वी फिरलीच नाही तर...

मुक्तकप्रकटनविचार

आज जरी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
11 May 2021 - 11:23 am

चंद्रधगीने रातराणी
उत्फुल्लपणे-
परिमळेल तेव्हा

व्याधविद्ध मृगशीर्ष जरासे
मावळतीवर-
ढळेल तेव्हा

केतकीत नागीण निळी
टाकून कात-
सळसळेल तेव्हा

नि:शब्दांची धून खोलवर
रुजून ओठी-
रुळेल तेव्हा

वास्तवतळिचे अस्फुट अद्भुत
कणाकणाने-
कळेल तेव्हा...

....वीज शिरी
कोसळली तरीही,
सावरेन मी

अद्भुत अवघे विरून, वास्तव
क्षणोक्षणी मग-
छळेल तेव्हा...

....आज जरी
निष्पर्ण तरी
बहरेन उद्या मी

कविता माझीकवितामुक्तक

कुंभार्ली टॉप - एक मस्त धमाल प्रवास (ईशानच्या शब्दात)

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
5 May 2021 - 4:07 pm

माझा मुलगा ईशान (वय वर्षे १०)आणि भाची जुईली(वय वर्षे १२) यांनी कुंभार्ली घाट सायकलवरून सर केला . त्याचे वर्णन ईशानने लिहले आहे, तेच येथे देत आहे

कुंभार्ली टॉप - एक मस्त धमाल प्रवास

मुक्तकअनुभव

तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
5 May 2021 - 1:15 pm

तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति

कोव्हीड काळातील तीन अनुभव

१) आमचे एक कौटुंबिक परिवार( family friend) मित्र. नवरा आणि बायको उच्च शिक्षित आणि दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर. माझी पत्नी त्यांची फॅमिली डॉक्टर. आमची मैत्री बऱ्याच वर्षांपासून १३-१४ पेक्षा जास्त.

एक दिवस हि मैत्रीण माझ्या पत्नी कडे आली आणि सांगू लागली, आमच्या बाबांचे इच्छापत्र (will) केलेले आहे. त्यावर त्यांनी हे इच्छापत्र (will) मानसिक सुस्थितीत असताना केलेले आहे अशी डॉक्टर म्हणून तुझी सही पाहिजे.

मुक्तकप्रकटन

समास

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
3 May 2021 - 5:13 pm

समासातल्या रेषेला सुद्धा ओढ असते शाईची. तिथल्या मोकळ्या जागेला वाटतं आपल्यावरही उमटावी अक्षरांची काळी-निळी नक्षी. ती वाचतांना फिरावा कुणाचातरी हात आपल्यावरून आणि स्पर्श व्हावा थेट वाचकाच्या मनाला. अनुभवावीत ती भावनांची वादळे नि:शब्द होवून. पण समासाला कुणी सांगावं, तुझं रितेपणच कागदाच्या तुकड्याला त्या शब्दमुद्रा झेलण्यास योग्य बनवतं. ओळींत न सापडणारे अर्थ त्या समासाच्या पटलावरच लिहिले जातील. काही लिहायचे राहून गेले तर लेखकाला समासाचा किती आधार असतो. स्वतः सोबत घालवलेले एकांतातले क्षण म्हणजे आपल्या आयुष्याचा समास! जे राहून गेलं ते भरणारा मोकळा समास!

धोरणमांडणीमुक्तक

सवय

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
30 Apr 2021 - 8:43 pm

साखरझोपेच्या डोळेजड सीमेवरून
हाकारणार्‍या अनघड कल्पनांची
वास्तवाच्या धगीत
कापूरवाफ होताना बघण्याची
आता सवय करून घेतोय

मास्कावगुंठित श्वासात
अवकाळी पावसाचा विषण्ण मृद्गंध
ऊरफोड भरून
पाऊसगाणे गाण्याची
आता सवय करून घेतोय

हताशेच्या महासाथीची "न"वी लाट
सकारात्मक विचारांच्या प्लासिबोने
नेस्तनाबूत होईलच
हे स्वत:ला वारंवार पटविण्याची
आता सवय करून घेतोय

मुक्त कविताकवितामुक्तक

ढग

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
27 Apr 2021 - 7:06 pm

कुणाच्या आयुष्याचा दोर कधी तुटेल आणि कुणावर नशीब कधी मेहरबान होईल या गोष्टी सदैव अंधाराच्या मुक्कामाप्रमाणे मानवाला अज्ञातच राहतील. परंतु असे आहे म्हणून जेवढे हाती उरते त्या आयुष्यालाच बेभरवशाचे करण्यात काय अर्थ आहे? सध्या अविश्वास आणि अस्वस्थतेने आपल्याला अशी घट्ट मिठी मारलीये की प्रत्येक श्वासावर आणि कृतीवर त्यांचा प्रभाव जाणवतो आहे. आनंद, समाधान, हास्य या नैसर्गिक भावनांचा प्रसवदर कमालीचा खालावला आहे. आपल्या मनातली स्वतंत्र विचारांची अमानुष भ्रूणहत्या कळसाला पोहोचली आहे. आपल्याला सगळं काही स्वतःचं आणि स्वतःकरिता हवं आहे केवळ विचार सोडून.

मांडणीमुक्तकसाहित्यिकसमाजप्रकटनविचारलेख

कवितेनंतर

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
23 Apr 2021 - 8:37 pm

कवितेनंतर बाकी उरल्या
शब्दांचे विभ्रम मी बघतो
ऐकून आहे ठिणगीचाही
बघता बघता वणवा होतो

वळीव कोसळता वणव्यावर
राखेची रांगोळी होते
अगणित थेंबांतिल थोड्याश्या
थेंबांची पागोळी होते

सोसून पागोळ्यांचा मारा,
तरारून अंकुर जो फुटतो
वृक्ष होऊनी त्याचा, अनघड
शब्दांनी तो डवरून जातो

पाठशिवणीचा नाद लावुनी
शब्द बीज वळचणीत रुजते
कधीतरी त्यातून अचानक
ओळ नवी कवितेची फुलते

- पण ओळीच्या पैलतिरावर
अनाघ्रातसे काही उरते

कविता माझीकवितामुक्तक