ढग

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
27 Apr 2021 - 7:06 pm

कुणाच्या आयुष्याचा दोर कधी तुटेल आणि कुणावर नशीब कधी मेहरबान होईल या गोष्टी सदैव अंधाराच्या मुक्कामाप्रमाणे मानवाला अज्ञातच राहतील. परंतु असे आहे म्हणून जेवढे हाती उरते त्या आयुष्यालाच बेभरवशाचे करण्यात काय अर्थ आहे? सध्या अविश्वास आणि अस्वस्थतेने आपल्याला अशी घट्ट मिठी मारलीये की प्रत्येक श्वासावर आणि कृतीवर त्यांचा प्रभाव जाणवतो आहे. आनंद, समाधान, हास्य या नैसर्गिक भावनांचा प्रसवदर कमालीचा खालावला आहे. आपल्या मनातली स्वतंत्र विचारांची अमानुष भ्रूणहत्या कळसाला पोहोचली आहे. आपल्याला सगळं काही स्वतःचं आणि स्वतःकरिता हवं आहे केवळ विचार सोडून. समाजाचे अनौरस विचार आपल्या माणूसपणाचं वस्त्रहरण करून आपल्यातलं आदिम श्वापद उघडं करत आहेत हे आपल्या लक्षातही येईना इतके आपण या प्रक्रियेला सरावलो आहोत. विचार हे व्यक्तीचे कर्तव्य आहे आणि कार्य हे समाजाचे. ही मांडणी उलट केली म्हणजे आजवरच्या सगळ्या उत्क्रांतीची वजाबाकी होते.

बालपणीची स्वप्ने आता कुणालाच पूर्ण करायची नाहीत. आणि आज नविन स्वप्ने पाहण्यासाठी झोपण्याची आवश्यकता उरली नाही. कारण वास्तवातले जिणे हेच एक स्वप्नरंजन झाले आहे. सगळा मानवच जणू निद्रितावस्थेत गेलाय. संपत्तीची मालकी मोजायची ठरली तर शिवाजी महाराजांपेक्षा शेकडो पटीने संपत्ती असणारी माणसे याच मातीत उपजली पण त्यातल्या एकालाही जनतेने "श्रीमंत श्री.." असे गौरविले नाही. कारण शिवरायांच्या विचारांची श्रीमंती एवढी प्रगल्भ होती की पुढल्या कैक पिढ्यांचे दारिद्र्य या विचाराने गळून पडले. अशी लोकोत्तर व्यक्तिमत्वे आपल्याला एक चिरंतन स्फूर्ती देतात- विचार करण्याची! माझा 'मी' 'माझ्या'पुरता मर्यादित नाही ही जाणिव म्हणजे 'स्व'ची ओळख. आपण सगळे म्हणजे स्वतंत्र ढग. विचारांनी घडवायचं, काळाने वाहून न्यायचं आणि कर्माने बरसायचं. सगळ्या समुद्राचे ढग बनत नाहीत आणि सगळ्याच मनुष्यप्राण्यांचा 'माणूस' होत नाही. सागराच्या खाऱ्या पाण्यासारखं जागेवर पडून राहायचं की सूर्याचे चटके सोसून आकाशाची सैर करायची याचं प्रत्येकाचं स्वातंत्र्य अबाधित आहे. सागराचा तळ आणि विचारशून्य मन दोन्ही एकाच ठिकाणी असतात- गडद काळ्याकुट्ट काळोखात.

मांडणीमुक्तकसाहित्यिकसमाजप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

28 Apr 2021 - 12:49 am | मुक्त विहारि

सगळ्याच मनुष्यप्राण्यांचा 'माणूस' होत नाही.

हे आवडले....