स्मरण चांदणे 3
गावात एक साधुपुरुष ,ब्रम्हाजीबुवां (उच्चारी बरमजीबाबा)होऊन गेले.त्यांचे मंदिर गावाचे पूर्वेस आहे.त्यांच्यावर लोकांची फार
श्रध्दा.आजाराना कंटाळलेले लोक ब्रम्हाजीबुवाला साकडे घालतात.
देवळाचे आवारात,राहून सेवा करतात.वेगवेगळ्या कारणांसाठी नवस बोलतात.'बाळगोपाळ घालणे',म्हणजे लहान मुलांना 'वरण भाकरीचे'जेवण देणे,त्यापैकी एक.
जेवणात कधी कधी शिरा,नुक्ती पणअसे.मुले आपापल्या घरून ताट वाटी तांब्या घेऊन येत.यजमानाचे घरासमोर रस्त्यावर पंगती उठत.
'बरमजीब्वाच्या विशिष्ट ताला सूरातील,भक्ती रचना (आस्तुक्या) मौखीक स्वरुपात आहेत.यजमानाचे घरी रात्री भजन होई.म्हणजे अजूनही होत असेल .टाळ मृदंगाच्या तालात 'आस्तुक्या ' गायल्या जातात.
चैत्र महिन्यात ब्रम्हाजीबुवाच्या पुण्यतिथी असते (भंडारा).त्यावेळी ब्रम्हाजीबुवाचे दर्शनासाठी माहेरवाशिनी गावी येतात.मंदिरासमोर जत्रा भरते.गावात आणखी एक जत्रा भरते.खंडोबाची.ती
तीला सटीची जत्रा म्हणतात.गावाचे पश्चिमेस,तळ्याचे माळावर खंडोबाचे छोटे देउळ आहे.तिथे मार्गशिर्ष महिन्यात ही जत्रा असते.
दोन्ही जत्रेत दिसणारे चित्र साधारणतः सारखेच.
देवळां समोरच्या मोकळ्या पटांगणात दोन्ही बाजूनी दुकानासाठी जागा आखल्या जात.त्या जागी गावचे,परगावचे व्यापारी कापडी तंबूत(पाल) आपापली दुकाने थाटून बसतात.कपडे,धान्य,भांडी,बांगड्या खोटे दागिने,
खेळणी, प्लॅस्टिकच्या वस्तू,मिठाया,चुरमुरे,फुटाणे, बत्तासे, रेवड्याची दुकाने.बुढ्ढी के बाल,आईसफ्रूट,उसाच्या रसाचे गाडे,बासरी पिपाण्या,फुगे,चष्मे शिट्टया विकणारे फेरीवाले,पोपटा करवी ज्योतिष सांगणारे, डोंबारी, रहाटपाळणे.गर्दीचामाहोलअसे. स्त्रिया पुरुष,पोरेसोरे.गर्दीच गर्दी.आवाजच आवाज.खरेदी,खाणेपिणे नुसते फिरणे.वेगवेगळ्या दुकानातील घासाघीस,फुगे फुटण्याचे,बासरी, पिपाण्यांचे बेसूर आवाज,मुलांचे रडणे,आयांचे खेकसणे.फेरीवाल्यांचे ओरडणे.एऽऽऽऽऽ आईस फ्रोऽऽऽऽऽट.एऽऽऽऽऽ ऽ ऽ बुडीके बाऽऽऽऽऽल.,हर माल चार आनाऽऽ वगैरे वगैरे. मधेच एखादे मोकार जनावर जत्रेच्या गर्दीत घुसून धान्य,मिठाईच्या टोपल्यात तोंड घाली.त्याला हुसकवताना,
चूकवताना लोकांची जी तारांबळ उडे,पळापळ होई तीचे वर्णन करणे अशक्य.कुणाचा मेळ कुणाला नसे.
ब्रम्हाजीबुवाचे देवळाचे गच्चीवरून नवस म्हणून मुलांना खाली फेकले जाई.खाली चार माणसे चादरीत त्यांना झेलत. रडणारी किंचाळणारी,चिल्ली पिल्ली,आई बापाला गच्च बिलगून बसत.पण त्यांच्यासाठी नवस महत्वाचा असे.तो प्रकार पाहायची हिम्मत होत नसे.
गाड्या ओढणे हा उत्सवाचाच भाग .चारपाच गाड्या एकमेकाला जोडल्या जात.त्यात लहानमुले बसत.बैलां ऐवजी,'अंगात आलेला',म्हणजे संचार झालेला एक माणूस भोवतालच्या गर्दीतून बैलगाड्य ओढत नेई.लोक मागे पळत.काही जण ओढणा-याला साथ देत.एरवी साधा सामान्य दिसणा-या माणसात एवढी शक्ती कुठून येई हे कोडेच वाटे.
दोन्ही जत्रांच्या दुसरे दिवशी,कुस्त्यांची दंगल होई.आजूबाजूच्या गावातले छोटे मोठे पैलवानही येत.पाच दहा रुपयापासून हजारा पर्यंत बक्षिसे असत.कुस्त्यांच्या वेळी हलगी सुरूअसे.गावाला कुस्तीची परंपरा नाही.कुस्तीचे आखाडे ही नाहीत.पण हनुमानभक्त मात्र आहेत.
गावची 'वेस' फार पूर्वी पडलेली. पुन्हा कुणी ती बांधण्याचे फंदात पडले नाही.आता फक्त काही अवशेष शेष.वेशीतून आत गेल्यावर मुख्य रस्त्यालगत उत्तरेस पुर्वाभिमूखी हनुमान मंदिर.दर शनिवारी व अमावस्येला देवळात,संध्याकाळी दिवा लावणे व नारळ वाढवण्याची प्रथाअनेक घरी.हनुमानजयंतीला सकाळीच,पुरणपोळीचानैवेद्य ही अनेक घरातून जाई.रात्री भजन होई.पालखी निघे.या मंदिरासमोरच मुख्य रस्त्यावर छोटेसे,राममंदिर आहे. रामजन्मोत्सव वगळता एरवी मुद्दाम होऊन कुणी तिथे जात नसे. राममंदिरापासून काही अंतरावरच गणपती मंदिर.हे ही छोटेच.भाविकांना रस्त्याने जाता येताच नमस्कार करून पुण्य जोडता येई.मंदिरां समोरच्या छोट्या ओवर्या,म्हणजे रिकाम्या वेळी रिकाम्या मंडळीसाठी गप्पा मारायची व झोपायची जागा.रिकामा वेळ हाताशी असलेली तिथे मात्र रिकामी मंडळी भरपूर.त्यामुळे मंदिराचा गाभारा सहसा रिकामा नसे.
गावाचे टोकाला असलेल्या महादेव गल्लीमधे सुबक दगडी महादेव मंदिर आहे. हेही छोटेच.बहुतेक महादेव मंदीराप्रमाणे इथला गाभारा पण कोंदट आणि काळोखात बुडालेला.त्यामुळे रिकाम्या लोकांसाठी उपयोगी नाही.श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीला भक्तांना आठवण येते. एरवी शांत शांत. अर्थात सर्व देवळात नीत्य नेमाने जाऊन पुजा अर्चा करणारे काही भाविक गावात आहेत.श्रावण महिन्यात रोज चारपाच मैल अंतरावर असलेल्या गोदावरीचे पाणी भोपळ्यात भरून आणायचे व गावातील सर्व मंदिरातील देवांना त्या पाण्याचा अभिषेक करायचे व्रत काही जण करीत.
पाण्याने महादेवाचा गाभारा भरला म्हणजे पाऊस पडेल या श्रध्देने गावकरी मंडळी एकत्र जाऊन गोदेचे पाणी आणीत.दुष्काळ गावाला नवा नाही.पावसाळ्यापेक्षाही नेमाने येणारा.त्यामुळे ही वारी वारंवार होत असे.
नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिया
17 Sep 2021 - 5:04 pm | रंगीला रतन
छान. आमच्या इथे दर महाशिवरात्रीला असे वातावरण असायचे.
20 Sep 2021 - 6:05 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. सगळीकडे थोड्याफार प्रमाणात तेच असते. एकत्व...
20 Sep 2021 - 10:30 pm | सिरुसेरि
सुरेख वर्णन .
21 Sep 2021 - 11:29 am | नीलकंठ देशमुख
धन्यवाद