अद्भुताचे निळे पाणी
मराठीच्या अंगणात
अठ्ठेचाळीस स्तंभांचा
स्वर-व्यंजनी महाल
माझ्या माय कवितेचा
नभापार पोचतसे
त्याची बेलाग ही उंची
रेलचेल महालात
जे न देखे रवि त्याची
महालात जाण्यासाठी
जिना जपल्या शब्दांचा
आणि उतरण्या साठी
सोपान हा गहनाचा
चुनेगच्ची सौधावर
नवरस पुष्करणी
पितो मन:पूत तेथे
अद्भुताचे निळे पाणी
परवलीची एकच
खूण इथे चालतसे
एका हृदयीचे दुज्या
सोपवावे लागे पिसे