एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग 3 (400 किमी)

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
28 Dec 2021 - 3:10 pm

एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग 3 (400 किमी)
300 ची BRM तर पूर्ण झाली, आता 400. लगेच 4 डिसेंबरला मुंबई क्लबची मुलुंड - चिखली - मुलुंड अशी BRM होती. दापोलीच्या खानविलकर आणि पालवणकर ने नाव दाखलही केलं. पण 300 च्या BRM ने माझी खूपच वाईट अवस्था केली होती. हात आणि बोट दुखत होती. करंगळी आणि अनामिका बधिर अवस्थेत होत्या. खांदे दुखत होते. मी जराही उत्सुक नव्हते.श्रीनिवास चा देखील 300 च्या वेळेस पाय दुखायला लागला होता.IT बँड दुखावला अस काहीसं कळलं. अशा वेळी आठवडा पण पूर्ण विश्रांती नसताना 400 ची रिस्क घ्यायची का? तर उत्तर नाही असाच आलं. आम्ही मनोज दादाला दापोलिकरांबरोबर जायला सांगत होतो. पण जायचं तर एकत्र यावर तो ठाम होता. लगेच 11 डिसेंबर ला NMKC क्लब ची वाशी - वलसाड - वाशी लागली होती. मग आम्ही ही 4 ची सोडून विश्रांती घ्यायचं ठरवलं आणि 11 डिसेंबर साठी रजिस्टर केलं. मधल्या वेळेत हाताला त्रास होऊ नये, बधिर होऊ नयेत, IT बँड साठीचे व्यायाम असे वेगवेगळे व्हिडीओ, माहिती बघितली. त्याप्रमाणे व्यायामात बदल केला. छोट्या छोट्या टिप्स पण किती उपयोगात येतात ते समजायला लागलं. मध्यंतरी सायकल चालवणे प्रॅक्टिस चालूच होती.

आणि चिपळूणला बऱ्याच वर्षांनंतर 6 डिसेंबर रोजी प्रशांत दामलेच नाटक लागलं.रात्री 10 च नाटक आणि एकच तिकीट मिळालं म्हणून मी उत्साहाने 9 वाजता आमच्या घरून निघाले. साधारण 1 किमी अलीकडे माझ्या स्कुटर समोर कुत्रं आडवं आलं आणि मी स्कुटर सकट रस्त्यावर आडवी झाले.आजूबाजूची लोक जमा झाली.मी पूर्ण शुद्धीत होते आणि पाहिली भावना काय आली तर शनिवारी माझी BRM कशी होणार? किती लागेल? काय होईल? जमेल का आता? मी अक्षरशः आडवी झालेली उठून सुद्धा बसले नव्हते तो माझ्या मनात हे सगळे विचार येऊन गेले. मी स्वतःच उठले. लोकांनी गाडी उचलून कडेला लावली, पाणी प्यायला दिल. विचारपूस केली. सुदैवाने हात पाय धड होते. गाडी सुरू होत होती. गाडीला पोचा आला होता, हेल्मेट ला स्क्रॅच आले होते. तशीच गाडी घराकडे वळवून घरी पोचले. श्रीनिवास सोडायला यायला तयार होता पण मीच नको म्हटलं त्याचा आता पश्चात्ताप होत होता.घरी येऊन बघितलं तर पावलाला दोन जखमा आणि गुडघ्याला एक मोठी जखम आणि थोडं खरचटलं होत. काहीही मोडलं नव्हतं हे नशीब. सकाळी उठून डॉक्टरकडे गेले. त्याला म्हटलं शनिवारी स्पर्धा आहे, जखम सुखली पाहिजे. हसून त्याने गोळ्या आणि मलम दिल लावायला. न चुकता गोळ्या घेतल्या. सगळीकडे जाताना फक्त स्लीपर वापरत होते.मलाच कसतरी वाटत होतं. पण सॅंडल, बूट याने जखम घासली गेली असती त्यामुळे काळजी घेणं गरजेचं होतं.

यावेळी परत राहायची व्यवस्था पहायची होती. आम्ही चौकशा करत होतो. मनोज दादा ने ओळखीने बेलापूरला शासकीय विश्रांतीगृहात सोय केली. 2 दिवस आधी ठाण्यात एक लग्न असल्याने आम्ही BRM च्या आधीच 2 दिवस ठाण्यात येऊन पोहोचलो. लग्न आटपून बेलापूरला गेलो. नेहमीप्रमाणे तयारी करून झोपलो. सकाळी आवरून गाड्या घेऊन वाशी स्टेशन जवळ स्टार्ट पॉईंटला पोहोचलो. सायकली जोडून गाड्या मागच्या वेळेसारख्याच स्टेशनजवळच्या पे अँड पार्क मध्ये ठेवल्या. बाईक चेक होऊन ब्रेव्हेट कार्ड घेऊन आम्ही सज्ज झालो. मागच्या राईड मुळे थोड्या ओळखी झाल्या होत्या. सगळ्या आवश्यक सूचना देऊन झाल्यावर बरोबर 6 ला राईड सुरू झाली. मुंबईचे रस्ते कधीतरी गोंधळात टाकणारे असतात. त्यामुळे आम्ही आपले सगळे जात आहेत त्यांच्या बरोबरीने जात होतो. ठाण्यात येऊन घोडबंदरचा चढ चढायला लागल्यावर थोडं ट्राफिक लागलं. थोडेफार मागेपुढे असणारे सगळे आता ग्रुप मध्ये विखुरले गेले.

एके ठिकाणी चहा पिऊन निघालो. साधारण 60 किमी ला नाश्ता करायला थांबलो. मस्त शॉर्ट ब्रेक झाला आणि फ्रेश होऊन पुढे निघालो. इथे बऱ्यापैकी रस्ता सपाट आहे. घोडबंदर आणि चारोटी एवढेच मोठे असे चढ आहेत. बाकी सगळे फ्लायओव्हर आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी स्पीड ने जात होतो. 11 नंतर ऊन चढायला लागलं आणि चारोटी चा चढ आला. दमायला होतंय अस वाटेपर्यंत चढच्या टोकावर पोहोचलो. मग फुल्ल स्पीड ने उतार उतरलो. 130 किमी ला चेक पॉईंट ला जेवायची सोय होती. सपाट रस्ता असल्याने चांगल्या स्पीड ने जात होतो. काही काही मोठे फ्लायओव्हर जरा त्रासदायक वाटत होते. पण त्यांचा तेवढाच मोठा उतार मस्त स्पीड देत होता. अगदी ठरल्या वेळेत आम्ही चेक पॉईंट ला पोहोचलो. मागच्या वेळेसारखीच सिद्धार्थ ने चांगली व्यवस्था केली होती. हॉटेल मध्ये वेगळी रूम घेऊन व्हेज नॉन व्हेज जेवण ठेवलेलं. तासभर वेळ गेला तिथे आमचा पण उन्हाचा एक तास कमी झाला त्यामुळे जरा बरं वाटलं. जेवून परत सायकल चालवायला सुरवात केली. 130 किमी झालेच होते, 200 च्या पुढच्या चेक पॉईंट साठी फक्त 70 बाकी होते.

मागच्या वेळच्या चुका लक्षात घेऊन यावेळी त्याप्रमाणे हातांचे छोटे छोटे प्रकार सायकल वर करत होते. त्यामुळे बोटं किंवा पंजे अजून तरी दुखत नव्हते. श्रीनिवासचा सुद्धा पाय अजिबात दुखत नव्हता. नेहमीप्रमाणे आम्हाला जे ठिकाण हवं त्याचा बोर्ड कुठे दिसत नव्हता. Strava ने मागच्या दोन्ही वेळेला गोंधळ केला होता त्यामुळे मी strava लावत नव्हते.मग सारखं दोघांना विचारायचं किती अंतर उरलंय ते. शेवटी वलसाड चा बोर्ड दिसला. वलसाड च्या आधीच फ्लायओव्हर न घेता खालच्या रस्त्याने शहरात गेलो. साईलीला मॉल ला चेक पॉईंट होता. 4 वाजून 30 मिनिटांनी आम्ही मॉल ला पोहोचलो. अपेक्षेपेक्षा खूपच लवकर पोहोचलो होतो. वलसाड सायकलिंग ग्रुप तर्फे स्वागत झालं आणि त्याच्याकडून बनाना मिल्कशेक दिलं गेलं. उन्हातान्हातून आल्यावर अस थंड एनर्जी ड्रिंक मिळाल्यासारख सुख नाही. इथे ड्रॉप बॅग मिळाली. कपडे बदलून घेतले. आणि परत वळलो. आलो त्याच रस्त्याने परत जायचं होतं. भराभर पॅडल मारीत निघालो. 7.30 ला एका हॉटेल मध्ये दाल खिचडी खाऊन पुढे निघालो. पाण्याचा अखंड मारा चालू होता. रात्री थंड वाटत होतं पण सायकल चालवत असल्याने घाम येत होता. एकूण दोन्हीचा मेळ होऊन शांत वाटत होत. घाम येऊन दमायला होत नव्हतं तर अखंड पाय फिरत असल्याने थंडी वाजत नव्हती. पण आता स्पीड मात्र आला होता.

या रस्त्यावर एकही खड्डा नाही. फक्त अखंड धावणारे ट्रक. ट्रॅफिकला जरा उसंत नाही. एकीकडे आपल्याला कायम सोबत राहते तर एकीकडे कायम अलर्ट राहायला लागत. ट्रॅफिक च्या रस्त्याचे फायदे नि तोटे दोन्ही. पूर्ण वेळ शरीर ऍक्टिव्ह असल्याने अजून झोपेची जाणीव झाली नव्हती. 7.30 च जेवण केव्हाच जिरल, 12 वाजण्याच्या दरम्यान परत एकदा एके ठिकाणी थांबलो. मनोज दादा आणि श्रीनिवास ने दाल खिचडी घेतली तर मी चहा बिस्कीट वर समाधान मानलं. अखंड वाहता रस्ता असल्याने हॉटेल देखील 24 तास चालू असतात. पोटात अन्न गेल्यावर एनर्जी आली. आता म्हटलं तर फारसं अंतर उरल नव्हतं. परत एकदा स्पीड ने पॅडल मारायला लागलो. चहामुळे उरलीसुरली झोप सुद्धा उडाली होती. 400 हा ट्रीकि गेम आहे असं ऐकून होतो. श्रीनिवास ला तर अनुभव पण होता. झोप मिळत नाही पण सायकल तर चालवत राहायची, वेळ पण पाळायची स सगळं जमवून आणायला लागत. पण सध्या तरी मला छान फ्रेश वाटत होतं. मध्येच एकदा जेल खाऊन घेतली. चांगल्या स्पीड ने रस्ता पार करत काशीमिरा जंक्शन ला पोहोचलो. इथून घोडबंदर चा चढ होता आणि रखडवणारं ट्रॅफिक इथे सूरु झालं. चढात अति संथ गतीने चढणारे ट्रक एकमेकांना ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत होते. या नादात दोघेही रस्ता अडवून समांतर चालायला लागले. चिडचिड झाली माझी. स्वतः पुढे जायचं नाही नि दुसऱ्याला पण जाऊ द्यायच नाही अशी अवस्था होती. नाईलाजाने आम्ही डावीकडून सायकल पुढे नेल्या. थोड्याच वेळात एक शार्प टर्न आला. श्रीनिवास, थोड्याच अंतरावर पाठी मी नि माझ्या पाठी लागून मनोज दादा असे होतो. त्या तीव्र वळणावर पाठीमागून बोलेरो वाला एकदम स्पीड मध्ये आला. त्या ट्रक च्या स्पीड मुळे पाठी सगळेच रखडले होते. त्यात डावीकडून गाडी पुढे काढावी म्हणून जोरात आला आणि आम्हाला बघून कचकन ब्रेक दाबला.तरीही मनोज दादाला अगदी कडेला नेऊन चेपलं. थोडक्यात मनोज दादा पडता पडता वाचला. आणि अर्थात त्याने सावरून घेतल्याने मीही. मग मात्र मला भीती वाटली. मी सायकल वरून उतरून सायकल हातात घेऊन तो उरला चढ चढले. अगदी मोजून 10 पावलात चढ संपला. ते ट्रक पण पाठी राहिले. मग परत उतार उतरून आलो.

प्रवासाचा शेवट हा बऱ्याचवेळा कंटाळवाणा असतो. इथेही तसंच झालं. इतका वेळ उत्साहात आलेली मी, ठाण्यात आले नि कंटाळा आला. कधी एकदा वाशी येतंय अस झालं. सारखे सारखे ते फ्लायओव्हर चढायचा पण कंटाळा आला. मध्येच एकदा थांबून मनोज दादा कडच्या salt टॅबलेट घेतली. जरा तरतरी आली. खाडी चा पूल ओलांडून गेलो तरी वाशी येईना. मी दोन दोन वेळा दोघांना विचारलं रस्ता नक्की बरोबर आहे ना? चुकलात तर कशाला हवंय? पण रस्ता बरोबर होता पण वाशी स्टेशन काही येत नव्हतं.शेवटी अगदी स्टेशन 1 किमी चा बोर्ड वाचला नि एकदम उत्साह जाणवला.भराभर पॅडल मारली आणि अगदी थोड्याच वेळात पहाटे 4.30 ला शेवटच्या ठिकाणी पोहोचलो. आमच्या आधी फक्त 2 जण आले होते. जाणवून एकदम भारी वाटलं. ब्रेव्हेट कार्ड स्टॅम्प झाली. फोटो काढून झाले. परत सायकल चाकं काढून गाडीत नीट बसवल्या. तोवर 5.30 झाले. स्टेशन बाहेर पोहे,उपमा विकणाऱ्याची गाडी लागली होती. तिथेच जाऊन नाश्ता उरकून घेतला. घरी मेसेज करून ठेवले. आणि बेलापूर ला परत जाऊन रूम वर जे सकाळी 7 ला झोपलो ते एकदम 11 वाजता मनोज दादा हाक मारायला येईपर्यंत झोपलेलो.

ही राईड सगळ्यात आवडली मला. हात दुखण्याचा त्रास झाला नाही, श्रीचा पाय दुखला नाही, बोटाना बधिरपणा नाही आला. कुणाचीही सायकल पंक्चर नाही झाली किंवा आणखी कोणतीही अडचण आली नाही.सकाळी 9 वाजेपर्यंत स्पर्धा संवायची होती पण आम्ही 4.30 लाच संपवली होती. फारच छान वाटत होतं.

आता पुढची 600 खुणावत होती.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

28 Dec 2021 - 3:57 pm | मुक्त विहारि

600 साठी, शुभेच्छा आणि 400 साठी अभिनंदन ....

पुढच्या वेळी, वलसाडला गेलात की, काठियावाडी मध्ये जेवा

आणि नाॅन व्हेज हवे असेल तर, मिली

वलसाड, हे आमचे सगळ्यात आवडते शहर

चिपळूण नाटकासाठी आणि वलसाड, सिनेमासाठी

राघवेंद्र's picture

28 Dec 2021 - 11:38 pm | राघवेंद्र

काठियावाडी थाळी न्यू जर्सी मध्ये तर खूप फेमस झाली आहे. खूप काठियावाडी रेस्टॉरंट उघडली आहेत.
तिखट चमचमीत जेवण :)

बाकी लेखमाला आणि सायकलिंग जोरात चालू आहेत. ६०० साठी शुभेच्छा !!