'समूदादा' ही नागेश सू. शेवाळकर यांची बालकादंबरी वाचताना वाचकांना मनापासून आनंद होतो, एक प्रकारचे समाधान होते आणि डोळेही पाणवतात! समीर हा कादंबरीचा नायक आणि इतर बाल पात्रं आज घरोघरी, इमारतींमध्ये, गल्लोगल्ली आणि चाळींमधून निश्चितपणे भेटत असतात. त्यांना पाहताना मनात एक शंका आल्याशिवाय राहत नाही की, आजच्या स्पर्धेच्या युगात आपण बालकांचे बालपण हिरावून घेत आहोत की काय? कारण आज मुल दोन-अडीच वर्षांचे होत नाही तोच त्याची रवानगी 'प्ले ग्रुप' किंवा पाळणाघरात होताना दिसते आहे. समूदादा हे सर्वसामान्य घरामध्ये बागडणाऱ्या बालकांचे प्रतिनिधीत्व करणारे चरित्र आहे. कुणी एक बालक डोळ्यासमोर ठेवून लेखकाने ही कादंबरी लिहिलेली नाही. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आज घराघरातून आजी-आजोबांकडून होणाऱ्या संस्काराला आजची मुले मुकतात की काय हा विचार करण्याची गरज आणि वेळ आहे. मोठ्या शहरांमधून अनेक कुटुंबातील आजोबा-आजी हे वृद्धाश्रमात, आईवडील कार्यालयात तर छोटी मुले पाळणाघरात किंवा मग काम करणाऱ्या बाईच्या सांभाळी असतात हे चित्र दिवसेंदिवस घट्ट आणि दृढ होते आहे. अनेक बालकांना अशा वातावरणात लहानपणीच्या दंगामस्तीला, खोड्यांना, गमतींना, धिंगाण्याला आणि कुटुंबापासून मिळणाऱ्या प्रेमासोबत संस्कारालाही मुकावे लागत आहे. पाठीवरील दप्तराच्या ओझ्याने वाकलेली मुले थकूनभागून घरी येतात तेव्हा त्यांची शारीरिक, मानसिक अवस्था पाहून गलबलून येते. शिकवणी-शाळा-शिकवणी आणि पुन्हा गृहपाठ अशा चक्रव्युहात अडकलेल्या चिमुकल्यांची अवस्था अभिमन्यूसारखी होत असल्याचे दिसून येत आहे. दप्तराचे ओझे हा न सुटणारा आणि कायम चर्चेत असलेला मुद्दा आहे पण यावर ठोस अशी उपाययोजना कुणी करीत असल्याचे दिसून येत नाही.
सायंकाळी उशिरा घरी परतणारी पालक मंडळीची वाट पाहून थकलेल्या बालकांशी किती आणि काय बोलत असावी हा एक प्रश्न आहे. दिवसभर राबणारे पालक घरी आले की मुलांना सर्वात आधी ठराविक प्रश्न विचारतात. ते म्हणजे, 'शाळेत गेला होतास का? शिकवणी झाली का?गृहपाठ केलास का? जेवलास का?' असे जुजबी आणि पाल्यांना नको असलेले तेच तेच प्रश्न विचारून पालक स्वतःचे समाधान जरूर करून घेतात. मुलांसोबत खेळणे, धिंगामस्ती करणे इत्यादी गोष्टींपासून बालक-पालक दोघेही दुरावताना दिसत आहेत. अभ्यास एके अभ्यास या चक्रातून वेळ मिळालेली मुले टीव्ही आणि भ्रमणध्वनीच्या दुष्टचक्रात अडकताहेत. अडीच- तीन वर्षाचे मूल असणारी आई जेव्हा प्रचंड कौतुकाने म्हणते, 'आमच्या राजाला की नाही मोबाईलची सारी माहिती आहे. त्याला की नाही, मोबाईलवर एकदा गाणी लावून दिली ना की झाले. कशाची काळजी नको. किंवा आमचा राजा मोबाईलवर तीन तीन तास तहानभूक विसरून खेळत बसतो. तोवर माझी सारी कामे होतात...' हे सारे कौतुकापुरते ठीक असले तरीही मुलांच्या जीवनातून बैठे नैसर्गिक खेळ, मैदानी खेळ वजा होत आहेत ह्याकडे का दुर्लक्ष होत आहे तेच कळत नाही. अशा एकूण वातावरणामुळे मुले हट्टी, एकलकोंडी होत आहेत यात दोष तो कुणाचा? परिस्थितीपुढे सारेच हतबल झालेले असले तरीही उद्भवत असलेल्या स्थितीकडे कानाडोळा करता येणार नाही. अशा चक्रव्यूहातून बालक- पालक यांना सोडवण्यासाठी उत्तम संस्काराची शिदोरी हवी असते जी आपल्याला या कादंबरीतून मिळते. आजकाल जिथे शाळेत पूर्वीचा 'परवंचा' होत नाही परंतु सेवानिवृत्त असलेले तांडेकाका शाळेतून हद्दपार झालेला परवंचाचे स्वतःच्या इमारतीतील बालकांसाठी घेतात तेव्हा आजच्या तरुण पालकांना परवंचाचे महत्त्व समजल्याशिवाय राहणार नाही हे लेखकाच्या लेखणीचे यश म्हणावे लागेल.
एक गोष्ट सर्वत्र ठळकपणे आढळते आहे, ती म्हणजे आजची बालपिढी त्यांच्या वयाच्या मानाने फार पुढे आहे. त्यांच्या वयाच्या मानाने ती अशी एखादी कृती करतात किंवा सहजपणे, नकळतपणे असा एखादा शब्द किंवा वाक्य फेकतात ना की समोरचा माणूस आश्चर्याने तोंडात बोट घालतो. बालकांच्या अशाच विस्मयकारक अनुभवांचे एकत्रीकरण समूदादा या कादंबरीतून करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या पिढीचे नेतृत्व नायक समीर करतो ती पिढी जरी तीन-साडेतीन वर्षाच्या आसपासची असली तरीही त्यांच्या बाललीला इतक्या परिपक्व असतात की, नंतर ती घटना अडीच वर्षे वयाच्या मुलाच्या बाबतीत घडलीय किंवा त्याने हे केलेय असे सांगितले तर खरे वाटणार नाही. परंतु प्रत्येकाने स्वतःच्या आसपास बागडणाऱ्या मुलाचे बारकाईने निरीक्षण केले तर बालकाचे चातुर्य, हुशारी, अनुकरण, वागणूक, व्यक्त होण्याची पद्धती हे सारे लक्षात येईल.
नागेश सू, शेवाळकर हे लेखन क्षेत्रातील एक सर्वदूर परिचित असे नाव आहे. विनोदी कथालेखक, कादंबरीकार, चरित्रलेखक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे नागेश सू. शेवाळकर. 'समूदादा' ही नागेश शेवाळकर यांनी लिहिलेली आणि चपराक प्रकाशन, पुणे यांनी अत्यंत देखण्या ढंगात प्रकाशित केलेली बालकादंबरी वाचल्यावर ते एक सशक्त बालसाहित्यिकसुद्धा आहेत हे वारंवार जाणवते. गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र कुटुंब पद्धती लयाला जाऊ लागली की काय अशी शंका बळावत होती. अशा काळात गरज होती ती संस्कारक्षम साहित्य लेखनाची. अनेक साहित्यिकांनी बालसाहित्यात मोलाची भर टाकलेली आहे. या परंपरेतील एक ठळक नाव म्हणजे नागेश शेवाळकर! सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि प्रथितयश लेखक म्हणून सर्वदूर परिचित असलेले साहित्यिक नागेश शेवाळकर यांची भाषाशैली सरळ, साधी सोपी आणि बालकांशी हितगुज करणारी आहे. सोबतच शेवाळकर या कादंबरीच्या माध्यमातून सहज संस्कार आणि प्रबोधनही करून जातात. लेखक शेवाळकर हे शिक्षक होते. या कादंबरीत एक प्रेमळ, विद्यार्थीप्रिय, उपक्रमशील शिक्षक या कादंबरीतून डोकावतो. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या युगात आपण बालकांचे बालपण हिरावून घेत आहोत की काय अशी शंका डोकावते आहे.
कादंबरीचा समीर नावाचा नायक अडीच तीन वर्षे वयाचा आहे. या वयातही तो अत्यंत चाणाक्ष, बुद्धीमान, प्रेमळ, लाघवी, मधाळ, गोड असाआहे. त्याच्या गमतीजमती वाचताना वाचक नकळत त्याच्या प्रेमात पाडतो. सदैव उत्साही, खेळकर नि खोडकर असा हा समीर कधी आपला होऊन जातो हे वाचकांना कळत देखील नाही. हरिनाम संकुलात समीरसोबत राम, रहीम, मालिनी ही बच्चेकंपनीच्या बाललीला आपणास अनुभवयाला मिळतात.
शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक मुलाच्या मनात जशी शाळेत जाण्याची जशी उत्सुकता असते तशीच एक प्रकारची भीतीसुद्धा असते. परंतु शाळेत जाण्याच्या या पहिल्यादिवशी तांडेकाका आणि काकू यांनी केलेल्या नियोजनामुळे या मुलांना हा दिवस म्हणजे उत्सवाचा कसा वाटतो हे ही कादंबरी वाचल्याशिवाय कळणार नाही. ही कादंबरी केवळ बालकांना मार्गदर्शन करत नाही तर काही सामाजिक संदेशही देते. समूदादाचे बालमित्र राम- रहीम हेही हरिनाम संकुलात राहत असतात. रहीमच्या अब्बाचे सोसायटीच्या गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करून लेखक शेवाळकर एक अनोखा सामाजिक देताना बालकांच्या मनावर जातीभेदाच्या निर्मूलनाचे बीजारोपण करतात. दरमहा होणाऱ्या चाचणी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण न मिळू शकल्याने अस्वस्थ होणारी आणि ते गुण मिळवण्यासाठी प्रयत्नपूर्वक धडपड करणारी बच्चेकंपनी आपणास या कादंबरीत भेटते. तसेच पैकीच्या पैकी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा होणारा सत्कार पाहून आपणही आपल्या बाईंचा सत्कार करावा हा एक आगळावेगळा विचार जेव्हा तिसरी- चौथी इयत्तेत शिकणाऱ्या मुलाच्या मनात येतो तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही.
कादंबरीचा शेवट वाचकांना अवाक् आणि डोळे पाणवणारा निश्चितच आहे. तांडेकाका या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांची आणि नायक समूदादा यांची खरेच ताटातूट होईल का? हा प्रश्न वाचकांना पडतो. हा प्रसंग रेखटताना लेखकाचा सारा अनुभव आणि कसब त्यांनी पणाला लावल्याचे लक्षात येते. एकंदरीत नागेश शेवाळकर यांनी लिहिलेली 'समूदादा' ही कादंबरी अत्यंत वाचनीय, संस्कारक्षम अशी आहे.
प्रतिक्रिया
26 Jul 2021 - 11:06 pm | गॉडजिला
वाह, नक्किच वाचेन दर्जेदार बालसाहित्य वाचन हे फार मोठा विरंगुळा मनाला देते. अत्यंत समर्पक ओळख... पुस्तकाबद्दल कुतुहल चाळावले आहे.
27 Jul 2021 - 11:12 am | कुमार१
छान ओळख.
27 Jul 2021 - 3:06 pm | चौथा कोनाडा
खुप सुंदर पुस्तक समर्पक ओळख... लेखनशैली आवडली.
27 Jul 2021 - 4:34 pm | Bhakti
फोटो दिसत नाहीये, कादंबरी किती साधी प्रकाशित झाली आहे?
27 Jul 2021 - 4:35 pm | Bhakti
* कोणत्या साली/वर्षी प्रकाशित झाली आहे.
1 Aug 2021 - 1:44 pm | वामन देशमुख
याच वर्षी प्रकाशित करण्यात आली आहे.
28 Jul 2021 - 11:06 am | सुमो
हे पुस्तक इथे ऑनलाईन उपलब्ध असल्याचं दिसतंय. पण या वेबसाईटवरुन पुस्तक मागविले नाहीये कधी.
28 Jul 2021 - 2:56 pm | ॲबसेंट माइंडेड ...
छान पुस्तक परिचय.
1 Aug 2021 - 11:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेच म्हणतो.
-दिलीप बिरुटे
1 Aug 2021 - 1:45 pm | वामन देशमुख
सर्व प्रतिसादकांचे आभार.
30 Jun 2022 - 8:30 am | कुमार१
नमस्कार
व्य नि पहावा.