स्मरण चांदणे२

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
6 Aug 2021 - 11:48 am

स्मरण चांदणे२
     
दिवस कलत असताना,आता लवकरच सुर्यास्त होणार याची जाणीव होऊ लागते,तो होऊ नये अशी काहींची  ईच्छा असते. ते तर शक्य नसते.ते सकाळच्या आठवणीत रमतात.दिवस संपण्याच्या वास्तवाचे विस्मरण होते काही क्षण!
बालपणाचे गोडवे अनेकांनी गायले आहेत. लहानपणी काही कळत नसते,म्हणून आपण सुखात असतो,निर्धास्तअसतो.आईवडिलांच्या
,मोठ्यांच्या छायेत सुरक्षित असतो.जीवनाच्या वास्तवापासून दूर,अज्ञानातला आनंद उपभोगत!
    वय जसजसे  वाढत जाते तस तशा जबाबदा-या वाढत जातात. सोबत ;भय,चिंता,दु:ख,आणि बरेच काही  घेऊन  येतात.वास्तवाचे चटके बसू लागतात.काळाच्या ओघात अनेक जीवलग सोडून जातात कायमचे.अनेकदा पोरकेपणाची भावना येते.उदास वाटते.अशा वेळी  बालपणीच्या ,आईवडिलांच्या छत्रछायेत घालवलेल्या क्षणांच्या आठवणीत,वर्तमानाचे वास्तव काही काळ नजरेआड होते.पोरकेपणाची जाणीव,उदासी कमी होते.आयुष्य उतरणीला लागल्यावर बालपणीचा आठव सुखावून जातो.हा अनुभव अनेकांना येतो.काहीही असो.हे स्मरणचांदणे आल्हाददायक आहे .पोर्णीमेच्या चांदण्या सारखे!माझ्या साठी तरी!
     'त्या 'काळी गावात  हल्ली सारखी करमणूकीची साधने नव्हतीच.पण तरीही करमणूकीला तोटा नव्हता.गणपतीच्या दिवसात तर मज्जा असे.एकच सार्वजनिक गणपती असे.ग्रामपंचायत कार्यालयाचे बाजूस रस्त्यालगत चौथरा होता.त्याला तिन्ही बाजूंना कनाती लावून त्याचा स्टेज म्हणून वापर होई.गणपतीचे दिवसात रात्री नकला,नाच गाणी, प्रहसने,आणि सामाजिक,पौराणिक, ऐतिहासिक विषयावरच्या छोट्या नाटिका,एखादे तीनअंकी नाटक असे विविध करमणूकीचे कार्यक्रम होत.पेट्रोमॅक्स(बत्ती)चे उजेडात,माईकशिवाय कार्यक्रम सादर होत. स्टेजसमोरच्या रस्त्यावर बसून प्रेक्षक जे व जेवढे दिसेल आणि ऐकू येईल त्यावर  समाधान मानून घेत !ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोकळी ओवरी होती(चावडी ).तिथे गावातील प्रतिष्ठित मंडळीसाठी,बसण्याची  वेगळी व्यवस्था असे.वडील  ग्रामपंचायतचे उपसरपंच होते. त्यामुळे त्यांचे शेजारी बसून तिथून कार्यक्रम पाहता येत. थोडा मोठा झाल्यावर मी पण एकदोन वेळा नाटिका नकलांमधे भाग घेतला होता.
गावातील चिंतामणबुवा गोसावी अतिशय उत्साही होते.त्यांना बोलायला त्रास होत असे.घशातून आवाज निघत नसे.खूणेनेच बोलत.पण नाटके,नाच,गाणे नकलाचे कार्यक्रम बसवण्याची,तालिमी घेण्याची  जबाबदारी त्यांची असे.लहान मुला मुलींचा गाणे,नाच, नकला मधे; तर नाटकात तरुण मंडळींच सहभाग असे.
स्त्री भुमिका पुरुषच करीत.सवांद पाठ झाले व मोठ्या आवाजात म्हणता आले की भुमिका चोख वठली अशी सगळ्या नटांची व प्रेक्षकांचीही भावना असे.स्त्री पार्ट्याचे,विनोदी भुमिका करणाराचे विशेष कौतुक होई. नाटकाचा
विषय कुठलाही असो.ती विनोदीच होत.एकंदरीत  करमणूक निश्चित होई.
  एकदा मोठी गम्मत झाली. ऐतिहासिक नाटुकले सूरू होते.सगळ्या भूमिका छोट्या मुलांनी केल्या होत्या. सैनीकाची भुमिका करणारा मुलगा त्याचे संवाद विसरला.नुसताच उभा शुंभासारखा. त्यावर सेनापती झालेल्या मुलाने जवळ जाऊन त्याचे कानात ''महाराज आज्ञा द्या,म्हण की "असे सांगितले. यावर सैनिकांचा काम करणारा , "ते आत्ता नाही नंतर आहे" म्हणून  वाद घालू लागला.दोघांची तिथेच जुंपली.शत्रूवर चालून जाण्या ऐवजी ,सैनीक व सेनापती एकमेकाशी युध्द करायचा बेतात होते. शेवटी पडद्यामागून 'राजा'ने  एंट्री घेतलीआणि दोघांचे संवाद  स्वतःच म्हणून प्रसंग निभाऊन नेला.
गाणे, नकला,नाच यामधे पण कलाकार घोटाळे करत.समूहनृत्यात तर विचारायलाच नको. समोरचा चुकला की इतर कलाकार आपला परफॉरमंस सोडून त्याच्यावर हसत बसत,व सुचना देत.कुणाचा कुणाला मेळ नाही अशी अवस्था असे.तरीही प्रेक्षक मंडळी सगळे गोड मानून घेत.
तरुण मंडळीची नाटके मात्र ब-यापैकी सादर होत.
'बुवा तेथे बाया,'लग्नाची बेडी,आग्र्याहून सुटका ,अशी नाटके झाल्याचे आठवते.नाटकानंतरही  काही दिवस त्यातील संवाद, प्रसंग डोक्यात असत.मग मी घरी त्यांचे एकपात्री प्रयोग पण करत असे! नाटकातील एखादा  कलाकार जाता येताना  दिसला की त्याचे नाटकातील  संवाद जोरजोरात म्हणायचे.तो खूष!
असे दिवस होते.
( क्रमश:)
           नीलकंठ देशमुख .

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

6 Aug 2021 - 4:04 pm | गॉडजिला

नाटकानंतरही काही दिवस त्यातील संवाद, प्रसंग डोक्यात असत.मग मी घरी त्यांचे एकपात्री प्रयोग पण करत असे!

क्लासिक... नॉस्टॅल्जिया.

नीलकंठ देशमुख's picture

6 Aug 2021 - 6:47 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. म्हणूनच स्मरणरंजनाचे ,स्मरण चांदणे आजही....

सौंदाळा's picture

6 Aug 2021 - 8:43 pm | सौंदाळा

वाचतोय
हा भाग छोटा वाटला

सिरुसेरि's picture

20 Sep 2021 - 10:36 pm | सिरुसेरि

हा भागही छान रंगला आहे . +१

नीलकंठ देशमुख's picture

21 Sep 2021 - 11:23 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद