गझल

तो खुला बाजार होता!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
23 Mar 2017 - 3:27 pm

चोरटा व्यापार कसला?तो खुला बाजार होता
वासना अन् भूक यांचा..रोजचा व्यवहार होता!

चार फांद्या वाकलेल्या दोन खिडक्या झाकलेल्या
सांधले काही कवडसे..फाकला अंधार होता!

मनचले भुंगे उगाचच,फूल गोंजारुन बघती
पाकळ्या चुरगाळलेल्या..स्पर्श थंडा-गार होता!

देह विझलेले जगाची वासना जाळीत होते
चालला रस्त्याकडेने भोंगळा यल्गार होता!

हासताना जिंदगीची राख ती उधळीत होती...
हो,तिच्या देहात नक्की शायरी अंगार होता!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकरुणकवितागझल

पात्रामध्ये नदीच्या प्रेते सडूनी गेली ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
22 Mar 2017 - 10:33 am

आज आमच्या कवितेच्या ग्रुपवर स्वाम्याच्या (स्वामी संकेतानंद) मस्करीला उत्तर देताना एक मित्र कौतुक शिरोडकर याने हां शेर लिहीला होता.

माझ्या खरेपणाची देऊ कशी मी ग्वाही
मसणातल्या मढ्यानो बोलाल का हो काही ?

******************************************************

त्यातल्या प्रश्नाचा संदर्भ घेवून सुचलेल्या काही ओळी !

रस्त्यास त्या बिचाऱ्या सांगाल का हो काही ?
पथभ्रष्ट भास्कराला शिकवाल का हो काही ?

सगळे खरेच आहे खोटे न येथे कोणी,
रचल्या चितेस सांगा बोलाल का हो काही ?

मराठी गझलगझल

पेटुनी आरक्त संध्या...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
22 Mar 2017 - 5:00 am

पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे...
केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे!

मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे...
वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे!

काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे...
सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे!

एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी...
त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे!

मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही...
आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!

सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी...
मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे!

—सत्यजित

gajhalgazalकविता माझीमराठी गझलकवितागझल

(ग़ज़ल - म्हटलेच होते)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
21 Mar 2017 - 11:33 pm

२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे(च), म्हणून एखादी ताजी कविता आपणही शोधू म्हटलं. सादर आहे....

(म्हटलेच होते...)

सुबक दिसता, दे हृदय म्हटलेच होते
नाइलाजाला सवय म्हटलेच होते

खीर देती ते पुन्हा घेता पुरी मी
मीहि चरण्याला विजय म्हटलेच होते

एक मिटता नयन अन खुलताही दुसरा
उमटते गाली वलय म्हटलेच होते

वाटली होतीच भीती या क्षणाची
त्या कडीने ना अभय, म्हटलेच होते!!

'परतुनी' जा(ये)ती कशा समजे न रंग्या
सासवांना मी प्रलय म्हटलेच होते!

-चतुरंग
२१-३-१७

हास्यकविताविडंबनगझल

नकळत

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
21 Mar 2017 - 4:14 pm

प्रीतीत तुझ्या मज, तू बरेच शिकवून गेलीस
निरक्षर होतो मी, मला पुस्तक करून गेलीस

लावले होते वृक्ष मी आपल्या अंगणी
बहरले ते अन सावली तू घेऊन गेलीस

विश्वास करत गेलो, तू जे सांगत गेलीस
फसत राहिलो मी, अन तू फसवत गेलीस

निजलो मी, वचन पहाटेचे तू देत गेलीस
नकळत मला, पहाट तू माझी घेऊन गेलीस

-निनाव
२१.०३.२०१७

gajhalकवितागझल

ग़ज़ल - म्हटलेच होते

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
21 Mar 2017 - 12:20 pm

२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे. म्हणून एखादी ताजी कविता आपणही टाकू म्हटलं.

म्हटलेच होते...

होय दगडाला ह्रदय म्हटलेच होते
नाइलाजाला सवय म्हटलेच होते

धीर देती ते जणु हरलो पुरा मी
मीहि हरण्याला विजय म्हटलेच होते

एक मिटते वाट अन खुलतेही एक
प्रीतिच्या अस्ता उदय म्हटलेच होते

वाटली होतीच भीती या क्षणाची
मी मनाला 'हो अभय' म्हटलेच होते

वाहुनी गेलो कधी नकळे अपूर्व
आसवांना मी प्रलय म्हटलेच होते

- अपूर्व ओक
२०-३-१७

मराठी गझलकवितागझल

मुन्तजिर

मिडास's picture
मिडास in जनातलं, मनातलं
20 Mar 2017 - 6:27 am

राग, मत्सर, लोभ, द्वेष, अहंकार कुठल्याही नातेसंबंधात अपरिहार्यपणे येणारे हे भोग. कुणी कधी जिंकतं तर कधी कुणी हरल्याचं दाखवतं. पण साचत जातं काहीतरी आतल्या आत. घुसमट होते. तापलेल्या मनावर पुटं चढत जातात अपमानाची आणि मग कधीतरी कोंडलेली वाफ नको तिथे फुटते. पोळून निघतात मनं. मग रस्ते वेगळे होतात. दिवस जातात, वर्षं उलटतात. आणि मग एखाद्या नाजूक क्षणी जुनी पायवाट आठवते. भुरभुरणाऱ्या पावसात पसरणारा मातीचा गंध दाटून येतो छाती भरून. फिरून कुणाला तरी परत भेटावं अशी आस लागते. दूर आहे म्हणून काय झालं, शेवटी कुठलातरी चिवट बंध रेंगाळतोच मागे. त्याच रेशमी धाग्याला पकडून कुणीतरी साद घालतं.

संगीतमुक्तकगझलप्रकटनआस्वादलेख

तू नभीचा चंद्रमा हो...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
18 Mar 2017 - 1:58 pm

लांबती हे श्वास हल्ली..सोबती घेवून जा...
तू मला भेटायला ये..एकदा येवून जा!

शेवटी आयुष्यही असते प्रवासासारखे...
तू तुझ्या गावात थांबा तेवढा ठेवून जा!

तो तसा आला नि गेला..वादळाच्या सारखा...
पण मला सांगून गेला..दीप हो,तेवून जा!

वाहते आहे अनावर,तू मला प्राशून घे...
या नदीला सागराची वा दिशा देवून जा!

सूर्य विझता रातही चालून येते नेमकी...
तू नभीचा चंद्रमा हो..चांदणे लेवून जा!

—सत्यजित

gajhalgazalकविता माझीमराठी गझलकवितागझल

होऊन आज सूर्य (गझल)

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
16 Mar 2017 - 1:45 pm

होऊन आज सूर्य अंधार प्यायलो मी
आभुषणे आगीची देहास ल्यायलो मी

माझ्या पराभवाची चिंता तुला कशाला
झेलुन वार सारे मस्तीत गायलो मी

केला किती तयांनी जन्मांतरी दगा तो
त्यांनाच गोडव्याचे हे दान द्यायलो मी

युद्धात दुःखितांच्या योद्धा कठोर होतो
भेटुन सज्जनांना अश्रुंत न्हायलो मी

बांधुन ठोकताळे जोखु नको मला तू
ते घास विस्तवाचे आजन्म घ्यायलो मी

पर्वा जरी नसे ती उन्मत्त भामट्यांची
बोलास लाघवाच्या किंचित भ्यायलो मी

जातो आहे किनारा तो गूढ लांब आता
नौकेत या कळेणा नि काय न्यायलो मी?

- शार्दुल हातोळकर

मराठी गझलगझल

मरासिम

मिडास's picture
मिडास in जनातलं, मनातलं
13 Mar 2017 - 9:05 am

अजून पण ती रात्रं लख्ख आठवतोय मला. बाबांनी walkman घेतला होता. आणि त्याच दुकानातून जगजीत सिंग ची एक कॅस्सेट. दुकानातून बाहेर पडल्या पडल्या मी त्यांच्या हातातून walkman काढून घेतला होता. इअर प्लग कानात सारून मी प्ले चं बटण दाबलं. गिटार ची जीवघेणी सुरावट कानातून सरळ मेंदूत घुसली होती. पाठोपाठ जगजीत सिंग चा आवाज मनात हळूच शिरला.

कोई ये कैसे बतायें के वो तनहा क्यू है.

संगीतमुक्तकगझलप्रकटनआस्वादसमीक्षाअनुभव