गझल

जगायास कारण ईतकेच आहे...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
9 May 2017 - 9:26 am

नवे रोज धागे नवा पेच आहे
जगायास कारण ईतकेच आहे!

कुणी एकटा जात नाही प्रवासा
कुणी चालताना कुणा ठेच आहे!

कुणी आरसा काल देवून गेले
मला भेटतो मी नव्यानेच आहे!

कुण्या वर्तुळाच्या कडेने फिरावे
उभे विश्व सारे फुकाचेच आहे!

नको फार त्रागा करु तू उन्हाचा
सखी सावली या उन्हानेच आहे!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

या गुलाबाच्या फुलाला...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
8 May 2017 - 4:41 am

पाहिजे तर बाग सारा,आज तू जाळून जा...
या गुलाबाच्या फुलाला,आज तू माळून जा!

सांगतो वारा खबर..तू यायची अन् जायची...
तू मला भेटून जा..वा,तू मला टाळून जा!

तू दिलेल्या डायरीचे,काय झाले ऐक ना...
एकदा माझ्या मनाचे,पान तर चाळून जा!

चांदण्याचा कवडसा मी,मोल माझे काय ते?
तू नभीचा चंद्रमा हो..वचन दे..पाळून जा!

मेघ राहू दे तुझे तू,दाटलेले अंतरी...
वेदनेवर दोन अश्रू,कोरडे ढाळून जा!

प्रीत-पत्रे-शेर-कविता..फोल तू ठरवून जा...
कैफियत ऐकून माझी,मजवरी भाळून जा!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

कधी किनारा लिहितो,किंवा...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
5 May 2017 - 12:21 am

कधी किनारा लिहितो किंवा,कधी शिकारा लिहितो
तुझ्या मनाच्या लहरींना मी उनाड वारा लिहितो!

कधी मनाची लाही होते,कधी शहारा होतो
कधी सरी बरसाती लिहितो,कधी निखारा लिहितो!

तिच्या घरी माझ्या कवितांना,खुशाल वावर आहे
तिला वेळ भेटीची कळते,असा इशारा लिहितो!

कधी फुले ती वेचत असता,उशीर होतो तेंव्हा
तिचा स्पर्श ओझरता माझ्या मनी पिसारा लिहितो!

अजूनही घमघमते अत्तर,तुझ्या रुमालावरचे
अजून मी माझ्या श्वासांना,तुझा निवारा लिहितो!

तुला जमेशी धरले तेंव्हा,सदा हातचे सुटले
हिशोब आता जुळतो जेंव्हा,तुझा घसारा लिहितो!

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

दे बहाणे सोडुनी ...

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
4 May 2017 - 11:00 pm

खास काही आजच्या भेटीत झाले आखरी
कावरी झाली किती झाली किती ती बावरी

भासवे नाजूक काही भावना या ना मनी
सांगते सारे खळी जी लाजते गालावरी

मान वेळावून पाही तो बहाणा लाघवी
एकदा सारे अशी सारे तशी बट लाजरी

ऐकण्यासाठी अबोला कोकिळा झाली मुकी
बोलली नाही तरी पंचम तिच्या ओठावरी

साधली संधी कशी तो वर्षला ग्रीष्मातही
दे बहाणे सोडुनी ती लाज आता सावरी

... संदीप

प्रेम कविताकवितागझल

(ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा...)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
4 May 2017 - 5:05 am

सत्यजित भाऊंची उत्तम गजल "ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा" वाचली.

एक 'कोबरा' सोडला तर बाकी सगळे शेर डसले! :)

ईर्शाद. अर्थातच आमचा नजराणा....

ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा...
येत नाही लपवता पण गाल मोठा गोबरा!

मोकळ्या केसांतुनी माळून येते तेरडा
अन् जटांचा जीवघेणा सुंभ दिसतो का बरा?

आरसा भंजाळतो हो ती जशी डोकावते
केवढी गबदूल आहे, कोण म्हणते अप्सरा!

ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी
भिववतो भोळ्या जिवाला चुंबनांचा तोबरा!

विडंबनगझल

ओंजळीने ती जसा,झाकून घेते चेहरा...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
30 Apr 2017 - 2:10 am

ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा...
का कसा ठावूक नाही,लाल होतो मोगरा!

मोकळ्या केसांतुनी बहरून येतो केवडा
अन् बटांचा जीवघेणा पीळ दिसतो कोबरा!

आरसा घायाळ होतो ती जशी डोकावते
केवढी नाजूक आहे,हीच का ती अप्सरा!

ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी
खेचतो भोळ्या जिवाला पाकळ्यांचा भोवरा!

काय सांगू केवढी असते सुगंधी भेट ती?
ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलशृंगारकवितागझल

अता ही भेट टळणे शक्य आहे ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
24 Apr 2017 - 12:32 pm

अता ही भेट टळणे शक्य आहे
(तुझे मजला वगळणे शक्य आहे)

जरासा जोर लावावास अजुनी
पहा माझे निखळणे शक्य आहे

नको इतकी मुजोरी आरशावर
तुझेही रुप ढळणे शक्य आहे

असे येऊ नये वेळीअवेळी
(कुणी काही बरळणे शक्य आहे)

जरा जपूनीच ये ग्रीष्मात इथल्या
तुझी काया वितळणे शक्य आहे

तुला पाहून येथे एकटीला
फुलांचे बावचळणे शक्य आहे

डॉ. सुनील अहिरराव

gajhalgazalहे ठिकाणकवितागझल

ती एकदाच दिसली...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
24 Apr 2017 - 5:01 am

ती एकदाच दिसली अन् छंद होत गेला
दिनदर्शिका-फुल्यांचा धरबंद होत गेला!

होती कथा विराणी,झाली गझल रुमानी
बहुधा पुन्हा व्यथेला,आनंद होत गेला!

शर खोल-खोल रुतला नजरेतला तिच्या अन्
एकेक मंद ठोका मग बंद होत गेला!

केसांत मोकळ्या त्या मन गुंतवीत गेलो
कमळात बंद भुंगा स्वच्छंद होत गेला!

टिपतो सुगंध वारा..उबदार ओंजळींनी
बागेतल्या कळ्यांचा गुलकंद होत गेला!

ती गुणगुणत असावी बहुतेक शेर माझे
प्रत्येक शब्द माझा मकरंद होत गेला!

केंव्हातरी अचानक येतो सुगंध अजुनी
हा कायदा ऋतूंचा,बेबंद होत गेला!

—सत्यजित

gajhalमराठी गझलकवितागझल

हीच तर सुरुवात आहे...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
21 Apr 2017 - 9:55 pm

गुदमरावे प्राण अवघे,श्वास इतका कोंडण्याची...
होय!मी केली तयारी,वादळांना फुंकण्याची!

काय मी केला गुन्हा की सोडले मी मौन माझे...
पेटल्या वणव्यास मागा कारणे मी चेतण्याची!

आर्त किंकाळीस जेंव्हा वेदनांची साद येते...
शर्थ होते थबकलेल्या जाणिवांना रेटण्याची!

बोट का छाटू नये ते,या गुलाबाच्या कळ्यांनी...
ज्या नखावर खूण नाही,एक काटा टोचण्याची!

लाख सजवा वेस तुमची,लक्तरे टांगून माझी...
हीच तर सुरुवात आहे,मी दिशांना लांघण्याची!

—सत्यजित

मराठी गझलगझल

घोर हा घनघोर आहे!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
21 Apr 2017 - 5:31 am

चोर तर आहेच वर शिरजोर आहे
काळजाचा घोर हा घनघोर आहे!

जाळतो आहे जिवाला रोज थोडे
पावसाचा जोर हा कमजोर आहे!

तू नको जावूस माझ्या शांततेवर
वेदने,मी वादळाचा पोर आहे!

ऐन दुःखाचा पसारा मांडला मी
वाह् वा झाली,म्हणाले..जोर आहे!

जिंदगी एकाच दुःखावर उधळली
मी हिशोबी,फार काटेकोर आहे!

वाचण्याआधीच हे लक्षात घे तू
मी कुणी नाही कवी,चितचोर आहे!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल