पात्रामध्ये नदीच्या प्रेते सडूनी गेली ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
22 Mar 2017 - 10:33 am

आज आमच्या कवितेच्या ग्रुपवर स्वाम्याच्या (स्वामी संकेतानंद) मस्करीला उत्तर देताना एक मित्र कौतुक शिरोडकर याने हां शेर लिहीला होता.

माझ्या खरेपणाची देऊ कशी मी ग्वाही
मसणातल्या मढ्यानो बोलाल का हो काही ?

******************************************************

त्यातल्या प्रश्नाचा संदर्भ घेवून सुचलेल्या काही ओळी !

रस्त्यास त्या बिचाऱ्या सांगाल का हो काही ?
पथभ्रष्ट भास्कराला शिकवाल का हो काही ?

सगळे खरेच आहे खोटे न येथे कोणी,
रचल्या चितेस सांगा बोलाल का हो काही ?

'योगी' कितीक झाले, होतील लाखो मुल्ला
ऐन्यास बोल थोडा लावाल का हो काही ?

झोळी गळ्यात बांधुन दारात ऊभा आहे
पुत्रास त्या 'बळीच्या' वाढाल का हो काही ?

पात्रामध्ये नदीच्या प्रेते सडूनी गेली
पाण्यास मार्ग आता दावाल का हो काही ?

येतील दिवस तेही नांदू पुन्हा सौख्याने
आशा चुकार वेडी रुजवाल का हो काही ?

© विशाल कुलकर्णी

मराठी गझलगझल

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

22 Mar 2017 - 10:58 am | प्रसाद गोडबोले

भारी कच्चा माल !

प्रीत-मोहर's picture

22 Mar 2017 - 10:59 am | प्रीत-मोहर

वाह क्या बात है!!

अभ्या..'s picture

22 Mar 2017 - 11:11 am | अभ्या..

विशालभाऊ, वेल्लाभाऊ,
डोन्ट माईंड बट....
इतक्या गझला वाचल्या पण हाच एक मूड अन स्टाईल फिक्स असते का?
म्हणजे मला कै कळत नाही यातले पण हवेत फेकलेले अधांतरी प्रश्न अन इन्वर्टेड कॉमातले चमकदार शब्द ह्याशिवाय दुसरे काही गवसेनाच :(
मग गझलेचे शास्त्र, त्याच्या काही खास संज्ञा वापरुन फक्त हेच बनू शकते का?

स्पा's picture

22 Mar 2017 - 11:33 am | स्पा

मलाही नेहमी हाच प्रश्न पडतो
अगम्य दुर्गम न कळणारे लिहिलेले असते
त्यामुळे मीही त्याचा अर्थ विचारयला कुणाला जात नाही
माझ्यासारखीच इतरही मंडळी आहेत हे पाहन बरे वाटले

किसन शिंदे's picture

22 Mar 2017 - 12:48 pm | किसन शिंदे

चक्क !!

चांदणे संदीप's picture

22 Mar 2017 - 3:25 pm | चांदणे संदीप

ॲड मी!

Sandy

अत्रुप्त आत्मा's picture

23 Mar 2017 - 12:30 pm | अत्रुप्त आत्मा

22 Mar 2017 - 12:03 pm | स्पा

दिसल जरा इथेही
मीि-पावरीच आहे
अॉफलाइनीतूनिही
मिपाघरीच आहे.

http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif

पैसा's picture

22 Mar 2017 - 11:12 am | पैसा

भारी लिहिलय!

ज्योति अळवणी's picture

22 Mar 2017 - 11:29 am | ज्योति अळवणी

मस्त! आवडली

विशाल कुलकर्णी's picture

22 Mar 2017 - 5:38 pm | विशाल कुलकर्णी

इतरांचे माहीत नाही अभ्याशेठ, पण माझ्या मिपावरच्या सगळ्या गझला शोधून पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की मी बरेच वेगवेगळे फॉर्म आणि भावही वापरले आहेत. करुण रस, श्रृंगार, निसर्ग, अनेक समस्या अश्या खुप वेगवेगळ्या भावांवर , विषयावर लिहीले आहे मी. फॉर्मचे म्हणाल तर गझल एकतर मात्रावृत्तात लिहीता येते किंवा अक्षरगण वृत्तात. मी शक्यतो अक्षर गण वृत्तात लिहितो. इथे लिखाणाला वृत्ताच्या नियामांचे, शब्द संख्येचे, अलामत, काफिया, रदीफ़ अशी अनेक बंधने पाळून लिहावे लागते. लिहिताना मी साधारणत: सोपी वृत्ते निवडतो कारण मग तंत्राच्या आहारी जाण्यापासून सुटका होते.

आता राहीले अधांतरी प्रश्न फेकणे वगैरे. तो ज्याचा त्याचा पाहण्याचा दृष्टीकोन आहे. गझलेचे कवितेसारखे नाहीये. कविता पूर्ण एका विषयावर आधारीत असते. गझलेचा प्रत्येक शेर वेगवेगळ्या विषयावर आधारीत असतो, असू शकतो. इथे दोन ओळीत पूर्ण कथा सांगायची असते. त्यामुळे वाचणाऱ्याला 'बिटवीन द लाइन्स' वाचण्याचा प्रयत्न करावा लागतो. असो
धन्यवाद !

अभ्या..'s picture

22 Mar 2017 - 6:32 pm | अभ्या..

थ्यांक्स विशालभाव,
अ‍ॅक्चुअली ही कन्सेप्ट (वेगवेगळ्या विषयाच्या शेरांचे सेटस म्हणजे गझल) मला माहीत नव्हते, आता त्याची संगती लावून परत बिटवीन द लाईन म्हणले तर दोनच ओळीत विषय संपणार तेंव्हा त्याच्यामधली लाईन मला समजेल का नाही शंकाच आहे. शिवाय नियम, बंधने, मात्रा, वृत्ते अशा गोष्टीत बांधलेले लिखाण म्हणले की तडजोडी आल्या.
सो आता लांबच मराठी गझल ह्या प्रकरणापासून.
धन्यवाद.

विशाल कुलकर्णी's picture

22 Mar 2017 - 7:11 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद, स्वारस्य असेल तर उलगडून सांगेन निवांत, अर्थात तुमच्या खरडवहीत. कारण प्रत्येकाने लावलेला अर्थ वेगळा असू शकतो. आणि मला कुणाच्याही मतांवर अतिक्रमण करायचे नाहीये.

आधी होते स्वारस्य. आता नाही.
धन्यवाद

विशाल कुलकर्णी's picture

22 Mar 2017 - 5:43 pm | विशाल कुलकर्णी

बाकी इनव्हर्टेड कॉमामधले शब्द काय किंवा एकुणातच इतर शेर काय, हे सगळे रूपकात्मक वापरलेले आहे. गद्य आणि काव्य यात हाच तर फरक असतो.

सत्यजित...'s picture

22 Mar 2017 - 6:13 pm | सत्यजित...

शेवटचे तीनही शेर आवडले!

शार्दुल_हातोळकर's picture

22 Mar 2017 - 9:12 pm | शार्दुल_हातोळकर

विशालजी तुम्ही दिलदारपणे समजुन घ्याल असे वाटते म्हणुन काही शेरांमधे किंचित बदल सुचवु का?

सगळे खरेच आहे खोटे कुणी न येथे,
रचल्या चितेस सांगा बोलाल का हो काही ?

'योगी' कितीक झाले, होतील लाख मुल्ला
ऐन्यास बोल थोडा लावाल का हो काही ?

झोळी गळ्यात घेऊन आहे उभाच दारी
पुत्रास त्या 'बळीच्या' वाढाल का हो काही ?

येतील दिवस तेही नांदु पुन्हा सुखाने
आशा चुकार वेडी रुजवाल का हो काही ?

विशाल कुलकर्णी's picture

23 Mar 2017 - 8:43 am | विशाल कुलकर्णी

शार्दुल भाऊ, मनःपूर्वक आभार. तुमची पोस्ट वाचल्यावर पाहीले तेव्हा लक्षात आले की हो असेही होवू शकते, तुम्ही सूचवलेल्या फॉर्ममध्ये लय व्यवस्थीत पकड़ता येतेय. अर्थात वृत्त आता आहे तसेही असले तरी चालतेच, फक्त प्रत्येक ओळीला नवीन वृत्त घेतले नाही म्हणजे मिळवले. धन्यवाद.
सध्याचे वृत्त आहे "गागालगा लगागा गागालगा गागागा"

तुम्ही सूचवलेल्या सुधारणेत एक गोची आहे. शेराच्या दोन्ही ओळीत दोन वेगळी वृत्ते येताहेत. पहिल्या ओळीत
"गागालगा लगागा गागालगा लगागा" तर दुसऱ्या ओळीत "गागालगा लगागा गागालगा गागागा" ! गझलेच्या नियमात हे मात्र बसत नाही, चालत नाही. संपूर्ण गझल एकाच वृत्तात हवी. आयदर धीस ऑर दॅट !

तस्मात सद्ध्याच्या वृत्ता ऐवजी "गागालगा लगागा गागालगा लगागा" केले तर अजुन लयीत येईल.

********************

सुधारीत आवृत्ती

रस्त्यास त्या बिचाऱ्या सांगाल काय काही ?
पथभ्रष्ट भास्कराला शिकवाल काय काही ?

सगळे खरेच आहे खोटे न येथ कोणी,
रचल्या चितेस सांगा बोलाल काय काही ?

'योगी' कितीक झाले, होतील लाख मुल्ला
ऐन्यास बोल थोडा लावाल काय काही ?

झोळी गळ्यात बांधुन दारात वाट पाहे
पुत्रास त्या 'बळीच्या' वाढाल काय काही ?

पात्रामध्ये नदीच्या प्रेते सडून गेली
पाण्यास मार्ग आता दावाल काय काही ?

येतील दिवस तेही नांदू पुन्हा सुखाने
आशा चुकार वेडी रुजवाल काय काही ?

********************

शार्दूलभाऊ, पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार

शार्दुल_हातोळकर's picture

23 Mar 2017 - 11:51 am | शार्दुल_हातोळकर

अगदी सहमत !! :)
आता खुपच छान झाली आहे गझल !!