माझी दिवाळी

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
1 Nov 2013 - 7:21 pm

नमस्कार मिपाकरहो,

दिपावली अभिष्टचिंतन!

कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो. काहीजणांचे फटाके प्रत्यक्षात तर काहीजणांचे मनात तडतडतायत. पूर्वी दिवाळीत ही मज्जा होती, अमूक गोष्टी केल्या, आता त्या बदलल्या आहेत. त्याबद्दलची आवड निवड, घरी आपण किंवा मुलाबाळांनी कौतुकाने केलेले आकाशकंदील, रोषणाई, किल्ले, फराळाचे सजलेले ताट, रांगोळ्या, सहज आलेली आठवण, जमलेले/फसलेले फराळाचे पदार्थ, लक्षात रहाण्यासारखे प्रसंग आपण या धाग्यावर मांडूया. चला तर मग! होऊ दे सुरुवात!

रांगोळी स्पर्धेसाठी वेगळा धागा येतो आहे. स्पर्धेव्यतिरिक्त इतर रांगोळ्या इथे चिकटवायला हरकत नाही.

हे ठिकाणसंस्कृतीकलापाकक्रियासमाजजीवनमानराहणीमौजमजाछायाचित्रणप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादअनुभवप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Nov 2013 - 11:18 pm | मुक्त विहारि

प्रतिसाद नंतर देइनच

मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;)
चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

पैसा's picture

2 Nov 2013 - 1:27 am | पैसा

मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 Nov 2013 - 3:38 am | निनाद मुक्काम प...

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ
अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण
दिवाळी अंक
अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात ,
शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा.
आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो
चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो.
अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो ,
आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या's picture

3 Nov 2013 - 7:51 pm | अनन्न्या

लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे.
दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे.
नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!!
फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

पैसा's picture

3 Nov 2013 - 9:38 pm | पैसा

दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

स्पंदना's picture

8 Nov 2013 - 5:30 am | स्पंदना

आहा! काय वर्णन आहे.
अगदी मस्त वाटल वाचुन. अनन्न्या मनात आनंद असेल ना तर खरच काहीच आडव येत नाही हे पटल.

पाषाणभेद's picture

3 Nov 2013 - 9:53 pm | पाषाणभेद

मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची.
आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा!

- करूना कर्पूर
(शब्दांकन - पाषाणभेद)