जातं
माणूस जात्यात पडतो किंवा टाकला जातो. जातं फिरत राहतं निरंतर स्वत:च किंवा नियंत्याकडून. दोन भागांच्या मध्ये तितकीशी जागा नसते ऐसपैस आणि नसते अगदीच कमी सुद्धा. कुणी सहज सामावून जातो किंवा कुणी अडून बसतो. जातं अडत नाही, फिरत राहतं. स्थिरावलेल्यांची सोलतं कातडी आणि हिसकावून घेतं जास्तीची जागा. फटीतली जागा बदलत राहते आणि बदलतात सोबती, सुख-दु:ख दोन्हींतले. जातं तेच राहतं. मार्ग तोच राहतो पण बदलते गती. दिशा एकच असते नेहमी, वळणं ओळखीची नसतात. जात्याला असतात खाचाखोचा घडवलेल्या किंवा घडलेल्या. त्या अवघड जागा आकार देतात जीवनाला चांगला किंवा वाईट, पण नवा.