जीजी

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जनातलं, मनातलं
21 Jun 2020 - 7:31 am

नमस्कार.

कित्येक वेळा छोट्या छोट्या घटना, गोष्टी आपल्याला आपल्या पूर्वायुष्यात नेतात. ह्या घटना एखाद्या दिव्याच्या बटनाप्रमाणे असतात, बटन दाबले की लख्ख प्रकाश पसरतो तसे आपल्याला काहीतरी अचानक आठवते. जीजी म्हणजे माझी आजी, तिच्या विषयीची खालील आठवण ही अशीच एका रेडिओ प्रोग्रॅमवरून जागृत झाली.

जीजी

आज सकाळी ऑफिसला येताना एन.पी.आर. रेडियोवर (ह्युस्टनचे लोकल रेडिओ स्टेशन) एक ‘स्टोरी कोर’ नावाचा कार्यक्रम ऐकला. तसा तो दर शुक्रवारी ब्रॉडकास्ट होतोच म्हणा पण आज ऐकायचा योग आला. ह्या कार्यक्रमात एखादी व्यक्ती तिच्या जवळच्या व्यक्ती विषयीच्या किंवा प्रसंगाच्या आठवणी सांगते, कार्यक्रम जेमतेम पाचच मिनिटांचा असतो त्यामुळे तेव्हढ्या वेळात मोजकंच पण समर्पक बोलावे लागते. आजच्या कार्यक्रमात एका रेचल नावाच्या ५० वर्षाच्या स्त्रीने तिच्या आजी विषयीच्या आठवणी सांगितल्या.

“माझी आजी इतर आज्यांसारखीच फार फार प्रेमळ होती, ती आम्हा मुलांची फार काळजी घ्यायची, आईने जेव्हढे शिकवले नाही त्याच्या अनेक पटीने ती आम्हाला वेगवेगळे कलागुण शिकवायची. लोकरीचे कपडे विणणे, कपडे शिवणे, बागकाम करणे, चित्रे काढणे, क्रोशाचे रुमाल विणणे, फुलदाणी सजवणे, ह्या कला आम्ही सर्व भावंडे तिच्याकडूनच शिकलो. पण तिला सर्वात जास्त काय आवडायचे तर जेवण बनवणे व ती आम्हाला वेठीस धरून (निदान त्या खेळण्या-बागडण्याच्या वयात तरी ते तसे वाटायचे) नवनवीन खाद्यपदार्थ बनवत असायची. जेवायला बसल्यावर, ‘हे रेचलने बनवले आहे, हे रॉलीने, हे पॅट्रिकने असे आवर्जून कौतुकाने इतरांना सांगत असे व आम्ही नुसता कांदा किंवा पार्सली जरी चिरली असली तरी आम्ही खुश होत असू. तिच्या ह्या कौतुकामुळेच मला जेवण बनविण्याची गोडी लागली. माझ्या आजीकडे एक पाककृती विषयी पुस्तक होते त्यातील सर्वच पदार्थ तिने बनवले होते व त्यात तिने स्व:ताचे निरीक्षण देखील मांडले होते. एखादा जिन्नस हाताशी नसल्यास त्या ऐवजी इतर कोणता जिन्नस वापरून पदार्थ रुचकर बनवता येतो, किंवा कृतीत थोडासा बदल केल्यास वेळ वाचवता येतो वगैरे निरीक्षणे तिने त्या पुस्तकात लिहिली होती. आजी त्या पुस्तकाला अगदी जीवापाड जपायची, कधीही तिने त्या पुस्तकाला जेवण बनवताना खरकटे हात लागू दिले नाहीत. एखादी पाककृती बनवताना ती आधी सर्व सामग्री, जिनसा काढून ठेवी, त्या पाककृतीचे पान उघडे ठेवी व नंतरच चूल पेटवी. पदार्थ बनवताना तिने कधीही पुस्तकाला हात लावला नाही व काम झाल्यावर ती ते पुस्तक स्वच्छ हाताने उचलून कपाटात जागच्या जागी ठेवून देत असे."

"मला वाटते त्यावेळी मी दहा वर्षांची असेन, आजीने एकदा बीटाची कोशिंबीर करायची ठरवली व नेहेमी प्रमाणे आम्हा मुलांना ओलीस धरले. पॅट्रिककडून परसदारातून बीटाचे कांदे आणवले, रॉलीकडून ते धुवून घेतले व मला ते सोलून किसणीवर किसायला बसवले. बीट किसताना माझे दोन्ही हात मस्तपैकी लालबुंद झाले होते जे पाहून मला खूपच मजा वाटत होती, आनंद होत होता. आजीने चुलीवर पातेले ठेवले होते व मला तिने टेबलावर ठेवलेल्या पुस्तकात पाहून पुढील कृती वाचायला सांगितली. आजीला जरी कृती पाठ होती तरी मी ती शिकावी ह्या हेतूने तिने ती मला वाचायला सांगितली होती. मी माझे दोन्ही हात मागे घेऊन टेबलावर वाकून पुस्तकात डोकावून वाचत होते तेव्हढ्यात जोराचा वारा आला आणि ते पान उलटले गेले. अनावधनाने मी माझ्या बिटाच्या रंगाने रंगलेल्या हाताने ते पान काढायला गेले व त्या पानावर माझ्या पंज्याचा ठसाच उमटला. ते बघितल्यावर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला, आता आजीकडून चांगलाच ओरडा बसणार व कदाचित दोन धपाटे देखील खावे लागणार ह्या कल्पनेने मी जोरात भोकांड पसरले. पॅट्रिक व रॉली देखील आता काय होणार ह्या उत्सुकतेने बघू लागले. आजी जवळ आली, तिने किसलेल्या बीटाचे पाणी स्व:ताच्या हातांना लावले व माझा पंजा ज्या पानाला लागला होता त्याच्या बरोबर मागच्या बाजुला स्व:ताचा पंजा उमटवला. एक क्षण माझा विश्वासच बसेना, आजीने तिच्या प्राणप्रिय पुस्तकावर, जी एक साधा डाग पडू देत नव्हती त्या पुस्तकावर जाणूनबुजून स्व:ताचा पंजा उमटवला ? आम्ही तिघेही भावंडं चकित होऊन तिच्याकडे पाहातच राहिलो. पुढच्याच क्षणी तिने मला जवळ घेतले, माझे डोळे पुसले व छानसा कीस घेतला. आजही चाळीस वर्षांनी तो क्षण अगदी कालच घडल्यासारखा लख्ख आठवतोय. आजीचे ते पाककृतीचे पुस्तक माझ्याकडे आजही आहे व ज्या ज्या वेळी मी ते पुस्तक उघडते त्या त्या वेळेला मला माझी आजीच आठवते, मग आवर्जून मी ते पान उघडते व आजीच्या पंजावर हात ठेऊन डोळे मिटून हलकेच तिच्या कुशीत शिरते."

रेचलची ही आठवण मला माझ्या आजीची, जीजीची आठवण देऊन गेली. आई गेल्यावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीजीनेच आम्हा सहा भावंडांना मोठे केले. जीजीच्या हाताला एक वेगळीच चव होती आणि तिच्याकडे चविष्ट पदार्थांची यादीच होती. सार, नितळ, कढवणी, मुगोडी, कालवण, खारवणी, आंबट वरण, आमटी सारख्या पदार्थांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. कधीतरी आम्ही म्हंटले की जीजी आज आमटी चांगली नाही झाली की तिचे उत्तर तयार असायचे “हात गोड की हंजण गोड ?” ‘हंजण’ म्हणजे मसाला, म्हणजेच हवा तो मसाला असला तरच जेवण चांगले होऊ शकते, असा तिच्या बोलण्याचा मतितार्थ असायचा. तेच एखाद्या दिवशी तिच्या जेवणाची स्तुती केली की लगेच तिचा नेहेमीचा ठरलेला डायलॉग फेकायची, “हात गोड की हंजण गोड ?” इथे मात्र वाक्य तेच असले तरी त्याचा अर्थ बरोबर उलटा असायचा, “मसाल्याला काही अर्थ नसतो, खरी चव हातालाच असते.” तर अशी ही आमची जीजी.

रेचलच्या आजीच्या निमित्तानी आमची जीजी आठवली, आज ३१ मार्च २०२०ला तिला जाऊन बरोबर ३१ वर्षे झाली.

कथाविचार

प्रतिक्रिया

आठवण आणि लिखाण दोन्ही सुंदर.. आवडले

सविता००१'s picture

24 Jun 2020 - 9:25 am | सविता००१

आठवण आणि लेखनही.
आजी कुठल्याही देशातली असो, ती आजीच असते. तशीच. प्रेमळ, रागावणारी, लाडही करणारी, वेगवेगळे पदार्थ आणि घरगुती औषधे पोतडीत असणारी आणि गोष्टीही सांगणारी.
समृद्ध करतात ही माणसे आपल्याला.

सुंदर आठवण आणि लेखनही, लिहीत रहा !!!