स्मृतीची पाने चाळताना: चार
आयुष्यातील बराचकाळ गावमातीच्या सानिध्यात, निसर्गाच्या नितळ सहवासात व्यतित झाला. निसर्गाचे नावीन्याने नटलेले सारे आविष्कार नाना रंग धारण करून पावलोपावली रोजच भेटत राहिले. प्रत्येक ऋतूत पालटणारी त्याची नानाविध रूपं मनात साठत गेली अन् घट्ट रुजत गेली. पाऊस हळवा कोपरा धरून हृदयात विसावलाय. कधी धोधो कोसळणारा, कधी रिमझिम बरसणारा, कधी चिंब भिजवणारा पाऊस मनाला नुसताच पुलकित करीत गेला असे नाही, तर समृध्दही करीत गेला. तेथें रुजलेलं पाऊस नावाच्या आठवणींचं रोपटं वाढत्या वयासोबत नवनवे रूपं घेऊन बहरत राहिले. त्याचं रिमझिमणं, बरसणं, धोधो कोसळणं अनवरत सोबत करीत राहिले. भेटत राहिले.