आमच्या गावात अठरा पगड जातीं.
एकमेकांना पूरक आणी गावगाड्याचे महत्त्वाचे घटक. एकोपा हा गावाचा कणा तर एकमेकांन बद्दल असणारे प्रेम, आदर आणी आस्था हा आत्मा. तुम्हाला सांगतो हे आज जर कुणी वाचले तर म्हणेल काय फेकता राव!
पुढे वाचा म्हणजे कळेल.
तुम्हाला माहितीच आहे की हिन्दू संस्कृती प्रमाणे अंतेष्टी हा सोळा संस्कारां पैकी एक आणी त्यातील मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म हा त्यातला एक भाग.
लहानपणी गावात जर कुणाचा मृत्यू झाला तर बातमी वार्यासारखी पसरायची. शेजारी पाजारी व नातेवाईकां बरोबर गावातील काही ठराविक मुले माणसं जरुर हजर आसायची.
लागणारे मर्तिकाचे सामान बिनबोभाट यायचे.गावात एक पायंडा होता कुंभार मडकं, कपड्याच्या दुकानातून कापड, स्टँड वरचा बुरुड बांबू व बांबूच्या कामट्या हे सर्व पैसे न घेता पुरवायचे.
तर तो हा बुरुड .आमच्या छोट्याशा गावात कणगी,टोपली, सूप, दुरडी, नैवेद्याचे द्रोण, रुखवताच्या लहान दुरड्या गुढी करता बांबू विकणारा, धनाने जरी दरिद्री होता पण त्याच्या मनाची श्रीमंती कुबेराला लाजवणारी होती. मर्तिकाच काम पुण्याचं , पैसा घेणार तर नर्काचा धनी.
'बुरड' हा संस्कृत शब्द, बुरड म्हणजे 'टोपली' यावरून टोपली बनवणारा म्हणजे 'बुरूड.सूप आणि दुरडीचं स्थान रोजच्या आयुष्यातलं .पुर्वी प्रत्येकाच्या घरात धान्य पाखडून स्वच्छ करण्यासाठी सूप असायचेच अन्नधान्याच्या स्वच्छतेशी संबधित असलेल्या सुपाशिवाय घर ही संकल्पनाच पूर्ण होत नव्हती . आता धान्य नाही, दळण नाही सगळ काही रेडीमेड पर्यायाने सुपाची हकालपट्टी ,कैसरोल,बास्केट,प्लास्टिक चटया आणी मोठालै पिंप यांनी टोपल्या, कणग्या,दुरड्यांची जागा घेतलीय. सुप तर आता धार्मिक कार्यापुरतेच.
अर्थात खेडोपाडी अजुनही हा कलाकार आणी त्याची कला जोपासली जात आहे. याचे कौशल्य याच्या बोटात. एक धारदार कोयता मांडी खाली दाबून बांबूच्या पातळ पट्ट्या करायच्या आणी त्या एकमेकात सफाईदारपणे गुंतवत टोपल्या ,दुरडया ,सुप, कोणत्या विणायच्या. थोडा लाल, गुलाबी व हिरव्या रंगाच्या पट्ट्या मारुन डेकोरेशन की माल तयार.
सुपाचे धार्मिक महत्व देखील आहे! अनेक पूजाअर्चांच्या वेळी पूजेचे समान सुपातच ठेवले जाते. संक्रांत, दिवाळी, पाडवा अशा सणाच्या वेळी पूजेच्या वस्तू सुपातूनच आवर्जून नेल्या जातात. सूप हे धान्य स्वच्छ करण्याचे काम करत असल्यामुळे त्याला एक विशेष पावित्र्य आणि मांगल्य प्रतिक म्हणून मानले जाते. वासुदेव,नंदी बैलवाला याना आमची आई सुपातून धान्य वाढयची त्याला वाढलेल्या धान्यातला काही धान्य तो सुपात शिल्लक ठेवायचा आणि आई ते धान्य पुन्हा आपल्या धान्याच्या साठ्यात टाकायची. म्हणायची यामुळे धान्य वृद्धी होते.
लग्नात आलेल्या चिकट रेंगाळणारी पाहुणे मंडळी चला सुप वाजलं म्हणून निघायची तयारीस लागतात.
आता पडदे, ल्याम्प शेड, फुलदाणी, व शोभेच्या वस्तूंची यांनी पारंपारिक टोपल्या, दुरड्यांची जागा घेतलीय.हल्ली तरूण पिढी या व्यवसाया कडे पाठ फिरवताना दिसतेय.
पुण्याच्या बुरुड आळीला दिडशे वर्षा पेक्षा जास्त दिवस झाले असतील.
आमच्या वर्गात एक पवार, त्याचे नाव बहूदा अशोक आसावे तो बुरुड होता. त्याच्या वडिलांची एस टी स्टँड वर बांबूची वखार होती. एकदा, दोनदा गेलो होतो. दिवाळीच्या आकाश कंदिल करता पण तर बांबू लागायचे ना.
मेहनती कलाकार, आजचा लेख आमच्या बुरुड मित्राला समर्पित.
प्रतिक्रिया
3 Mar 2021 - 8:00 pm | टर्मीनेटर
छोटेखानी लेख आवडला 👍
लिहिते रहा!
3 Mar 2021 - 9:27 pm | कर्नलतपस्वी
धन्यवाद
4 Mar 2021 - 3:00 pm | मुक्त विहारि
बांबू हा माझा अभ्यासाचा विषय असल्याने, जास्त भावला...