भावकविता

एक माणूस मिशी काढून..............

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
29 Oct 2015 - 8:08 pm

एक माणूस मिशी काढून शाळेमध्ये पोहचला
बघता बघता खिडक्यांमधून वर्गात जाऊन बसला.
वर्ग भरला मुलामुलींनी
सुरेख हसणे पानांमधूनी
हळूच पाही शाई सांडूनि,
बघते का ती मान वळवूनी!

हातचा राखून गणित चुकले
नजर चकवून भाषा हुकली
कितीक राजे आले गेले
इतिहासाच्या पानोपानी....
छंद जीवाला एकच लागे
रिबिनीमागचे भोळे कोडे!

इकडे तिकडे बघून झाले
मास्तर सगळे येऊन गेले
मधली सुट्टी चिंचा बोरे
मैदानावर सुटली पोरे.....
वर्गासहित उठून गेले
साधेभोळे हळवे कोडे!
भान आले, बाहेर आला....

कविता माझीप्रेम कविताभावकवितासांत्वनाकरुणकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजशिक्षण

नात्याला अर्थ पुरेसा.....

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
23 Oct 2015 - 8:40 am

नात्याला अर्थ पुरेसा, कशास द्यावे नाव?
संपेल कधितरी रस्ता, गवसेल तिथेही गाव… …

गाठावा तीर कसा हा , जणू अथांग सागर; नाते
तू जिथे सोडली तेथे थांबली अजूनही नाव…

जगण्याच्या सायंकाळी , मज तुझी आठवण आली
दूरदेशी तू सखये ,तुज कसे कळावे भाव….

तू मूक ढाळशी अश्रू, पण चरे काळजा पडती
मी वाट पहातो कुठल्या , शब्दांनी भरतिल घाव…

ही खंत कशाला वेडे की उठून गेले सारे?
ठाऊक तुलाही होता, हा सारिपटाचा डाव…

भावकविताकविता

शब्दात नाही गुंतायचं!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
21 Oct 2015 - 11:19 pm

कशाला कुणाला दुखवायच?
शब्दांच्या जाळ्यात अड़कायच?
थोड़ स्वतःत राहायच...
जगण सुंदर करायच!

निसर्ग... प्राणी... पक्षी असतात;
ते कुठे आपल्या भाषेत बोलतात?
स्वतःत ते मग्न असतात..
त्याचं जगण सुंदर करतात!

त्यांच्याकडून थोड़ शिकायच.
जगण्याला जीवन बनवायचं...
मात्र शब्दात न गुंतता...
आयुष्याला हिरवं बनवायचं!

भावकविताकविता

कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
21 Oct 2015 - 4:41 pm

कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे
कुणा बोलुनी कोण चुकले बघा रे

कुणी होत वाचाळ थयथय उगाच
कुणी शांत राहून ठेवीत जाच

कसे सिद्ध होईल श्रेष्ठत्व त्याचे
असे सैन्य नाठाळ ज्या राजियाचे

कृतीतून ठरते इथे कोण वाघ
मुखे बोंबलोनी करी काय सांग

एकीत असते रहस्य यशाचे
तुम्हाला महत्व न पटले अशाचे

तुम्ही स्वाभिमानात धन्य जहाला
तिथे एक चेहरा भुलवतो जगाला

असे वेळ हाती न वागा असे रे
कशाला करावे स्वतःचे हसे रे

इथे संधी सर्वांस आहे समान
भूतापरी हो जपा वर्तमान

भावकविताशांतरसकवितासमाजराजकारण

चारचा चहा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
14 Oct 2015 - 8:43 pm

चारचा चहा touch screen असतो!
कपाच्या कानाला गुदगुल्या केल्या कि
आतल्याआत मस्तसे हसतो,
How's the day? म्हणून
मिश्कीलपणे विचारतो!

चारचा चहा screen saver असतो!
शरीराचा tab refresh करतो
मनाचे software update करतो,
What's on your mind? म्हणून
खोडीलपणे विचारतो!

चारचा चहा google map असतो !
मनाचा cursor global होतो
पण हातातला mouse local च राहतो
...... ............. ............ .......
............ हळूहळू चारचा चहा धूसर होतो
अरबी समुद्रापार दिसेनासा होतो......... !

आरोग्यदायी पाककृतीकविता माझीकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीफ्री स्टाइलभावकवितामुक्त कवितासांत्वनासंस्कृतीकविताप्रेमकाव्यमुक्तकसमाजजीवनमानदेशांतर

एकाकी

सुमित_सौन्देकर's picture
सुमित_सौन्देकर in जे न देखे रवी...
13 Oct 2015 - 6:50 am

तिथे थांबतोय
जिथे थांबायचं न्हवत
ठरवलं होत
मागे वळून पहायचं न्हवत

ती अंधार खोली
पुन्हा उघडतोय
मोडलेल्या फडताळात
स्वताला शोधतोय

सोफ्यावरली धूळ झटकून
बसून क्षणभर डोळे मिटलेयत
क्षणभरातच त्यांनीसुद्धा
चुकांची चलचित्र पाहिलेयत

जगाच्या वेगासोबत धावताना
मागे खूप काही राहून गेलय
कृत्रिम आनंदाच्या हट्टापाई
निरागस हसण विसरून गेलोय

चव यशाची मिळवायला
आजवर फक्त स्पर्धा केलीय
दिखाउपणाच्या गर्दीसाठी
आपल्यांची आहुती दिलीय

भावकविताकविता

म्हणता म्हणता ......

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
2 Oct 2015 - 8:28 am

काहीच नाही म्हणता म्हणता
चंद्राभवती पडले खळे,
खळेच पडले इतके सुंदर
चंद्र दिसेना त्यानंतर!

काहीच नाही म्हणता म्हणता
चाफ्याभवती पान उमटले
पानच इतके गर्भरेशमी,
फूल दिसेना त्यानंतर!

काहीच नाही म्हणता म्हणता
बागेभवती जडली माया
माया इतकी गर्दसावळी
बाग दिसेना त्यानंतर!

काहीच नाही, काहीच नाही
कशी म्हणू मी यानंतर?
तव श्वासांचे गान ऐकते
इथले तिथले मिळून अंतर!

कविता माझीभावकवितामुक्त कविताकविता

अतूट काही...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
1 Oct 2015 - 6:20 pm

पाप पुण्य अन् काल आजच्या
पल्याडही जर असेल काही,
अनादि, आदिम त्या तत्वाशी
नाळ जोडली आहे माझी ...

काळाची विक्राळ कातरी
कापू पाहते त्या धाग्याला..
जळजळीत कधी चटके देतो
तीव्र अतीव दु;खाचा प्याला..

गळ्यात बेडी अंध भक्तीची
प्राण तिचे कंठाशी येती..
डोळस, निर्दय नास्तिकतेचे
घाव बैसती माथ्यावरती ..

पण
अतूट आहे टिकून अजुनी
जीर्ण बकुळीसम ती ताजी..
अनादि आदिम त्या तत्वाशी
नाळ जोडली आहे माझी..

भावकविताकविता

प्रीत धुंदी

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
26 Sep 2015 - 12:38 pm

कैफ होता धुंदीचा...
अन् धुंद होती रात ही
हवा-हवासा स्पर्श होता...
अतृप्त प्रीत बहरली

कमनिय तू कामिनी ग
अन्.. पुरुरवा मी तुझा
चुंबिता ती नयनपुष्पे
चंद्रही नाभिचा लाजला

ये प्रिये.. नच दूर लोटु
मी चकोर तू चांदणी
गगन भरल्या चांद राति
विरघळू दे तुझ्यात मी

भावकविताकविता

ll गंगास्मरण ll

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
26 Sep 2015 - 1:11 am

सप्टेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार हा जगभरात 'सरिता दिन' म्हणून साजरा केला जातो.
(जगभरातील नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहेच.) पण आजच्या दिवशी, परमपावन मानल्या गेलेल्या गंगेचे, तिच्या नितळ स्वरूपात केलेले स्मरण समयोचित ठरावे!

तू कावेरी तूच नर्मदा, गोदा भद्रा सरस्वती
तुझीच सारी अनंत रूपे, कृष्णा पद्मा शरावती

तू कल्याणी, नीरदायिनी
तुलाच नमितो सांबसदाशिव,
हरहर गंगे तुलाच स्मरती
भगिरथाचे पुत्र चिरंजीव

प्रकटयोगिनी बिकटगामिनी
तुझ्या तटाचे कडे निसरडे….
कितीक आले गेले भुलले
तुझ्या किनारी शांत निमाले

कविता माझीभावकवितासांत्वनाकरुणमांडणीवावरसंस्कृतीइतिहासवाङ्मयकवितामुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोल