जायचे आहेच तर जावेस आता ..
जायचे आहेच तर जावेस आता
का असे वाटेत थांबावेस आता
मी तुला द्यावे असे उरले न काही
तू हवे तर दु:खही न्यावेस आता
ही किती तलखी जिवाची होत आहे
ग्रीष्म तू विझवून टाकावेस आता
संपवाया अंतरे माझ्यातुझ्यातिल
जवळ थोडे आणखी यावेस आता
अडथळ्यांना टाळणेही ठीक नाही
अडथळे मोडून काढावेस आता
मी प्रतिक्षेचा पुरावा काय देऊ
तू युगे चालून ठरवावेस आता
- डॉ.सुनील अहिरराव