समुद्र
तासंतास समुद्र प्यायलो मी,
दिवसभराचा सारा मुद्राभिनय,
तपशिलासकट, थोडा-थोडा करून...
बराच समुद्र प्यायलो मी.
समुद्र....
स्वत:हुन जवळीक साधत,
पायांशी घोळणारा...
अथवा, सगळी गरळ मागे टाकुन,
कोरडा निघून जाणारा.
सारे ढग हाकून थकल्यावर,
सूर्य गिळायला मोकळा झालेला..
लाल समुद्र.
एक दिवसाचा समुद्र फाडून ओतला
डोळ्यांमध्ये, मावळत्या तप्त सुर्यासकट.