अवेळी असे मेघ दाटून येता.....
अवेळी असे मेघ दाटून येता
जुन्या वेदनांनी पुन्हा पाझरावे.
जरी कष्ट झाले विसरण्यास ज्याना
जुन्या त्या क्षणांना पुन्हा आठवावे.....
कितीदा पडावे, कितीदा वहावे
धडे अनुभवांचे किती साठवावे.
किती आर्जवे अन किती ती प्रतीक्षा
किती चातकाने मना समजवावे ....
पुरे ओढ वेडी घनांची अनावर
दुरूनी अता पावसा न्याहळावे..
जपावा मनातील पाऊस थोडा
परी भावनांच्या पुरा थोपवावे....
अवेळी असे मेघ दाटून येता
मनाच्या नभाला जरा आवरावे....