स्वतंत्र
अणु-रेणूंपासून ग्रह-ताऱ्यांपर्यंत
मुंगीपासून-देव माश्यापर्यंत
सगळेच बद्ध -
कुणी भौतिक
तर कुणी
निसर्गदत्त सहज-प्रेरणेच्या
आपापल्या कक्षेत.
एकटा माणूसच
या सगळ्याला अपवाद -
आपल्या अंतरीच्या अंधार-उजेडातून
ऊन-सावल्यांतून
भ्रमांच्या, दुविधांच्या, वंचनांच्या, चुकांच्या
नागमोडी वाटांनी भटकायला मोकळा
हेच आहे त्याचं ओझं
हीच आहे त्याची व्यथा
हाच आहे त्याचा गौरव
हीच आहे त्याची महत्ता