आयुष्य ना सुखांचे अंधार दाट होता
बुद्धयाच वेदनांशी श्रृंगार थाटलेला
झाली उजाड़ स्वप्ने, सत्यास दंभ होता
चातुर्य प्राक्तनाचे कळलेच ना कदापी
रक्तास चटक ओल्या लागून आज गेली
जखमाच त्या, तयांशी, संसार थाटलेला
अस्तित्व जाणिवांचे उधळून रात्र गेली
त्यां टाळणे मलाही जमलेच ना कदापी
होता तसाच आहे ओसाड माळ तिथला
पान्हा वसुंधरेचा वक्षात गोठलेला
मी रान शुष्क होतो पाऊस स्तब्ध तिथला
गोंजारणे फुलांना रुचलेच ना कदापी
झाडांस कोरडेपण जेव्हा असह्य झाले
तो कोंब पालवीचा बुंध्यात आटलेला
तो बहर जून होता फसवेच गंध झाले
ते श्वास पाळणेही पटलेच ना कदापी
विशाल कुलकर्णी
प्रतिक्रिया
26 Jul 2015 - 8:40 pm | एक एकटा एकटाच
Classssssss
26 Jul 2015 - 8:49 pm | दमामि
वाह! फक्त
तो बहर बेगडी होता फसवेच गंध झाले
यातील होता काढून अन् केले तर?
चुभूद्याघ्या.
27 Jul 2015 - 10:33 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद दमामि ! आधी तिथे 'अन्' हाच शब्द वापरला होता मी, पण एकतर त्यामुळे वृत्तभंग होतोय. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्या ओळीतून जो परिणाम साधला जायला हवाय तो धुसर होतोय. "बेगडी अन् फसवे" असे म्हणताना बेगडी आणि फसव्या या दोन्ही शब्दांचा परिणाम, (इन्टेसिटी म्हणू हवे तर) कमी होतेय. विभागली जातेय. मला त्या दोन्ही भावना ठळकपणे यायला हव्या आहेत पण वाक्यही तोडायचे नाहीये. म्हणून मग 'होता'. 'होता' हे क्रियापद असल्याने या ओळीतले पहिले वाक्य, पहिले विधान तिथे संपते आणि त्याचबरोबर दुसरे विधानही अधोरेखीत होते.
धन्यवाद.
27 Jul 2015 - 10:37 am | विशाल कुलकर्णी
हि कविता आनंदकंद वृत्तातली आहे.
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा
27 Jul 2015 - 7:36 pm | विशाल कुलकर्णी
सॉरी दमामि शेठ, तुम्हीच बरोबर होता.माझीच रचना चुकीची होती. या ओळीतच वृत्तभंग होतोय. तुम्ही म्हणाल्या प्रमाणे "तो बहर बेगडी अन् ,फसवेच गंध झाले" हेच योग्य होईल. प्रतिवाद केल्याबद्दल क्षमस्व आणि चूक लक्षात आणून दिल्याबद्दल खुप खुप आभार _/!\_
27 Jul 2015 - 8:01 pm | विशाल कुलकर्णी
किंवा अन च्या ऐवजी "तो बहर जून होता, फसवेच गंध झाले" हे जास्त सुट होइल असे वाटतेय. 'अन्'तांत्रिक दृष्टया जरी योग्य असला तरी त्याने सौंदर्याला बाधा येतेय.
संपादक मंडळी, कृपया मुळ कवितेत हां बदल करणार का?
"तो बहर जून होता, फसवेच गंध झाले" . धन्यवाद .
26 Jul 2015 - 10:38 pm | जडभरत
खूप सुंदर! अंतरास छळणार्या दुःखांनाच शब्दरूप दिलेत.
मानवी दुःखांचं बायबलच!!!
तुम्हाला माहिते तीव्र दुःखांची सुद्धा एक वेगळीच मादक नशा असते. तसाच अनुभव आला वाचताना! मस्त!!!
26 Jul 2015 - 11:27 pm | अत्रुप्त आत्मा
A1
26 Jul 2015 - 11:27 pm | प्यारे१
वाह! विशालभो मस्त. थोडं अडखळायला झालं फ़क्त
27 Jul 2015 - 9:11 am | प्रचेतस
अप्रतिम कविता.
27 Jul 2015 - 9:47 am | प्रीत-मोहर
मस्त कविता!!!
27 Jul 2015 - 10:33 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद मंडळी !
27 Jul 2015 - 11:47 am | रातराणी
व्वा! हे अशक्य सुंदर लिहलयस विशालदा. _/\_
27 Jul 2015 - 12:57 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद रातराणी :)
27 Jul 2015 - 7:37 pm | विवेकपटाईत
सुंदर कविता आवडली.
11 Aug 2015 - 5:59 pm | राघव
खूप दिवसांनी वाचली तुझी रचना. अर्थातच आवडली!
अवांतरः
हक्कानं काही सांगू का? ते वृत्त वगैरे बघून रचना करू नकोस रे. तुझ्या कल्पना खरंच छान असतात. पण उगाच वृत्त/छंद/अलंकार यांच्या भानगडीत न पडता, त्या कल्पनांना सहज सोप्या भाषेत उकलत जाणं हे जास्त महत्त्वाचं, असं मला वाटतं. As someone has said it, Simplicity is the most Complicated thing to achieve. जे रचनाकाराला अभिप्रेत ते तसंच आणि सहजपणे वाचक/श्रोत्यांना समजणं हे रचनेचं साध्य असायला हवं. एकदा ते साधलं की बाकी सर्व गौण ठरतं.
अर्थात् वृत्त/छंद/अलंकार कधी वापरूच नयेत असं मी म्हणत नाही. पण ते सहजगत्या यावं.. कळी उमलते तितकं सहज आणि स्वाभाविक असावं इतकंच म्हणायचं आहे. चु.भू.द्या.घ्या.
12 Aug 2015 - 3:21 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद राघव !
नक्कीच प्रयत्न करेन. तसेही मलातरी कुठे आवडते कुठल्या बंधनात बांधून घ्यायला. :)
11 Aug 2015 - 8:38 pm | पैसा
अप्रतिम कविता!
11 Aug 2015 - 9:35 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
दर्जेदार रचना
12 Aug 2015 - 8:02 pm | कैलासवासी सोन्याबापु
जबरी रे!!!