देवाक काळजी
जगात देव आहे! निश्चितच आहे. हा पहा माझा स्वतःचा अनुभव!
माझे बाबा असतील सत्तर – पंचाहत्तरीचे. त्यांचे खरं वय काय ते त्यांनाही माहीत नाही मग आम्हाला कसं माहीत असणार. आमच्या आजोबांनी बाबांचा पहिलीत प्रवेश घेताना त्यांची जन्मतारीख अशीच ठोकून दिली होती. बाबा नेहमी मला सांगायचे, “मी पहिलीत होतो तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले.” अश्या थाटात सांगायचे की बाबांनी शिकायचे मनावर घेतले त्यामुळे गदगदित होऊन राणीने हिंदुस्थानला स्वातंत्र्य बहाल केले.