महाराष्ट्रातील एकमेव रथोत्सव - तासगांव गणपती उत्सव (Tasgaon Rathotsav )

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in भटकंती
9 Sep 2021 - 1:29 pm

आज आपणाला घेऊन जातो आमच्या तासगावच्या प्रसिद्ध गणपती उत्सवाला. आपल्या स्पॉटवर च्या विडिओ च्या माध्यमातून आमच्या गावाच्या रथोत्सव तुम्हा सर्वा पर्यंत पोहचवत आहे.

सातमजली गोपुरांचे आणि २४२ वर्षांची रथयात्रेची परंपरा लाभलेले तासगाव येथील गणेश मंदिर चांगलेच प्रसिद्ध आहे. मराठय़ांचे सरसेनापती म्हणून पेशवाई काळात दक्षिण मुलुखगिरीत टिपू सुलतान, हैदर खान यांच्याशी लढाई गाजविणाऱ्या परशुरामभाऊंनी या मंदिराची पायाभरणी केली, तर त्यांचे पुत्र अप्पा पटवर्धन यांनी कलशारोहण केले.

मराठय़ांच्या स्वराज्यविस्तारात पेशवाईच्या कालखंडात ज्या ज्या सरदारांनी मर्दुमकी गाजविली अशांना दक्षिण भारतातील संस्थाने देण्यात आली. यामध्ये प्रमुख होते ते हरभटबाबा पटवर्धन. पटवर्धन घराण्यातील परशुरामभाऊ पटवर्धन यांना तासगावचा सुभा मिळाला. मूळ पुरुष असलेल्या हरभटबाबांची गणेशभक्ती परंपरागत आली असल्याने परशुरामभाऊ पटवर्धनांनी तासगावमध्ये गणेश मंदिराची उभारणी केली.

तासगावचे गणेश मंदिर हे दाक्षिणात्य स्थापत्य कलेचा वारसा म्हणूनच ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रात कुठेही आढळणार नाही असे गोपूर हे तासगावच्या गणेश मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्टय़. त्याचबरोबर उजव्या सोंडेची गणेशमूर्ती हेदेखील अनोखपण म्हणावे लागले. तासगावच्या गणेशोत्सवातील रथयात्रेला २४२ वर्षांची परंपरा लाभली आहे.

पटवर्धन घराण्यातील मूळ पुरुष असलेले हरभटबाबा हे कडवे गणेशभक्त. त्यांचे मूळ गाव कोकणातील गणपतीपुळ्याजवळील कोथवडे. हरभटबाबांनी दुर्वारस प्राशन करून गणेशपूजा केली असल्याचे सांगण्यात येते. परशुराम हे हरभटबाबांचे नातू. पेशवाईमध्ये अनेक लढायांमध्ये मर्दुमकी गाजवलेले. मराठय़ांच्या मुलुखगिरीत दक्षिणेत वावरत असताना तेथील मंदिराची स्थापत्यकला त्यांना आवडली आणि त्यांनी आपल्या संस्थानामध्ये तासगावला गोपुराचे गणेश मंदिर उभारले.

तासगावचे गणेश मंदिर तीन टप्प्यांत पाहण्यास मिळते. सातमजली ९६ फूट उंचीचे गोपूर, भव्य सभामंडप आणि गाभारा. मुख्य मंदिर ९.४४ ७ ८.८३ मीटर आकाराचे मुख्य मंदिर तर सभामंडप १३.७ ७ १०.३६ मीटर आकाराचा आहे. मंदिरात प्रवेश करीत असताना लागणारे गोपूर सातमजली असून यासाठी कर्नाटकातील गदगहून आणलेल्या दगडांचा वापर करण्यात आला. कर्नाटकातील वडार समाजातील कारागिरांकडून या मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिराच्या बांधकामाला तब्बल २० वष्रे लागली. १७७९ मध्ये सुरू झालेले मंदिरउभारणीचे काम १७९९ मध्ये परशुराम यांचे पुत्र अप्पाजी पटवर्धन यांनी पूर्ण केले.

या मंदिरात उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आहे. गणेशोत्सवात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाचे आगमन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे दीड दिवसात या गणेशाची मिरवणूक काढण्यात येते. १७८५ मध्ये पहिल्यांदा रथयात्रा सुरू करण्यात आली. यासाठी पाच मजली खास रथ तयार करण्यात आला असून प्रारंभी हा रथ लोखंडाचा करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या वर्षांपासून सागवानी लाकडाचा रथ तयार करण्यात आला.

कापूर ओढय़ाकाठी सातशे मीटर अंतरावर असलेल्या काíतकस्वामींना भेटण्यास गणेश रथातून जातो. ३० फूट लांब आणि पाचमजली रथ गणेशभक्त दोरखंडाच्या साहाय्याने ओढत नेतात. या वेळी रथातून गणेशभक्तांवर फुले, गुलाल, पेढे यांची बरसात करण्यात येते. तसेच दर संकष्टीला सायंकाळी पाच वाजता गणेशाची पालखी पश्चिमेस असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात येते.

असा हा उत्सव म्हणजे आम्हा तासगावकरांसाठी एक Get Together च , व्यवसाय , नोकरी , शिक्षण यासाठी बाहेर गेलेला प्रत्येक व्यक्ती आवर्जून न चुकता या उत्सवासाठी उपस्थित रहातो. तुम्हीही कधी वेळ भेटला तर नक्की भेट द्या .

ठिकाण - गणपती पंचायतन संस्थान , तासगाव , तालुका - तासगाव , जि . सांगली

प्रतिक्रिया

स्वधर्म's picture

9 Sep 2021 - 2:15 pm | स्वधर्म

करून दिलीत पाटीलसाहेब. सांगलीच्या गणपती मंदीराचाही असाच इतिहास वाचायला आवडेल. तिथल्या गणपतीची ५व्या दिवशी विसर्जन मिरवणूक निघते. त्यास ‘सरकारी गणपती’ असे म्हणतात.

व्लॉगर पाटील's picture

9 Sep 2021 - 2:26 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद .. हो नक्कीच , लवकरच आपण सांगलीच्या गणपतीची हि माहिती घेऊन येऊ आपल्या मि. पा. वर

कंजूस's picture

9 Sep 2021 - 3:05 pm | कंजूस

मी त्या गोपुरात वर जाऊन आलो आहे. सांगली संस्थानाप्रमाणेच हत्ती आहे पण तो राजवाड्यात असतो. उत्सवात तो देवळात आणून परत नेतात.

देवाच्या मूर्तीस दुरूनच पाहावे लागते. पुजारी एकदाच सकाळी हात लावून पुजा करतो. राजेसाहेबही फक्त उत्सवात गाभाऱ्यात जातात.

रोजचा नैवेद्य राजवाड्यात केला जातो ते ताट एक ठराविक मनुष्यच चांदीच्या ताटातून देवळात नेतो. भाकरी आणि मुळ्याच्या शेंगांची ( माइनमुळ्याची) भाजी हाच नेवेद्य असतो. तर ते खाऊन ताट परत राजवाड्यात जाते.
त्या मनुष्याची नेमणूक सूचना राजाच्या कुटुंबातील कुणाला स्वप्नातून होते आणि त्या मनुष्यासही तसा आदेश स्वप्नात मिळतो म्हणतात. तर ते एक गूढच आहे. नैवेद्यातले अन्न दुसऱ्या कुणास मिळत नाही.

पाटील, धन्यवाद .

व्लॉगर पाटील's picture

9 Sep 2021 - 7:50 pm | व्लॉगर पाटील

देखणे गोपुर असलेले तासगावचे देवालय पाहायचा योग दोनदा आला.
रथोत्सवाबाबत मात्र आजच वाचले.

चौथा कोनाडा's picture

9 Sep 2021 - 9:00 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप सुंदर ओळख !
मजा आली दोन्ही फिती बघायला !

व्लॉगरजी पाटीलसाहेब +१

कपिलमुनी's picture

9 Sep 2021 - 10:01 pm | कपिलमुनी

एकदा बघायला यायला हवे.

खेडूत's picture

10 Sep 2021 - 12:09 pm | खेडूत

धन्यवाद. चांगली ओळख करून दिल्याबद्दल.
एकदा दर्शन घेतले पाहिजे!

मदनबाण's picture

10 Sep 2021 - 12:43 pm | मदनबाण

उत्तम माहिती. जर हे द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेल तेच तासगाव असेल तर लहानपणी एसटीने प्रवास करताना बस चालकाने बहुधा एका मळ्यात नेली होती आणि तिथली अगदी ताजी द्राक्ष खाल्ल्याचे लक्षात आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Music

रथोत्सवाच्या अगोदर किंवा नंतरही गर्दी नसताना चित्रीकरण करायला हवे.
गोपुरानंतरचे भव्य पटांगण, देवळाची तटबंदी, आतली बाग आणि प्रदक्षिणा मार्ग दाखवता आले असते विचारून.
आज ( गणेश चतुर्थीला ) राजेसाहेब सतारवादन करतात देवळात.

सुनिल पाटकर's picture

12 Sep 2021 - 8:54 pm | सुनिल पाटकर

माहिती आवडलीी. पाहूया कधी यायला मिळते ते. ?