प्रिय नर्मदेस

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
24 Sep 2017 - 7:28 am

( आज सरिता दिन. त्या निमित्त.....)

प्रिय नर्मदेस,
कारण काहीही असो, माणूस अनिकेत होतो तेव्हा पाण्यापाशी पोहचतो. मी तुझ्यापाशी पोहचले. अजून ती पहाट आठवते. मध्यरात्री कधीतरी मराठी मुलुख मागे पडला. दुसरा मुलुख लागला हे एसी गाडीतही कसं कळतं? पण कळतं. माणसं निराळी भासू लागली. हळूहळू अनोळखी भाषा कानावर पडू लागली. लक्ष देऊन ऐकलं कि कळतेय असं वाटायचं. पण थकून गेले. किती वेळ कान ताणणार? उन्हाळ्यातील पहाट म्हणजे तशी सकाळच. एकदम गाडीचा आवाज बदलला. कुणी म्हणालं, ‘नर्मदाजी’. मी फट्कन खिडकीवरचा जाड पडदा बाजूला सारला. बाहेर पाहिलं ....... गाडी तुझ्यावरच्या एका अजस्त्र पुलावर उभी होती. टोल भरायला. पुलाची कंपनं जाणवत होती. उजवीकडे पाहिले...... तुझी शांत मुद्रा पहाटेच्या प्रकाशात उजळून निघाली होती. बरं वाटलं. मुलुख अकारण (?) ओळखीचा वाटला. ते पहिलं दर्शन. पहिला दिलासा.

तुझ्या काठच्या अनेक संध्याकाळ. प्रशस्त घाट. तुझ्या किनाऱ्यावरची घनदाट वनराजी. मोरांचा केकारव. गुलमोहराचे वैभव. मंदिर. शंकराची कितीतरी नावं. परिक्रमा करणारे थांबायचे. कुणाची काय तर कुणाची काय.... निरनिराळी भाषा. कोण सुरकुतलेल्या चेहऱ्याने तुझ्याकडे बघत बसे. कोण चुलीवर भात शिजवायला टाकी. कुणी कपडे वाळीत टाकी. कुणी चहाबिडीकाडी करी. कुणी साधू वाढलेले केस कुरवाळत बसे. कुणी, आपल्या मुलुखातलं कोण भेटतंय का म्हणुन इकडून तिकडे करी. पोरटी खेळत. बाया मिसरी लावत. गडी तंबाकू मळत. पंडितजी शांतपणे पिंडीवरचे पैसे आणि बेलफुले निराळे करायला घेत. तुझ्या किनारी असे संसार जागोजागी लागत. घटकेचेच. पण लागत. उठून जात. परत पुढचे जथ्थे येत. पुन्हा तीच लगबग. तीच हालचाल.

मी पहात रहायची. कुठे आलो? नर्मदेपाशी आलो. भूगोल कळायचा. पण वळायचा नाही. घरची आठवण महाअजस्त्र असायची. तुझ्या शांत पाण्यात मूक अश्रू मिसळून जात.

तुझा परिसर भयानक जीवघेणा. कायम उकडायचे. कपडेही नको नकोसे होत. तुझी उलघाल जाणवायची. जवळच तुझा सागर संगम. समुद्राचे खारट पाणी भरतीच्या वेळी तुझ्या गोड पाण्यात मिसळायचे. तू उफाळून यायचीस. ओहोटीला समुद्र, तुझ्यातले पाणी स्वतःत ओढून घ्यायचा. तुझे किनारे उघडे पडायचे. चिखल चिखल दिसायचा...... आणि मग आदी शंकराचार्यांचे नमामि देवी नर्मदे ओठांवर यायचे.
अलक्षलक्ष किन्नरामरासुरादिपूजितं
सुलक्षनीर तीरधीर पक्षिलक्षकूजितम् ।
वसिष्ठसिष्ट पिप्पलादि कर्दमादिशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥

याच ठिकाणी, तुझी खरोखर परिक्रमा करणारा नि:संग व्हायचा. अंगावरचे वस्त्रही उतरवून पुढे निघून जायचा. अमरकंटक ते झाडेश्वर इतका प्रदीर्घ पायी प्रवास. एकट्याने केलेली तुझ्या किनाऱ्याची परिक्रमा शेवटी तुझ्यात विरून जायची.

हळूहळू तुझ्या काठी मीपण विरक्तच होत गेले. घरची आठवण कमी होत गेली. नात्यांची क्षणभंगुरता जाणवत गेली. माणसांचे अंतरंग त्रयस्थ होऊन पाहता येऊ लागले. ज्या दगडावर बसतो, त्याखालच्या विंचवांकडे निर्भयपणे पाहता येऊ लागले. तुझ्या किनारी काळ वसतो. माणसं जगतात. मरतात. मुक्त होतात.

तीन वर्षांनी परत तुझ्या किनारी गेले. मोठमोठाले बुलडोझर दिसले. कुणा धनिकाने तुझ्या काठचे जंगल सफाचट केले होते. तू भुंडी दिसू लागलीस. तुझे वैभव ओरबाडून घेतले. पैशे. सत्ता. बळी तो कान पिळी. नियम धाब्यावर. जल, जंगल, जमीन सगळी मस्तवाल लोकांच्या हाती. मोर कुठे गेले? गुलमोहोर आडवा. जमीन उघडी. महिना भरातच विटा, सिमेंट. वाळू तुझ्या पदरात होतीच. एक पंचतारांकित आश्रम येऊ घातला होता. पाये खणले जात होते. पुढचा एकूण उच्छाद लक्षात येण्यासारखा......

मी तुझा किनारा सोडला. पौर्णिमेची रात्र होती. चंद्र टळटळीत दिसत होता, तुझ्या पाण्याच्या बरोब्बर वर! रेल्वेच्या खिडकीतून तुझे तेवढेच चौकोनी दर्शन. दोन्ही कर जुळून आले. अंत:करण जड व्हावे इतके कोवळे राहिले नव्हते. तरीही.... तरीही डोळे भरून आले. तुझ्या पात्रात सहप्रवाशांनी नाणी टाकली. मी माझे मन ठेवून आले. नमामि नर्मदे...... ओठ पुटपुटले. गाडीने वेग घेतला.

परत कधी भेटणार, माहित नाही. पण भेटीची आस आहेच.
तुझी,
शिवकन्या.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयमुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासभूगोलदेशांतरप्रकटनविचारप्रतिसादलेखअनुभवसंदर्भप्रतिभा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

24 Sep 2017 - 9:39 am | आनन्दा

मस्त जमल आहे..
मुख्य म्हणजे तुमचं लिखाण मनाला भिडतं

अवांतर
आम्हाला पहिलं पचवायला थोडा वेळ द्यावा की

पद्मावति's picture

24 Sep 2017 - 11:34 am | पद्मावति

काय सुरेख लिहीता हो __/\__

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Sep 2017 - 11:44 am | अमरेंद्र बाहुबली

छान! खरचं नर्मदेला पाहुन मनाला शांती मिळते. ( मला आता माळव्यात राहुन संपुर्ण मालवी भाषा बोलता येते.)

पिशी अबोली's picture

24 Sep 2017 - 1:05 pm | पिशी अबोली

__/\__

पैसा's picture

24 Sep 2017 - 1:34 pm | पैसा

सुरेख!

सदानन्द's picture

24 Sep 2017 - 2:29 pm | सदानन्द

पहिलं दर्शन
सुरेख !
दुखभन्जनी सुख रन्जनी
नमामि देवी नर्मदे...

स्वाती दिनेश's picture

24 Sep 2017 - 3:05 pm | स्वाती दिनेश

खूप तरल लिहिलं आहे. आवडलं,
स्वाती

दुर्गविहारी's picture

24 Sep 2017 - 8:37 pm | दुर्गविहारी

अप्रतिम लिहीलेले आहे. माझ्या बडोद्याच्या सहलीवेळी नर्मदेवरचा पुल ओलांडल्याची आठवण झाली. हि नदी नसून नद आहे. तुमच्या लेखनाला सलाम. _/\_