एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -१
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -२
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -३
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -४
सायंकाळची कातरवेळ संपून अंधार आणखी दाटून आला आणि पायाखालचा रस्ता पुसट झाला.
झपाट्याने पुढे गेलो.
मागच्या आश्रमाच्या पायर्यांजवळ आम्हाला मागे टाकून निघालेली ती त्रिमूर्ती डगर चढताना दिसली. डगरीवर केळीचा बाग आणि चार दोन शेडस दिसत होती - तोच आश्रम.
डगरीवर पसरलेल्या झाडांच्या मुळांना पकडून वर गेलो. अंधारात जेसीबी लाऊन आश्रमाचं काही काम चालू होतं. आश्रमाचे गोल गरगरीत स्वामी शंकराचार्यांच्या फोटोत असतो तसा डोक्यावर कफनीचा पदर घेऊन कामावर लक्ष ठेऊन उभे होते. जेसीबीवाल्याला कुठली माती ओढायची त्याच्या मधूनमधून सूचना चालू होत्या.
शेजारीच आठदहा खोल्या असलेली एक प्रशस्त इमारत बांधून झालेली दिसत होती.. समोर बांधकामाचे बांबू, फळ्या, सिमेंट पडलेलं होतं.
त्या शेडमध्ये पाचपंचवीस गाद्यागिराद्याही थप्पी लाऊन ठेवल्या होत्या.
आम्ही तिथंच आगंतुकासारखे जाऊन बसलो. आमच्या पुढे असलेल्या त्रिमूर्तीमध्ये कुजबूज झाली. एकजण उठला व त्या भगवे वस्त्रधारी स्वामींकडे गेला. आज रात्री इथे थांबणार आहोत वगैरे विचारले असावे. कारण लगेच स्वामीजींनी त्या परिक्रमीला नमस्कार वगैरे केला आणि लगेच आश्रमाच्या सेवेकर्यानं आम्हाला एक सतरंजी आणून दिली. त्या नवीन ईमारतीच्या व्हरांड्यात ती टाकली.
आतापर्यंत नर्मदेच्या पात्रातून जो पुल नजरेत होता त्यावरुन वहानांच्या लाइटचा प्रकाश ये-जा करताना दिसत होता. तोही आम्ही चालत होतो तिथून तीन कि.मी. वर होता. हा पुल नर्मदेच्या अल्याड-पल्याड पाच-पाच किलोमीटरवर असलेल्या बडवाह आणि सनावद या गावांना जोडतो असे सकाळी पुढे गेल्यावर दिसले. पुलावरुन बडवाहला येऊन इंदूरला जाणारी बस पकडता येणार होती. मोरटक्क्याचा रेल्वे पुल मात्र तिथून आणखी चार किलोमीटरवर होता.
त्यामुळं मोरटक्क्यावरुन रेल्वेनं इंदूरला परतण्याचा प्लॅन रद्द केला.
दिवसा नर्मदेतून सरळ पुलाकडे जाता आलं असतं. पण आता रात्र पडल्यानं वरच्या कच्च्या रस्त्यावरुन भलतीकडेच गेलो असतो. तिथं असलेल्या एकदोन मोकळ्या लोकांना स्टेशनचा रस्ता विचारला तर त्यांनाही तो नीट माहित नव्हता. आशूपण ''जाऊ दे, सकाळी जा..'' म्हणाला. मग थांबलो.
मग प्रश्न आला रात्री खायचं काय? या आश्रमात सोय होते की नाही वगैरे काही माहित नव्हतं. म्हटलं ओंकारेश्वरातून आणलेल्या भज्यांचं पार्सल आणि टहाळ आहेच.
आणि रात्री थंडीत पांघरायचं काय? आशूकडं फक्त एक सतरंजी आणि माझ्याकडे विकत घेतलेली पुस्तके व अंगावरल्या कपड्यांशिवाय काही नव्हतं. त्या नव्या ईमारतीच्या व्हरांड्यात टाकलेल्या सतरंजीवर गप्पा मारीत बसलो.
सोबतच्या त्रिकुटाने सायंपूजेसाठी नर्मदा जलाच्या आपपल्या बाटल्या काढल्या.
त्यांच्यापैकी एकाकडे असलेल्या मोबाईलच्या उजेडात नर्मदाष्टक काही सापडेना. निरांजन, उदबत्त्या लाऊन त्यांना मुखपाठ होती ती आरती म्हणून त्यांची नर्मदा पूजा आटोपली. आशून त्याच्याकडच्या पुस्तकात शोधून नर्मदाष्टक म्हटले. तेवढ्यात एक माणूस 'भजन के लिये चलिये.. भगवान ने बुलाया है'' सांगत आला.
ऐन डगरीच्या कडेवर बांधलेल्या शेडमध्ये ते स्वामी रहात होते आणि आश्रमातले पंधरावीस लोक त्यांना भगवान म्हणत होते.
पेटी, ढोलक, टाळांच्या तालावर भजन सुरु होते, पेटीवर ते स्वामीजी.
भजन संपले. नर्मदेकडे तोंड करुन, सर्वांनी रांगेने ताट हातात घेऊन केलेली आरती झाली त्यावेळी खाली नर्मदेचे पाणी पल्याडच्या तुरळक दिव्यांमुळे अंधारात लकाकत होते.
स्वामीजींनी प्रसाद म्हणून सेवेकर्याला आतल्या शेडमधून चिकू आणि चिकू न सापडल्यास जांब आणायला सांगितले. पेटी, ढोलक वगैरे आत गेले.
तो प्रसाद घेतला.
मग स्वामीजींनी कहां से आये है वगैरे विचारणा केली.
साडेपाच सहा फुट उंची, बेचाळीस - पंचेचाळीच वय, एकूणच शरीराचा गोल गरगरीत घेर आणि दोन्ही डोळे बारिक करुन, बोलताना दोन्ही बुब्बुळे डाव्या-उजव्या कोपर्यात जाणारी, निष्पापपणा दाखवणारी लकब.
मी माझं नाव, इंदुरात काय करतो वगैरे सांगितलं तेव्हा ''हां वो ममता कुलकर्णी...'' हे बोलून स्वामीजींनी ते वाक्य मध्येच तोडले. मग आशू पुण्यातून आलाय हे ऐकून त्यांनी परिक्रमेबद्दल रितसर, तपशीलवार मार्गदर्शन केलं.
आपको नर्मदा के तट पर जीवन के सभी रुप दिखेंगे. सभी प्रकार के लोग है. कहीं आश्रम समृद्ध होकर भी आपको कुछ पूछे बिना हकाल दिया जायेगा, कहीं बहुत आदर सत्कार मिलेगा. शांती से सब देखना है और मईया का स्मरण करते हुये आगे बढते रहना है वगैरे बर्याच महत्त्वाच्या गोष्टींची त्यांनी आठवण करुन दिली.
स्वयंपाक तयार होतोय, जेऊन जा हेही सांगितले.
पांघरण्यासाठी काही नाहीय हे कळल्यानंतर सेवेकर्याला ''अभी वो सुरत से नये चद्दर आये है उसमें से इनको दो'' म्हणून सांगितले.
आमची चिंता मिटली.
त्या ओमानी म्हातार्यांसारख्या दिसणार्या त्रिकुटाला त्यांनी नाव गाव विचारले.
गाडरवारा हे त्यांच्या गावाचे नाव ऐकून ''रजनीश की जनमभूमी'' म्हटल्यावर मला ते तिथून आल्याचे कळले. मी आधीही त्यांच्या गावाचे नाव विचारले होते, पण मुक्काम पोस्ट, तालुका जिल्हा च्या हिंदी चालीत त्यांनी सांगितल्याने मला ते नीट कळाले नव्हते.
रजनीशांच्या जन्मगावातून आलेली ती त्रिमुर्ती माझ्यासाठी इंट्रेस्टिंग विषय होती.
स्वामींना पुन्हा एकदा नर्मदाष्टक म्हणण्याची इच्छा झाली. पेटी, ढोलक बाहेर आले.
तिथे रहाणार्या दोन लहान मुली व एक मुलगाही होते. त्यांना मी तुमचे नाव काय, शाळेत जाता की नाही वगैरे प्रश्न विचारले तेव्हा स्वामींजींनी ''अरे वो स्कुल में जाते है.. लेकीन वहां कुछ सिखाया नहीं जाता.. हमने कहा शिक्षा हम देंगे.. स्कुल से सिर्फ डिग्री ले लेना..'' म्हणून लोकांना हसवले.
थोड्या वेळाने केळीची पानं मांडली गेली. गरमागरम वरण, चवीला धपाट्यासारखा, पण थोडा जाड 'टिक्कड' नावाचा परिक्रमींचा पेटंट पदार्थ आणि स्वामीजींने मुद्दाम आतून मागवलेले फरसाण यावर आम्ही थकलेले, भुकेजलेले लोक तुटून पडलो. मी तर नर्मदाकिनारच्या त्या काकडून टाकणार्या थंडीत सूप पिल्यासारखे ते गरमागरम, तिखट वरण ओरपले.
जेवणं झाल्यावर आम्ही सकाळी पाच वाजताच निघू हे सांगितल्यानंतर स्वामीजींनी पुन्हा एकदा आम्हाला नीट मार्गदर्शन केले. सू्र्योदय झाल्याशिवाय बिलकुल रस्त्यावर चालायला सुरुवात करायची नाही. सूर्यास्त झाल्यावरही चालायचे नाही. तुम्हाला पूर्णत: अनोळखी रस्त्यात काटेकुटे, साप-किरडू, घळ काहीही असू शकते वगैरे काळजी घ्यावी अशा गोष्टी सांगितल्या. लवकर जायचे आहे तर जा, पण सूर्योदय
होऊ द्या वगैरे.
आम्ही त्यांच्या अगत्याबद्दल, केलेल्या मार्गदर्शनाबद्दल पुन:पुन्हा आभार मानले, त्यांचं दर्शन घेतलं.
त्यावर -
''अरे हम तो भुक्कड बाबा है... हमारे गुरुने यहां बिठाया है तो हो गये हम भगवान'' असे प्रांजळपणे सांगितले.
आठ एकरांचा आश्रम आहे. इंदुर जिल्ह्यातले धार आणि सुरतेत आणखी एका ठिकाणी मोठे आश्रम आहेत. नर्मदेच्या तटावर रहाण्याची इच्छा झाली, आता कायम मुक्काम इथेच. मध्ये मध्ये तिकडे जातो वगैरे व्यक्तिगत गोष्टी त्यांनी सांगितल्या.
तुम्हाला फोर व्हिलर चालवता येते काय असा प्रश्नही मध्येच मला विचारला. त्यांना जवळ कुठेतरी जाऊन यायचे असावे. त्यांची स्कॉर्पिओ पार्क केलेली होतीच. पण मला गाडी चालवता येत नव्हती.
आम्ही निरोप घेऊन परत त्या ईमारतीत आलो. पाठोपाठ रगी घेऊन माणूस आलाच. मी परिक्रमावासी नाहीय, फक्त सोबत आलोय हे कळाल्याने त्यांनी दोघांसाठी 3 रगी पाठवून दिल्या होत्या.
तुम्ही शेजारीच टाकलेल्या कॉटवर झोपा असे सांगून, थोडावेळ गप्पा मारुन तो माणून निघून गेला. पण सतरंजी प्रशस्त होती, आणि परिक्रमेला निघाले नसलो तरी उगाच स्पेशल ट्रिटमेंट घ्यावी वाटेना.
माझ्या अंगावर तरी रेक्झीनचे जॅकेट होते. आशूकडे तर फक्त एकावर एक घातलेले दोन शर्ट.
त्याला त्या दोन रगी आग्रह करुन घ्यायला लावल्या. आशू ध्यान, नामस्मरण करु लागला व मी झोपेची आळवणी.
रजनीशांच्या गावचे त्रिकुट सोबत आणलेल्या रगीमध्ये गुरफटुन कधीच घोरु लागले होते.
थोड्या वेळाने आशूही झोपला. मला काही त्या थंडीत झोप लागेना. रात्रभर या कुशीवर-त्या कुशीवर होत उजाडले. सकाळी सहा-सव्वासहाला नव्या बांधकामावर पाणी टाकण्यासाठी आश्रमाची माणसे आली. आम्हाला उठवले.
आपल्याला निघून जायला सांगत आहेत असा त्या त्रिकुटाचा गैरसमज झाला व ते चंबूगबाळे आवरुन डगरीच्या खाली गेले. मग आम्हीही रगी, सतरंजी घडी घालून त्या माणसांकडे सोपवल्या व त्या त्रिकुटामागेच डगर उतरलो. दिशा पुरेशा फटफटल्या नव्हत्या.
डगरीखाली जाऊन तिथे पडलेले आयचन गोळा करुन शेकोटी पेटवली व शेकत बसलो. त्या त्रिमूर्तीला मी रजनीशांबद्दल माहिती विचारली. पण रजनीशांच्या बाकी जगातल्या ख्यातीबद्दल त्यांना काही गम्य नव्हते. ज्याच्या नावाने गावात एक शाळा आहे तोच हा रजनीश एवढीच माहिती त्यांना होती. हिंदी चित्रपटात सहसा चंबळ खोर्यातल्या डाकुंच्या तोंडी असलेले 'कछू' सारखे शब्द ते बोलण्यात वापरत होते आणि त्यांची बोलीही दोन-दोनदा विचारून समजून घ्यावी लागत होती.
सूर्य बराच वर येईपर्यंत शेकत बसलो. त्रिकुटाने चहाची तयारी केली. त्यांनी सोबत असलेला गांजा बाहेर काढला.
''इ चीज अपने को चलत नाही.. कभी गलती से पी लिये तो एक पैर कछू इधर गिरे तो दुसरा उधर''
असे म्हणून त्यातल्या पोक्त म्हातार्याने दुसर्या दोघांची आमच्यासमोर थट्टा केली. सूर्य बराच वर आला होता.
त्या म्हातार्यांनी आशूला परिक्रमेत एक रग, खाली अंधरायला पोत्यांचे चव्हाळे, पाण्यासाठी कडी असलेला डबा, स्वेटर आणि हातात काठी असायलाच पाहिजे हे पटवून दिले.
आम्ही त्या तिघांचा निरोप घेतला आणि ''नर्मदे हर'' करुन निघालो. नर्मदेचा तट पक्क्या खडकांचा होता, म्हणूनच वर पुल बांधला होता. त्या पुलाच्या दिशेने निघालो. वाटेत खडकात खोदलेल्या चरामध्ये नर्मदेच्या पाण्याची चिंचोळी धार आडवी आल्याने आशूला वरुन शेतातून लांबलचक चाल करावी लागली. मी ती धार पार करुन त्याची वाट पहात वर डगरीवर थांबलो.. तेव्हा ती मागे सोडून निघालेली त्रिमूर्ती त्याच्यासोबत येताना दिसली.
हळूहळू चालत बडवाहच्या पुलापर्यंत आलो. ते तिघे पुढे निघुन गेले.
आम्ही वर आलो आणि मी चहा बिस्कीट घेतले. आशू मात्र काही घेणार नाही यावर ठाम. म्हटले असो.
आशूला पुलाशेजारच्या घाटावर बसवले कारण त्याला नर्मदा ओलांडता येणार नव्हती. मी बडवाह गावात निघालो. सकाळचे साडेनऊच वाजले होते तरी मार्केटमधली सगळी दुकाने उघडली होती.
एका दुकानात वजनाला अत्यंत हलकी पण गरम रग, स्वेटर घेतले. चटई विचारली. त्याला वाटले मी नर्मदा किनारी श्राद्ध घालण्यासाठी आलोय आणि श्राद्धाच्या वेळी ब्राह्मणाला देण्यासाठी मला त्या वस्तू पाहिजेत. पण मी परिक्रमेत जाणार्या माणसासाठी या वस्तू घेऊन चाललोय हे सांगिल्यानंतर तो दुकानदार स्वत:च माझ्यासोबत मला काय काय हवे त्याचा योग्य भाव करीत मार्केटमधून हिंडू लागला. दुसर्या दुकानदारांना पटवून त्याने योग्य त्या भावात सगळ्या वस्तू घेऊन दिल्या.
त्याने ही मदत करीत त्या बाजारातून हिंडत असताना तेवढ्यातल्या तेवढ्यात आमची गट्टी जमली.
सगळ्या वस्तू घेऊन झाल्यानंतर पुन्हा त्याच्या दुकानात नेऊन आग्रहाने चहा पाजला. त्यांना नमस्कार करुन तिथून निघालो आणि सहा आसनी रिक्षात बसून परत आशू बसला होता त्या घाटावर आलो.
अडचण अशी आली की या सामानामुळे आशूकडचे ओझे वाढले.
त्याने शेवटी दोन जीन्सच्या पॅंटी आणि शर्ट तिथेच घाटावर ठेऊन दिले. सोबत घेतली नाहीत तरी चालतील अशी पुस्तके माझ्याकडे दिली. सॅक उचलून पाहिली तेव्हा वजन सांभाळता येईल एवढे झाले होते. पाठीवर सॅक, एका हातात कमंडलूसारखा कडी असलेला डबा आणि दुसर्या हातात ''?'' या आकारासारखी आजोबांची काठी. रस्त्यात अचानक कुत्रे, साप समोर आल्यावर, ओबडधोबड खडकांवरुन, चिखलातून चालताना काठी पाहिजेच. मीच आग्रह करुन त्याला ती घ्यायला लावली, त्याने सोबत ठेवली असेल की नाही देवजाणे.
शेवटी एकदाची आत्मशून्याचा निरोप घ्यायची वेळ आली.
निघतो म्हणालो. त्याने छातीशी धरले. भडोचला पोहोचल्यानंतर फोन कर म्हणालो.
मी घाट चढून वर आलो तेव्हा दूरवर जाणारा आत्मशून्य नाक आणि डोळे पुसताना दिसला.
मी घाट चढून आलो नर्मदेकडे पहात सिगारेट संपवली. पुल ओलांडून बडवाहकडे निघालो तेव्हा दूरवर नर्मदेच्या डगरीशेजारुन आशूची संथ परिक्रमा सुरु झालेली होती.
समाप्त
आशू थांबलेला घाट निळ्या ठिपक्यावर व बडवाह गाव वर्तुळात
प्रतिक्रिया
16 Jan 2012 - 9:45 pm | मोदक
पुढच्या भागाची वाट पहायला लावणारे लिखाण..
अवांतर.. ते ''हां वो ममता कुलकर्णी..." कळाले नाही.
16 Jan 2012 - 9:52 pm | यकु
म्हणजे तिचं कुलकर्णी हे आडनाव.. ऐकलेलं आहे असा त्यांचा आशय.
16 Jan 2012 - 10:01 pm | यशोधरा
वा! सुरेख झाली ही लेखमाला.
आत्मशून्य परतून येतील तेह्वा त्यांचे अनुभव वाचायला मिळतील अशी आशा करते.
17 Jan 2012 - 7:10 am | नंदन
अगदी असेच म्हणतो.
17 Jan 2012 - 10:12 pm | धनंजय
छान लेखन, आणि आत्मशून्यांस शुभेच्छा - तेही लिहितील अशी आशा आहे.
16 Jan 2012 - 10:02 pm | गणेशा
लिखान जबरदस्त ...
16 Jan 2012 - 10:04 pm | पैसा
परिक्रमा कठीण खरीच. २/३ दिवसाच्या सोबतीनंतर आत्मशून्याला सुद्धा एकट्याने पुढे जाताना भरून आलं. आम्हालाही त्याच्या आणि तुझ्या भावना जाणवतायत. पण हा प्रवास ज्याचा त्यानेच करायचा, बोलावणं यायला हवं.
16 Jan 2012 - 10:08 pm | मेघवेडा
तुमच्या चित्रदर्शी लेखनशैलीमुळे अत्यंत वाचनीय झालेली संपूर्ण लेखमाला आवडली! :)
16 Jan 2012 - 10:23 pm | जाई.
भावस्पर्शी लेखन
वाचताना एकदम गुंग व्हायला झालं
16 Jan 2012 - 10:25 pm | मन१
मग आशु कुठवर गेलाय मग सध्यापावेतो?
16 Jan 2012 - 10:25 pm | अन्या दातार
सगळेच भाग सुंदर झालेत.
16 Jan 2012 - 10:57 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम! एक वेगळेच जग दाखवल्याबद्दल धन्यवाद! तुझ्याबरोबर आम्हीही फिरलो!
बाकी, आशूला एवढं सगळं सामान दिलंस खरं... पण पुढे 'मामा'लोक ते सगळं काढून घेतील! :)
16 Jan 2012 - 11:03 pm | यकु
त्यानं तोच विचार करुन सोबत फार वस्तु घेतल्या नव्हत्या.
पण प्रत्येक ठिकाणी सगळी सोय असलेला आश्रम असेलच असं नाही.
आणि शूलपाणीत पोहोचेपर्यंत महिना जाणार.
16 Jan 2012 - 11:31 pm | मितान
अनुभव वाचताना खूप छान वाटले..
पुढच्या भागाची वाट पाहू आता....
16 Jan 2012 - 11:36 pm | चतुरंग
छान लिहिलं आहेस.
आत्मशून्यचं कौतुक वाटतंच आणि त्यानं तुला लिहू नको सांगूनही तू लिहिलंस म्हणून तुझं जास्त कौतुक वाटतं, अन्यथा आम्हाला परिक्रमेसंबंधी वाचायला कसं मिळालं असतं! :)
आता एवढ्या लोकांचे डोळे आणि सदिच्छा आत्मशून्याच्या परिक्रमेकडे लागलेत, त्याचा प्रवास निर्वेध होऊदे अशी नर्मदामैय्याकडे प्रार्थना.
(नर्मदेतला गोटा)रंगोटा
18 Jan 2012 - 10:51 am | विसुनाना
+१.
16 Jan 2012 - 11:36 pm | किसन शिंदे
सुंदर!
16 Jan 2012 - 11:39 pm | किसन शिंदे
प्रकाटाआ
17 Jan 2012 - 12:40 am | कवितानागेश
छान लिहिलंय....
17 Jan 2012 - 12:55 am | रेवती
छान लिहिलय.
आशूला सोडून निघताना कसंसच झालं.
असाच फोन परवा प्रभोनी केला होता.....एयरपोर्टातून.
तो निघतोय म्हणून नंतर पाचेक मिनिटं काही सुचलं नाही.
17 Jan 2012 - 12:55 am | सुनील
सुरेख लेखन. आवडले.
आत्मशून्य यांना शुभेच्छा!
बाकी स्वामीजींना सर्व कुलकर्ण्यांमधून ममताच बरी आठवली :) गेला बाजार सोनाली तरी आठवायची!
17 Jan 2012 - 1:05 am | पाषाणभेद
ते स्वामी असल्याने त्यांच्या ठाई ममताच वसणार, त्यांना सोनेनाणे वर्ज्य असते मग सोनाली का?
फारच ओघवते जिवंत लेखन आहे तुमचे.
आत्मशुन्याला शुभेच्छा. यात्र निर्विध्न पार होवो.
नर्मदे हर हर!!
17 Jan 2012 - 1:04 am | अत्रुप्त आत्मा
@---मी घाट चढून वर आलो तेव्हा दूरवर जाणारा आत्मशून्य नाक आणि डोळे पुसताना दिसला.
मी घाट चढून आलो नर्मदेकडे पहात सिगारेट संपवली. पुल ओलांडून बडवाहकडे निघालो तेव्हा दूरवर नर्मदेच्या डगरीशेजारुन आशूची संथ परिक्रमा सुरु झालेली होती.>>>एखाद्या कादंबरीचं शेवटचं पान वाचतोय असं वाटलं,य.कु.शेठ...
@---समाप्त.... >>> हे तुंम्ही लिहिलय खरं,,पण का कोण जाणे... माझ्याकडुन ते सारखं क्रमशः असच वाचलं जातय...
17 Jan 2012 - 9:19 am | स्पा
अगदी असेच म्हणतो
यकु सेठ..
लेखणीत जादू हाये तुमच्या ..
अजून लिहित राहा
@ आत्मशुन्य : त्याच्या धाडसाला दाद द्यायला हवी
पराकोटीचा निग्रह असल्याशिवाय असले साहस जमणे नाही
17 Jan 2012 - 1:30 am | दादा कोंडके
_/\_ धन्य आहात दोघंही!
17 Jan 2012 - 3:26 am | स्मिता.
लेखमाला खूपच छान झाली... पूर्णवेळ गुंतवून ठेवलं. आशूला घटकाभर सोबत करून नंतर एकटं सोडून निघतानाचा प्रसंग वाचताना मलाच कसंतरी झालं तर तुम्हाला कसं वाटलं असेल याचा फक्त अंदाज करू शकते. एक वेगळाच अनुभव आमच्यासमोर मांडल्याबद्दल धन्यवाद यकु!
शक्य झाल्यास या अनुभवामुळे तुम्हाला आलेली जाणीव, तुमच्या मनातले विचार यांच्यावर आणखी एक लेख येवू द्या.
17 Jan 2012 - 7:30 am | कौशी
आशुला निरोप देतांना वाईट वाट्ले...
आता त्याच्या बाबतीत मिळालेली माहीती आम्हाला कळवित राहा..
17 Jan 2012 - 7:56 am | ५० फक्त
@---मी घाट चढून वर आलो तेव्हा दूरवर जाणारा आत्मशून्य नाक आणि डोळे पुसताना दिसला. - या वेळी तुझे डोळे कोरडे राहिले नसणारच याची खात्री आहे,
17 Jan 2012 - 9:53 am | टुकुल
हेच म्हणायच होत मला. सकाळी पटकन धागा वाचला, थोडा वेळ काहिच लिहायला सुचल नाही.
तुम्ही या लेखांतुन आम्हाला सुध्दा यात गुंतवुन टाकल, त्याबद्दल धन्यवाद.
--टुकुल
17 Jan 2012 - 9:37 am | प्यारे१
आता आशू परत येईपर्यंत रितेपणा जाणवणार 'आत' कुठंतरी.
किती नाही म्हटलं तरी 'ज्ञातीबांधव' आहे आमचा ... :)
खरोखरी त्याचा सत्कार व्हायलाच हवा ...
17 Jan 2012 - 9:47 am | सविता००१
अतिशय सुरेख लिहिलं आहे तुम्ही. आम्हीपण तुमच्याबरोबर फिरुन आलो असेच वाटले. आता आशू कडून फोन येइल तसे आम्हालाही कळवा.
17 Jan 2012 - 9:53 am | नगरीनिरंजन
मस्त लिहीलंय!
आत्मशून्य यांचेही अनुभव वाचायला मिळतील अशी आशा.
17 Jan 2012 - 9:59 am | गवि
यकु, इतकं जिवंत लिहिलंयस की मी स्वतःच आशूला निरोप देतो आहे असं वाटलं.
आत्मशून्या.. काळजी घे रे बाबा स्वतःची..
17 Jan 2012 - 5:05 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>यकु, इतकं जिवंत लिहिलंयस की मी स्वतःच आशूला निरोप देतो आहे असं वाटलं.
एकदम असेच म्हणतो.
यकुंनी आता इतर विषयांवरही लिहावे अशी नम्र सूचना वजा विनंती. उदाहरणार्थ, इंदूर आणि आजूबाजूचा परिसर यावर. म्हणजे फेब्रुवारीची तयारी सोपी जाईल ;-)
17 Jan 2012 - 10:22 am | विलासराव
नर्मदे हर हर..................
तिकडे आशुला तुम्ही निरोप दिला. ईकडे जगन्नाथ कुंटेंचे पुस्तक मिळाले.
ही आपल्या परीक्रमेची तयारी चालु झाली असे समजावे का?
17 Jan 2012 - 10:48 am | उदय के'सागर
आशु ला मनापासुन शुभेच्छा! आणि यशवंता धन्यवाद, खुपच छान ,साध्या शब्दात अप्रतिम प्रवास-वर्णन केलत, धन्यवाद!
17 Jan 2012 - 11:22 am | प्रचेतस
अत्यंत वाचनीय, ओघवती लेखमाला.
आशूचा प्रवास सुखरूप होईलच.
17 Jan 2012 - 12:29 pm | सागर
अत्यंत वाचनीय, ओघवती लेखमाला.
आशूचा प्रवास सुखरूप होईलच.
यशवंता सुरेख लिहिले आहेस मित्रा :)
17 Jan 2012 - 11:27 am | मूकवाचक
_/\_
18 Jan 2012 - 5:48 pm | राघव
_/\_
राघव
17 Jan 2012 - 12:47 pm | स्वाती दिनेश
हा भागही फार सुरेख झाला आहे. आ.शूला सोडून निघतानाची घालमेल आमच्यापर्यंत पोहोचली.
आ.शू. ची परिक्रमा निर्धोकपणे होत असावी अशी इच्छा. तो परतल्यावर त्याचे अनुभव जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
स्वाती
17 Jan 2012 - 2:07 pm | मी-सौरभ
:)
17 Jan 2012 - 1:37 pm | सुहास झेले
यशवंता, सुंदर लेखमाला रे....
एकदा आशु आणि तुझ्यासोबत मस्त कट्टा जमवून, तुमच्या तोंडून ही गाथा पुन्हा ऐकायला उत्सुक आहे मी.
नर्मदे हर हर !!
17 Jan 2012 - 3:02 pm | श्यामल
शेवटी एकदाची आत्मशून्याचा निरोप घ्यायची वेळ आली.
निघतो म्हणालो. त्याने छातीशी धरले. भडोचला पोहोचल्यानंतर फोन कर म्हणालो.
मी घाट चढून वर आलो तेव्हा दूरवर जाणारा आत्मशून्य नाक आणि डोळे पुसताना दिसला.
>>> प्रवासवर्णन अतिशय सुंदर ओघवत्या शैलीत केले आहे. वाचता वाचता इतकी रंगुन गेले की वरील वाक्ये वाचल्यावर एकदम गलबलुन आले.
आशु, तुझी परिक्रमा निर्विघ्नपणे पार होवो.
17 Jan 2012 - 4:37 pm | प्रास
__/\__
केव्हाही कुठलंही पान उघडून वाचता येणारी काही पुस्तकं असतात, तशाच प्रकारचं लिखाण या लेखमालेत उतरलंय. केव्हाही, कुठलाही भाग उघडावा आणि वाचायला लागवं.
यकुशेठ, तुमची चित्रदर्शी लेखनशैली आपल्याला फार आवडली बुवा!
यापुढे नक्की ललित लिखाण करा. तुमची लेखणी आणि प्रतिभा केवळ भाषांतरासाठी वापरू नका. भाषांतराचं काम वाईट आहे असं नाही पण तुमच्या प्रतिभेचा विचार करता, तुमची मजल त्यापुढे कित्येक कोस जाईल याचा विश्वास वाटतो.
आता आपण तुमच्या लिखाणाचे फ्यान आहोत.
आत्मशून्यला त्याच्या परिक्रमेसाठी आणि तुम्हाला तुमच्या लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!
17 Jan 2012 - 6:52 pm | जयंत कुलकर्णी
रस्ता हे जगातले सगळ्यात मोठ्ठे जिवंत विद्यापीठ आहे असे म्हणतात हे उगीच नाही. या वाक्यातील जिवंत हा शब्द फार महत्वाचा आहे. रस्त्यावर काय नाही शिकायला मिळत ? सगळ्यात मुख्य म्हणजे रस्ता आपली जगात असलेली जागा दाखवते. येथे तुमची डिग्री, शिक्षण, उपयोगी पडत नाही. उपयोगी पडते ती फक्त नम्रता. नम्र व्हा हाच संदेश प्रत्येक भेटणारा चढ, उतार , दिवस, रात्र भेटणारी अनोळखी माणसे देत असतात.
रात्री आकाशाकडे ग्रह तारे बघताना मला असेच अत्यंत नम्र व्हावेसे वाटते, तसाच नम्र मी कोकण कड्यावरून खाली बघताना होतो. येथे रागवून चालत नाही तर घडणारी प्रत्येक घटना ही "त्याने" आपल्यासाठी काहीतरी मनात हेतू ठेवून घडवून आणली आहे अशी श्रद्धा ठेवावी लागते. (माझा स्वतःचा यावर विश्वास नाही, पण रस्त्यावर यावर विश्वास ठेवावा लागतो) प्रत्येक घटनेकडे त्रयस्थ नजरेन बघायला एकदा शिकले की कसला राग आणि कसला लोभ !
मलाही एकदा असेच एका तांड्याबरोबर १० दिवस चालत जायचे आहे. त्याची चाचपणी चालू आहे. आपण आपले किती शारीरीक व मानसिक लाड पुरवतो व पुरवून घेतो याची उमज आपल्याला त्यावेळी होते. माणसाला खरी गरज कशाची असते हेही रस्ताच शिकवतो.
रस्ता कुठे जातो हे माहीत नसल्यावर तर त्यावर चालण्यात अजूनच मजा येते. असा मी एकदा चाललो आहे. रस्ता पकडायचा आणि चालायला लागायचे. कसलाही विचार करायचा नाही. बस चलते रहो................
आशू, बस चलते रहो...............
17 Jan 2012 - 7:34 pm | तिमा
आधीच लेखमाला अस्वस्थ करणारी आणि त्यात जयंतरावांचा अप्रतिम प्रतिसाद. आशू एक मिपाकर. मी कधी त्याला बघितलेला नाही. तरी का कुणास ठाऊक, एकदम भरुन आले. आशूबाळा, तुझी काळजी वाटते रे, परमेश्वर तुझे रक्षण करो.
18 Jan 2012 - 12:45 pm | मृत्युन्जय
यशवंता सगळे भाग छान लिहिलेत रे बाबा. आत्मशून्याला पुढच्या प्रवासाच्या शुभेच्छा.
18 Jan 2012 - 3:12 pm | विटेकर
गलबलून आले...
आणि पुढची अक्षरे पुसट झाली..! काय लिहू ?
आत्मशून्य यांचा फोन आल्यावर जरुर कळ्वा.. त्यांचा फोन येणे आणि त्यावरिल बोलणे .. उत्सुक आहोत.
18 Jan 2012 - 10:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
-दिलीप बिरुटे
18 Jan 2012 - 5:33 pm | मितभाषी
असेच म्हणतो.
27 Nov 2013 - 2:12 pm | विटेकर
आता परिक्रमे च्या निमित्ताने पुन्हा सगळे भाग वाचून काढले.
हा इसम कितीवेळा डोकावणार आणि छळणार कोणास ठाऊक ?
सध्या काय मह्णून जन्माला आला आहेस ? आणि तुझा आय डी काय आहे ?
27 Nov 2013 - 2:23 pm | प्यारे१
हम्म्म!