अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जनातलं, मनातलं
21 Apr 2010 - 12:39 pm

मध्यपूर्व आशिया हा संपूर्ण जगासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाचा, कुतूहलाचा नि विवादांचा ठरलेला भूप्रदेश. प्राचीन काळी जेव्हा पौर्वात्य नि पाश्चिमात्य जगाचे ऋणानुबंध मध्यपूर्वेतून खुष्कीच्या मार्गे होणार्‍या व्यापारातून जुळले, तेव्हापासून ते आज अगदी इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, इराकवर युद्ध (नि लोकशाही!) लादणे, दुबईमधील समुद्रकिनार्‍यांवर उन्हात चिंब होऊन पडणे, तिथल्या बुर्ज दुबईच्या गच्चीवरून सगळ्या पृथ्वीकडे डोळे भरून पाहणे अशा येनकेनप्रकारेण जुळलेलेच राहिले आहेत. शाळेत इतिहास शिकताना क्वचित एखादा धडा अरबी टोळ्या, अल-जेब्रा, हादिस नि कुर-आन, नौरूज याबद्दल बोलू लागला की इतिहासासारखा विषयही आवडू लागायचा (इतर वेळी १८५७ ते १९४७ सोडून काही वाचायला मिळायचे नाही, हा भाग वेगळा!) अगदी अलीकडेपर्यंत अयातुल्ला खोमेनी, माह्मूद अह्मदेनिजाद वगैरे नावे कानावर पडत; इराण-पाकिस्तान-भारत गॅस पाइपलाइनसंबंधीच्या बातम्या वाचायला-ऐकायला मिळत; तेव्हाही कान आणि डोळे त्यांच्या दिशेने आपसूकच वळायचे. गाडी घेऊन सनीवेलातल्या रज्जो मध्ये पराठे खायला बाहेर पडावे नि बाजूच्याच चेलोकबाबी मधील लाल-पिवळा मंद प्रकाश नि ताज्या, गरम कबाबांचा वास पराठ्यांच्या बेताबद्दल मनात 'सेकन्ड थॉट' निर्माण करून जावा, असे आजवर अनेकदा घडले आहे. कालच्या टॅब्लॉइड ऑफ इन्डिया मधील ही बातमी वाचली आणि पर्शियाशी (आताचा इराण) आपले पोट, राजकीय नि ऐतिहासिक संबंध - नि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सांस्कृतिक भूक - किती घट्ट जोडले गेले आहेत, याचा विचार नकळतच मनात डोकावला. कचेरीतील सोमवार संध्याकाळची वेळ, हातात गरमागरम चहा, कचेरीतील जवळच्या मित्राशी या सगळ्यावरून झालेल्या गप्पा आणि विचारांची देवाणघेवाण याची परिणती म्हणजे ही खरड.

मुळात तेहरानला नजीकच्या भविष्यकाळात प्रचंड मोठ्या भूकंपाचा गंभीर धोका आहे, हे राष्ट्राध्यक्षांनी जाहीर करावे नि त्यानुसार पावले उचलायच्या तयारीस लागावे, याला खूळ म्हणावे की दूरदृष्टी हे कळण्याइतपत पुरेशी माहिती माझ्यापाशी नाही. तसेही इराणला भूकंपांचे वावडे नसावे. १८२०-३० मध्ये तेथे सगळ्यात मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर अमेरिकेशी सततची भांडणे, पाकिस्तानातून अण्वस्त्र निर्मितीसंबंधित तंत्रज्ञानाची चोरी, इराकबरोबरचे युद्ध नि आता अमेरिकेच्याच पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांमार्फत आर्थिक निर्बंध लादून इराणची कोंडी अशा एक ना अनेक कारणांनी इराण हादरत असतेच. पण बातमीतील इराणी महाशयांच्या वक्तव्याने इराण नाही तर बाकीची दुनिया हादरेल, हे मात्र नक्की! लौकिकार्थाने कापसाची किंवा तागाची शेती, कृत्रिम धाग्यांची निर्मिती, गिरण्यांचे संप, रेडीमेड कपड्यांची आयात, फॅशन, जगप्रसिद्ध फॅशन डिझाइनर्स यांच्याशी फारसे जवळचे संबंध असणार्‍यांपैकी इराण नाही. तसे असतानाही धर्मात नमूद केल्यानुसार स्त्रियांनी नखशिखान्त अंग झाकणारी वस्त्रे परिधान करण्याचा पुरस्कार करणारे हे इराणी महाशय तसे संकुचित विचारांचेच म्हटले पाहिजेत. आकाराने तसेच संख्येने कमीत कमी कपडे वापरून त्यायोगे यंत्रमागांची घरघर, वातावरणातील कार्बनचे वाढते प्रमाण, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे कमी करण्याच्या दृष्टीने सगळे जग पावले उचलत असताना हे महाशय मात्र अगदी विरुद्ध दिशेने वाटचाल करू पाहत आहेत. याबद्दल खरे तर इराणाचा सार्वत्रिक निषेध व्हायला हवा; पण इराणने आपल्याला इतके काही भरभरून दिले आहे की निदान मला तरी असा निषेध करवत नाही.

इराण म्हटले की सगळ्यात पहिल्यांदा मला आठवतो तो 'कोपर्‍यावरचा इराणी'. मुंबईत एके काळी बहराला आलेली ही जमात आजकालच्या पिढीला माहीतदेखील असेल की नाही, अशी शंका येते. बरे आपण म्हणावे "तो कोपर्‍यावरचा इराणी.." आणि समोरच्याने "कोण रे?" असे विचारून आपलेच दात घशात घालावेत, अशी स्वतःची गत करून घ्यायला मला तरी आवडायचे नाही. इराण्याला नाव नसतेच. ज्याच्या हाटेलावर नावाची पाटी असेल, तो अस्सल इराणी नाहीच. किंबहुना तो नेहमी कुठल्यातरी कोपर्‍यावरचाच असल्याने नि तुम्ही मुंबईत जेथे कोठे असाल, तिथून कोपरभरच लांब असल्याने 'कोपर्‍यावरचा इराणी' इतकीच त्याची ओळख पुरेशी असते. मग ते भेटीचे ठिकाण असो, नवख्या माणसाने पत्ता चुकू नये म्हणून सांगायची खूण असो, सकाळी कचेरीत जायच्या आधी ब्रून-मस्का किंवा बन-मस्का, आम्लेट-पाव नि कटिंग हा ठरलेला नाश्ता हाणायची जागा असो की फुकटात पेपर वाचायला मिळायचे नि त्यातील बातम्यांचा काथ्याचे (व घड्याळ्याच्या काट्यांचे!) कूट करायचे वाचनालय! कॉलेजात जायला लागल्यावर मग घरी येताना मटण पॅटिस किंवा खिमा पॅटिस, टोस्ट किंवा खारी, कधी लहर आलीच तर पुडिंग, चहा नि सिगरेट असा शाही बेत मित्रांच्या संगतीने जमवायचा. तुम्ही नेहमीचे गिर्‍हाइक असाल, तर तुम्हाला खुर्ची उलटी फिरवून बसण्याचीही मुभा असते. शक्य तितक्या जुनाट काळ्या रंगाची खुर्च्या-टेबले, त्यांवर तितक्याच उठून दिसणार्‍या पांढर्‍या कपबशा नि बाउल्स, स्टीलचे चकचकीत चमचे आणि रोमन आकडे असलेले, टोल्यांचे पण कधी टोले न वाजणारे घड्याळ ही अस्सल इराण्याची ओळख आहे. कालौघात त्याच्या पुढील पिढीतील नतद्रष्टांनी हाटेलांना 'कॅफे गुडलक' किंवा तत्सम नावे देणे, आतले फर्निचर नूतनीकरणाच्या नावाखाली बदलणे, विनाकारण उत्तर भारतीय नि दाक्षिणात्य पदार्थही उपलब्ध करून देणे वगैरे सांस्कृतिक भेसळ करून ही ओळख पुसायला सुरुवात केली. मॅक्डोनाल्ड वगैरे चालू झाल्यावर तर सगळी पिढीच बिघडू लागली; पण निष्ठावान खवय्या इराण्याला विसरला नाही नि त्याच्याच जिवावर उरलासुरला इराणी अजूनही तग धरून आहे. अंधेरी स्टेशनबाहेरील मॅक्डोनाल्ड मध्ये जितकी गर्दी असते त्याच्या अनेकपट गर्दी समोरच्या इराण्याकडे असते! मॅक्डीच्या बाहेरील जोकर जितके लक्ष वेधून घेत नाही तितके इराण्याच्या बसक्या कपाटाच्या काचेमागील पिवळाजर्द वर्ख नि पापुद्रे ल्यालेले नि वेड लावणारा घमघमाट सुटलेले खिमा पॅटिस, मटण पॅटिस, खारी, मावा केक वगैरे मला खुणावत असतात.

नदीचे मूळ नि ऋषीचे कूळ विचारू नये असे काहीतरी ऐकून आहे. इराण्याच्या बाबतीतही हे तितकेसे खोटे नसावे. कारण ज्याला भारतात लौकिकार्थाने पारशी समजले जाते तो मूळचा इराणी (पर्शियन) आहे, आणि इराणी असूनही त्याचा धर्म मुस्लिम नाही, त्याला दाढी नाही तर डोकीवर ज्यूंसारखी छोटी लाल गोल टोपी नि अंगात पैरण आहे वगैरे लक्षात येऊ लागले की गोंधळ उडालाच म्हणून समजा. अलीकडे महंमद अली रोड वर काही इराणी ढंगाची हाटेले दिसली ते हायब्रिड इराणी किंवा अस्सल मुसलमान असावेत, असे वाटते. त्यांच्याकडे बिर्याणी, खिमा, चिकन कोर्मा, कबाब वगैरे हाणायला मिळते; त्याची लज्जत औरच. पण त्याची ब्रून-मस्का नि चायशी तुलना करू नये. यू कॅनॉट कम्पेअर अ‍ॅपल्स अ‍ॅन्ड ऑरेन्जेस! (यू मे लव बोथ, दो!) त्यामुळे इराणी ईद साजरी न करता नौरूज कसा काय साजरा करतो, मशिदीत न जाता अग्यारीत कसा सापडतो इ. प्रश्नांचे खरे उत्तर इराणमध्ये ईद आणि नौरूज दोन्ही जोरदार साजरे कसे होतात, याच्याच उत्तरात दडले आहे. किंबहुना इराणमधील बिगरमुस्लिम इराणी तेथील जाचक धार्मिक निर्बंधांना कंटाळूनच भारतात येऊन थडकला असावा की काय, अशी कधी कधी शंका येते. प्रत्यक्षात, हा झोराष्ट्रीयन समाज बव्हंशी इराणबाहेर स्थलांतरीत झाल्यानंतरच तेथे मुस्लिमप्राबल्य असलेले लोकजीवन रुजले, असे कुठेतरी वाचायला मिळाले. आणि ते नुसतेच रुजले नाही तर बहरलेसुद्धा!

शॉर्ट स्कर्ट्स, फ्रॉक्स आणि डोक्याला रुमाल बांधलेल्या पारशी तरुणींचे मूळ मुस्लिमप्राबल्य असलेल्या मध्यपूर्वेतील इराणमध्ये आहे, यावर तर सुरुवातीला विश्वासच बसत नसे. खरे तर गोरा रंग, धनुष्याकृती रेखीव भिवया, सरळ तजेलदार नाक, पाणीदार डोळे, मधाळ हसू आणि कमनीय बांधा यांच्या कसोटीवर खरी उतरणारी पारशी तरुणी विरळीच. पारशी तरुणींनी जमाना नाचवावा तो फॅशन, बिनधास्तपणा नि रंगीबेरंगी फुलांची किंवा इतर मुक्तहस्त चित्रे असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कपड्यांच्या जोरावर. याउलट उपरोल्लेखित गुणविशेष असलेली इराणी मुस्लिम तरुणी तुलनेने कमी बोलकी, अदबशीर, सोज्वळ चेहरेपट्टी असलेली; गोड बोलणारी. अर्थात पारशी संस्कृती भारतात बहरली नि इराणी मुस्लिम संस्कृती इराणमध्ये. त्यामुळे इराणमधील स्त्रियांच्या जीवनाबद्दल जे काहीशा विस्ताराने ऐकता आले, ते कचेरीतील दोन इराणी स्त्री सहकार्‍यांकडूनच. इराणमधील स्त्रीवर्गात शिक्षणाचे वाढू लागलेले प्रमाण, गणित नि विज्ञानातील तसेच स्थापत्यशस्त्रातील प्रगती व त्यातील स्त्रियांचे योगदान, स्त्रीवर्गाचा कला, साहित्य नि पत्रकारिता क्षेत्रातील वाढता प्रभाव याबद्दल त्या भरभरून बोलतात तेव्हा इराणमधील स्त्रीजीवनाची व त्यातील स्थित्यंतराची पुसटशी तरी कल्पना यावी. असे असताना टाइम्स ऑफ इन्डियामधील उपरोल्लेखित बातमीमधील मुक्ताफळे उधळणार्‍या इराणी मुल्लाची मते या प्रगतीशील समाजाला कशी मागे खेचू पाहत आहेत, हे स्पष्ट व्हायला हवे.

बर्‍यापैकी खुलेआम पद्धतीने इराणमध्ये चालू असलेली अण्वस्त्रनिर्मिती; पाकिस्तानातून झालेली तंत्रज्ञानाची चोरटी आयात; धगधगते, प्रतिकूल, इराणविरोधी आंतरराष्ट्रीय वातावरण नि दबाव या सगळ्याला सध्या सामोरा जात असलेला इराणी गझला, रुबाया, फार्सी भाषा, प्रिन्स ऑफ पर्शियासारखे लोकप्रिय संगणकी खेळ, सोहराब नि रुस्तुम च्या रंजक गोष्टी, आशियाई फुटबॉल, वेगवेगळ्या प्रकारच्या चहांची चाहत, गोलाब नि त्याचे अत्तर या सगळ्याशीही थेट संबंधित आहे, हे नजरेआड करता येत नाही. मध्यपूर्वेतील या अ‍ॅटमबॉम्बच्या पोटात दडलेली ही सगळी रसायने जगात अगोदरच सर्वसमाविष्ट झाली आहेत. पुढेमागे काही स्फोट व्हायचाच असेल तर तो अशा सर्वदूर संस्कृतीप्रसाराचाच व्हावा, म्हणजे अमेरिकेत बसूनही आम्हांला भायखळ्याच्या रिगल किंवा ग्रान्ट रोडच्या मेरवानच्या सुखाला पारखे झाल्याची चुटपुट लागून रहायची नाही.

संस्कृतीप्रवासवावरइतिहाससमाजजीवनमानराहणीभूगोलमौजमजाप्रकटनविचारलेखमतप्रतिसादअनुभवमाहितीप्रतिक्रियाआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

21 Apr 2010 - 12:57 pm | विसोबा खेचर

पुढेमागे काही स्फोट व्हायचाच असेल तर तो अशा सर्वदूर संस्कृतीप्रसाराचाच व्हावा, म्हणजे अमेरिकेत बसूनही आम्हांला भायखळ्याच्या रिगल किंवा ग्रान्ट रोडच्या मेरवानच्या सुखाला पारखे झाल्याची चुटपुट लागून रहायची नाही.

वा! खरं आहे..

एक खूप छान लेख, अनेक संदर्भ असलेला!

आपला,
(मेरवान, कयानी आणि बास्तानीप्रेमी मुंबैकर) तात्या.

निखिल देशपांडे's picture

21 Apr 2010 - 12:59 pm | निखिल देशपांडे

लेख आवडला..
कोपर्‍या वरचा ईराणी... ब्रुन मस्का, बन मस्का...
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Apr 2010 - 1:26 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्कृष्ट लेखन. बेलाशेठने बर्‍याच दिवसांनी लिहिले काही. मस्त आहे. :)

इराण हा असाच मला नेहमी खुणावणारा देश. प्राचीन इतिहास असलेला... धर्माच्या लाटेत पूर्णपणे संस्कृतीपालट झालेला... तरीही आपल्या प्राचीन संस्कृतीला न विसरलेला... त्या काळाला 'जाहिलियत' न म्हणणारा... पण तरीही वर्तमानात धर्माचाच पगडा असणारा... नेहमीच खुणावणारा.

दुबईत असताना एक दोन इराणी सहकारी होते. त्यांच्याकडून सद्य इराण बद्दल बरेच काही कळले. मुल्लांचा पगडा असला तरी आधुनिक विचारांचा आणि सुशिक्षित असाही बराच मोठा वर्ग तिथे आहे. आजूबाजूच्या इतर मुस्लिम देशांपेक्षा स्त्रियांना बरेच जास्त मोकळेपण आहे. शिक्षणाचे प्रमाणही लक्षणिय आहे.

मला जाणवलेले अजून एक. 'अरबांनी आमच्यावर विजय मिळवला, त्यांचा धर्म आमच्यावर लादला पण तरीही आम्हीच अरबांपेक्षा श्रेष्ठ आहोत' ही एक सुप्त भावना मला तरी जाणवली.

बिपिन कार्यकर्ते

एक's picture

21 Apr 2010 - 10:58 pm | एक

अतिशय सुंदर लेख!!

चेलोकबाबी ची उगाच आठवण करून दिलीस..खूप दिवस तिकडे जायच-जायचं असं म्हणत आहे पण साला योगच येत नाही आहे.

टारझन's picture

21 Apr 2010 - 11:10 pm | टारझन

क्या बात ! क्या बात !! क्या बात !!!
फॉर्मात काय बेला ?

- वेसणघालु

आनंदयात्री's picture

22 Apr 2010 - 12:22 am | आनंदयात्री

मस्त लेख रे बेला. आणी छान सविस्तर लिहल्याने वाचायला आवडला.
तु लिहता झालास पाहुन आनंद झाला. असेच वरचेवर लेख आणी मुख्य म्हणजे कविता येउ दे.

संदीप चित्रे's picture

22 Apr 2010 - 1:36 am | संदीप चित्रे

कोपर्‍यावरच्या इराण्याची आठवण काढून अंमळ हेलावलो महाराजा !
कॉलेजच्या जमान्यात इराण्याच्या हॉटेलात बसून समोसे/चहा खात - पीत, किशोरची गाणी ऐकत, अभ्यास करतानाच रस्त्यावरची कुठलीही 'प्रेक्षणीय' हालचाल नजरेतून सुटू न देण्याचे मल्टिटास्किंग केलेले आठवलं :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

भाग्यश्री's picture

22 Apr 2010 - 1:41 am | भाग्यश्री

छान लेख!
गाथा इराणी अलिकडेच वाचल्याने काही संदर्भ आठवत आहेत.
तसेच एका इराणी बाईचे "फनी इन फारसी" हे (तसे बोअरिंगच, परंतू) इराण व इराणीलोकांबद्दल थोडीफार माहिती देणारे असल्याने आवडले होते.
इराणी लोकं शिक्षणाबद्दल खूप उत्साही असतात व त्यासाठी बाहेरदेशी जातात हे ऐकले होते व पाहीलेही होते. इंजिनिअरिंग करताना कॉलेजमध्ये बरीच इराणी मुलं पाहील्याचे आठवतंय.
पूर्वीचा इराण बराच प्रगत व सद्ध्याचा दबावामुळे अप्रगत अशी विचित्र परिस्थिती असल्याने, सद्ध्याच्या तरूण मुलींच्या आयांनी मनसोक्त स्वातंत्र्य उपभोगलेले व त्या मुली मात्र हिजाब,मुलींनी गाऊ नये वगैरे दबावाखाली कोमेजलेली.. !
दुर्दैवाने मी कधीच इराण्याकडे खाल्ले नाहीये. त्यामुळे तो एक भाग मला अनोळखीच..

चतुरंग's picture

22 Apr 2010 - 2:26 am | चतुरंग

पूर्वी मुंबईत कामानिमित्त येणेजाणे हमखास असे त्यावेळी दादर स्टेशनच्या बाहेरच्या इराण्याकडे डब्बल ऑम्लेट, बन्-मस्का आणि फक्कड चहा असा मजबूत आधार घेऊनच मी पुढे जाई त्याची आठवण झाली!
तसा आमचा आवडता खेळसुद्धा भारतातून पर्शिया (इराण) मार्गे सर्वदूर पसरलाय त्यामुळे जिव्हाळ्याचे संबंध आहेत!

(शतरंज का खिलाडी)चतुरंग

सन्जोप राव's picture

22 Apr 2010 - 5:18 am | सन्जोप राव

रसिकतेने लिहिलेला लेख आवडला. यात आता 'बुर्ज दुबई' नाही, 'बुर्ज खलिफा' आहे अशा तांत्रिक सुधारणा सुचवणे म्हणजे या रसिकतेचा अपमान करण्यासारखे आहे, असे वाटते.
सन्जोप राव
इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे?
शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

प्रभो's picture

22 Apr 2010 - 5:25 am | प्रभो

बर्‍याच दिवसांनी बेला चा लेख...मस्त... आवडला..

MG Road पुण्याच्या नाझ ची आठवण झाली.. काय ते गोबी समोसे आणी पानी कम चाय..आहाहा..

फक्त लेखाचं नाव वाचून बेला काय, सुदुर पुर्वेला चक्कर टाकून आला की काय?? (केक झाला आता अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय) :)

रेवती's picture

22 Apr 2010 - 6:36 am | रेवती

मी इराणी हाटेलात कधीच गेले नाही त्यामुळे पदार्थांच्या चवीचा अनुभव नाही पण आपले लेखन मात्र आवडले व चवीने वाचले.

रेवती

चित्रा's picture

22 Apr 2010 - 6:56 am | चित्रा

अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात, मुस्लिम नाही असे दिसले आहे. नुसते "इराणी" नाहीत, "पर्शियन". इराणमधले स्थापत्य प्रसिद्ध आहे (उदा. एस्फाहान)

त्यांच्यापैकी अमेरिकेत आलेले अनेक लोक सध्याच्या राजकिय परिस्थितीवर अजिबात संतुष्ट नाहीत, त्यांच्याकडील सत्तेवर अंकुश असलेल्या मुल्लामौलवींच्या धार्मिक दबावावरून बोलताना जराही घाबरत नाहीत, शब्द मोजून अचूक वापरतात असे पाहिले आहे.

निदान तीन इराणी लोकांना जवळून पाहिले आहे. एकंदरीत इराणी लोक मला रोचक वाटतात. (तसे कुठचे नसतात म्हणा?).

Nile's picture

22 Apr 2010 - 7:16 am | Nile

अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात,

त्यांच्यापैकी अमेरिकेत आलेले अनेक लोक सध्याच्या राजकिय परिस्थितीवर अजिबात संतुष्ट नाहीत

माझ्या ग्रुपमध्ये बरेच इराणी आहेत. वरील निरिक्षणाशी मी सहमत आहे. मला तरी ही मंडळी बर्‍यापैकी (मुस्लीमांपैकी, भारतातील काही अनुभवांनुसार) 'शहाणी' वाटली. (मुल्ला मुर्खासारखे बडबडबडतोय, धर्मांधांनी नसती बंधने लादली आहेत, आधुनिक विचार-आचारांचे पालन इत्यादी बाबतीत त्यांची आणि माझी मते अगदी जुळतात हे कळल्यावर मला थोडे (सुखद)आश्चर्यच वाटले)
आपल्यात आणि त्यांच्यात बरीच साम्यं ही आढळली (एक इराणी मित्र तर संतुरसुद्धा वाजवतो).

बेसनलाडू's picture

22 Apr 2010 - 7:35 am | बेसनलाडू

लेखात उल्लेख केलेल्या इराणी स्त्री सहकार्‍यांच्या बाबतीत हाच अनुभव आला आहे.
(अनुभवी)बेसनलाडू
येथील विद्यापिठात शिकताना एका इराणी विद्यार्थ्याशी ओळख झाली होती आणि काही तास त्याच्यासोबत गप्पा मारता आल्या होत्या. लेखात उल्लेखलेल्याप्रमाणे तोही इराणी स्थापत्यशास्त्राबद्दल भरभरून सांगत होता (अमेरिकेत स्थापत्यशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आला होता), त्याची आठवण झाली.
(स्मरणशील)बेसनलाडू

नंदन's picture

22 Apr 2010 - 12:41 pm | नंदन

>>> अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात, मुस्लिम नाही असे दिसले आहे. नुसते "इराणी" नाहीत, "पर्शियन".
--- सहमत आहे. एका पश्तुन माणसाचं 'आम्ही गेली ५००० वर्षं पश्तुन, १३३० वर्षं मुसलमान आणि ६३ वर्षं पाकिस्तानी आहोत' हे विधान आठवलं. असंच काहीसं पर्शियन अस्मितेबद्दलही वाचलं होतं. प्राचीन संस्कृतीबरोबरच अरब वंशीय - बिन अरब वंशीय, सुन्नी - शिया इ. भेदांमुळेही थोडी अलगतेची भावना निर्माण होत असावी.

अवांतर - इस्लामपूर्व काळातले 'मित्र' देवतेचे अग्निमंदिर

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Apr 2010 - 7:14 am | अक्षय पुर्णपात्रे

इराणी हॉटेल्सचा चांगलाच अनुभव आहे. पुण्यातल्या गुडलक, लकी आणखी कित्येक ठिकाणी बराचवेळ घालवला आहे. इराणी हॉटेलातल्या चहाचे तसेच काही पदार्थांचे उगीच कौतुक होते असे वाटते. (इकडचे हे आणि तिकडचे ते खाऊन पहा असे सल्ले कृपया देऊ नयेत.) काही पदार्थ ठीकच असतात. (पुण्यातल्या कॅफे सनराइजला चांगला नाश्टा मिळायचा. नव्या चित्रकारांची चित्रेही लावलेली असत.) काउंटरवर सिगरेट मिळण्याची सोय आणि वाट्टेल तितका वेळ बसता येते म्हणून अनेकांना या जागा आवडतात व नॉस्तॅल्जिक करतात. त्यात काही (कॉर्नरच्या) हॉटेलात उघड्या खिडक्या आणि आरसे असल्याने अनेकांना मौज वाटते. एक-दोन वर्षांपुर्वी काही मित्रांसकट गुडलकला गेलो तेव्हा सेल्स रिप्रेजेंटेटिव्जच्या अड्ड्यात गेल्यासारखे वाटले.

अनेक इराणी लोकांशी जवळून संबंध आला आहे. पुण्यात असतांना इराण-इराक युद्धात लढलेला एक मित्र होता. त्याचे कुटूंबिय उच्चपदस्थ असल्याने अमेरिकेविरुद्ध कायम नाके मुरडण्यास त्याला खूप आवडत असे. अमेरिकेत आल्यावर एक-दोन डावे कार्यकर्ते (तेव्हा आता नाही. आता अमेरिकन नागरिक) भेटले. त्यांचे एकूणातच मत इतर डाव्यांप्रमाणेच होते. (त्यांच्या देशातील (अमेरिकेचे रहिवासी असलेले) राष्ट्रवादी त्यांना झोडतात हेही नेहमीचेच.) इतर काहीजण आहेत त्यांना इराणमध्येच संस्कृतीचा उगम (एकाचे शेवटचे नाव अझरबैजानी आहे) झाला आहे, असे वाटते. हेही नेहमीप्रमाणेच.

इराणमध्ये होत असलेल्या निदर्शनांत (उच्च मध्यमवर्गीय सोडून) सामान्य माणसांचा कितपत सहभाग असतो याविषयी साशंक आहे. काही वर्षांपुर्वी पाहिलेला 'द विंड विल कॅरी अस' हा सिनेमा खूप आवडला होता. बरेचसे इतर सिनेमे मात्र ओवरहाइप्ड वाटले.

नितिन थत्ते's picture

22 Apr 2010 - 12:04 pm | नितिन थत्ते

>>पुण्यातल्या कॅफे सनराइजला चांगला नाश्टा मिळायचा..

आपण बहुधा जुने वरीजनल सनराईज -१९८२ आधीचे- पाहिले नसणार. गोल मार्बल टॉपची टेबले आणि गोल बुडाच्या हलक्या खुर्च्या असलेले. नंतर तर सनराईज ऐवजी डोसा डायनर की काहीतरी झाले होते.

इराण्याच्या हाटेलाची खासियत म्हणजे सात आठ जणांत ४ चहा मागवून २ तास बसता येणारे हाटेल.

तसेच स्वस्त नाश्ता मिळण्याचे ठिकाण. महिनाअखेरीस ब्याचलरांसाठी चांगले ;)

नितिन थत्ते

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Apr 2010 - 6:48 pm | अक्षय पुर्णपात्रे

मी पुण्यात असतांनाच झाले होते. ८२च्या आधीचे सनराइज पाहिलेले नाही.

नितिन थत्ते's picture

22 Apr 2010 - 7:10 pm | नितिन थत्ते

१९८२ (की १९८३?) मध्ये तळजाईच्या पठारावर (अरण्येश्वराच्या पुढे) संघपरिवाराचे जनजागरण अभियान झाले होते. २ की ३ दिवसांच्या शिबिरानंतर एक 'शिस्तबद्ध' मिरवणूक निघाली होती. ती मिरवणूक लकी रेस्टॉरंट, सनराईज मार्गे जं म रस्त्यावरून शिवाजी नगर कडे गेली त्या मिरवणूकीतील जमावाने लकी चे थोडे नुकसान केले आणि सनराईज जाळून टाकले (असे म्हटले जाते. सनराईज जळले ही वस्तुस्थिती). त्यानंतर ते पुन्हा सुरू झाले तेव्हा त्याचे स्वरूप टिपिकल इराणी नव्हते.

नितिन थत्ते

प्राजु's picture

22 Apr 2010 - 7:52 am | प्राजु

व्वा!! बेला..
अतिशय सुरेख लेख!! उत्कृष्ट!!
बर्‍याच मुद्यांना स्पर्श करणारा आणि बरीच माहीती नव्याने सांगणारा.
खूप दिवसांनी लेखणी हाती घेतलीस आणि एक सुंदर मेजवानीच मिळाली अगदी त्या ब्रून्-मस्का सारखीच.. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

श्रावण मोडक's picture

22 Apr 2010 - 11:34 am | श्रावण मोडक

छान लेख. आवडला!

बापु देवकर's picture

22 Apr 2010 - 12:32 pm | बापु देवकर

बरेच दिवसानी तुझा लेख वाचला...अजून एक "बेला के फूल" आवडले.

नंदन's picture

22 Apr 2010 - 12:33 pm | नंदन

लेख. ब्रिटानिया आणि मेरवानमध्ये केलेल्या खादाडीच्या आठवणी पुन्हा चाळवल्या गेल्या :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश's picture

22 Apr 2010 - 5:32 pm | स्वाती दिनेश

बरेच दिवसांनी लिहिलंस बेला,
छानच लेख, आवडला...
स्वाती

यशोधरा's picture

22 Apr 2010 - 5:55 pm | यशोधरा

मस्त लेख! अतिशय आवडला!

अरुंधती's picture

22 Apr 2010 - 6:40 pm | अरुंधती

इराण्याच्या हाटेलात बसून किती वेळ टीपी केलाय, किती वेळा तेथील बन-मस्का आणि जेव्हा सामिषाहार करायचे तेव्हा अजून बर्‍याच पदार्थांची खुमारी अनुभवली आहे त्याला गणतीच नाही. डेक्कनवरचे गुडलक, लकी, सनराईझ आणि खूप पूर्वी टिळक रोडला एस.पी. कॉलेजजवळही एक इराण्याचे हाटेल होते तिथे माझे वडील मला कायम घेऊन जायचे त्यांच्याबरोबर! गुडलकमध्ये वय वर्षे साडेतीन असताना टेबलाच्या वर बसून सामिषाहाराचा आनंद घेत गणपती अथर्वशीर्ष जोरजोरात म्हटल्याचेही आठवतंय!!!!!!
एक कप चहा, खारी किंवा टोस्टच्या जोरावर तिथे वडीलांबरोबर बराच काळ वर्तमानपत्रातील मला त्या वयात अगम्य मजकूर वाचण्यात घालवलाय. अलका टॉकीजसमोरच्या इराण्याकडे तेव्हा ज्यूक बॉक्स सारखेही काहीतरी होते. तरुण मुले येऊन त्यावर आवडती गाणी वाजवत असत. आजूबाजूला सिगरेटचा धूर, सोबत चहाचा प्याला आणि तेच ते इराण्याच्या हाटेलातले नेहमीचे रिलॅक्स्ड वातावरण!
कॉलेजात असतानाही खिशात कडकी असली की उदरभरण करायला इराणी ब्येष्ट असायचा. गेल्या अनेक वर्षांत इराण्याच्या हाटेलात जाणे झाले नाही. ढोले पाटील रोडला असलेल्या ''झामूज'' नामक पारशी रेस्टॉरंटमध्येही कॉलेजात असताना पडीक असायचो.

पारशी समाजात माझे बरेच मित्र मैत्रिणी आहेत. दादरच्या पारसी कॉलनीत कधी काळी इतके येणे-जाणे होते की तिथले फुलवाले, दुकानदार मला पैसे सुट्टे नसले तर सरळ माल उधार देऊ लागले होते! त्या रस्त्यावर नेहमी फिरायला येणारे बावा बावीदेखील मान हालवून ओळख द्यायचे तेव्हा तर फार मजा यायची. माझ्या तीन-चार पारशी मित्रमैत्रिणींची लग्नेही मला बघायला मिळाली. अगदी पारसी अग्यारीत जाऊन! खूपसे विधी हिंदूंसारखेच असतात. जाम धमाल असते लग्न-समारंभात! आणि आजूबाजूला सगळे पारसीच पारसी! त्यांच्या ''केम छो डिक्रो'' मध्येही इतका गोडवा असतो की काही विचारू नका! खूप जीव लावणारी माणसं!

मी लहान असताना पुण्याच्या के.ई.एम. हॉस्पिटलचे तेव्हाचे डीन असलेले डॉ. भरुचा (हार्ट सर्जन) ह्यांनी माझे अगदी किरकोळीतले पायाचे फुटकळ ऑपरेशन केवळ एका सहकारी डॉक्टरच्या शब्दाखातर केले होते! डॉक्टर भरुचाही एकदम टिपिकल पारसी होते!! वयाने आणि हुद्द्याने तेव्हा ते बरेच सिनियर होते. पण माझ्याशी बोलताना अतिशय खट्याळपणे, मला चिडवत बोलत असत. ऑपरेशन झाल्यावर मी त्यांच्या कँपातल्या डिस्पेन्सरीमध्ये ड्रेसिंग बदलून घ्यायला जायचे. डिस्पेन्सरीतले वातावरण अगदी टिपिकल पारसी! त्यांची नर्सही खूप छान, आकाराने अवाढव्य अशी प्रेमळ पारशीण होती. मला त्यामुळे ''ब्रेव्ह गर्ल'' करत गोळ्या चारल्या जायच्या. आणि डॉक्टर??? त्यांनी एकदा सुनावले मला, ''डिक्रा, तू माझा फी नाय दिला. नेक्स्ट टायमाला मला माझा फी पायजेल.'' आणि मी खरेच त्यांच्या चिडवण्याला फशी पडून माझी अख्खी पिगी बँक [पावडरचा रिकामा डबा] त्यांच्यासमोर उपडी केली होती, ज्यात १ पैसा, ५ पैसे व १० पैशाची बरीच नाणी होती. ते पाहून डॉक्टरला खरोखरी भरून आले आणि त्यांनी प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवल्याचे अजून स्मरते! :-)

अशा पारशी बावांच्या, बाविणींच्या आणि इराणी हाटेलांच्या बर्‍याच आठवणी लेख वाचून जाग्या झाल्या! धन्यवाद!! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

श्रावण मोडक's picture

22 Apr 2010 - 7:26 pm | श्रावण मोडक

चांगला प्रतिसाद. आवडला.

यशोधरा's picture

22 Apr 2010 - 7:19 pm | यशोधरा

अरुंधती, छान लिहिलं आहेस :)

भोचक's picture

22 Apr 2010 - 7:33 pm | भोचक

बेला, भयंकर आवडला लेख. वर्तमान राजकीय, सामाजिक संदर्भांसह नॉस्टॅल्जियाही छान जागलाय. शिवाय माहिती देतानाची लालित्यपूर्ण बेला शैलीही खास.

बाकी आमच्या नाशिकमध्येही अशोकस्तंभाजवळ 'मेहेर' नावाचं इराण्याचं हॉटेल होतं. आता ते पाडून टॉवर उभारलाय. तरीही ती जागा मेहेर याच नावाने ओळखली जातेय. त्यावेळी आमचा दादा त्या हॉटेलविषयी असेच 'नॉस्टॅल्जिक' होऊन सांगायचा. तुम्ही वर्णन केल्याप्रमाणेच ते हॉटेल होतं. अरूंधती ताईंची प्रतिक्रियाही मस्त.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

श्रावण मोडक's picture

22 Apr 2010 - 7:40 pm | श्रावण मोडक

मेहेर... क्या बात है! जुन्या आठवणी जाग्या झाल्या. नंतरच्या काळात मेहेरच्या शेजारी एका कॉम्प्लेक्समध्ये एका हाटेलात चवदार मिसळीसोबत केलेल्या गप्पाष्टकही आठवलं. मेहेरच्या इथंच त्या काळात मिटिंग पॉईंटही होतं. तिथं मित्रांना भेटून रंगवलेली (कधी शक्य न होणाऱ्या) स्वप्नांची आठवण झाली.

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Apr 2010 - 8:25 pm | अक्षय पुर्णपात्रे

हॉटेल कधी पाहीले नसावे.किंवा पाहीले असावे पण लक्षात नसावे. जुन्या मुंबई आग्रा रस्त्यावर (त्र्यंबक रस्त्याच्या समोरचा कॉर्नर, टीळक वाचनालयासमोर) एक इराणी हॉटेल आठवते.

टिउ's picture

24 Apr 2010 - 9:38 pm | टिउ

कधीची गोष्ट आहे? मेहेर नावाच्या हॉटेल मधे कधी गेल्याचं आठवत नाही. पण तिथेच विश्वा की विश्वा पॉंईंट नावाचं एक हॉटेल होतं. काय पाव भाजी मिळायची तिथे! मला वाटतं आता तिथे पण शॉपींग काँप्लेक्स उभारलाय...

भोचक's picture

24 Apr 2010 - 10:29 pm | भोचक

त्या विश्वा पॉईंटच्या शेजारी सिंदेकर प्लाझा नावाची बिल्डिंग उभारलीय. त्याच जागी मेहेर हॉटेल होतं. त्या जागेला आजही मेहेर म्हणूनच ओळखलं जातं. बसही त्याच्या अलीकडे-पलीकडे मेहेर म्हणूनच थांबायच्या. आता बस स्टॉप पुढे गेला आहे.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

नितिन थत्ते's picture

24 Apr 2010 - 10:30 pm | नितिन थत्ते

१९८० मध्ये तरी मेहेर हॉटेल होतंच. मी पाहिलं होतं. नंतरचं माहिती नाही. १९८८ मध्ये गेलो होतो तेव्हाही बहुधा होतं.

नितिन थत्ते

भोचक's picture

24 Apr 2010 - 10:50 pm | भोचक

९५-९६ च्या सुमारास ते पाडलं. त्या जागी वामनराव लोखंडे नावाच्या बिल्डरने बिल्डिंग बांधली.

एकेकाळी मेहेरलगत असलेल्या प्रधान पार्कमध्ये रहाणारा (भोचक)

शुचि's picture

24 Apr 2010 - 3:38 am | शुचि

मस्त लेख.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.

राजेश घासकडवी's picture

24 Apr 2010 - 4:07 am | राजेश घासकडवी

इराण या शब्दांत दडलेल्या अनेक कल्पनाचित्रांचं समर्थ कोलाज. आवडलं.

सहज's picture

27 May 2010 - 3:01 pm | सहज

सुंदर लेख.

बेला अजुन येउ दे.