या कातरवेळी, पाहिजेस तू जवळी
नेहेमीप्रमाणे आज कट्टयावर सगळे जमले होते खरे पण आज रोजच्या सारखं बिलकुल वाटत नव्हतं. खामकरांची उणीव सर्वांनाच जाणवत होती. शेवटी रेगे म्हणाले, "खामकर नाही तर एकदम चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय" "हो ना, बिचाऱ्यांची मुलाशी शेवटची भेट झाली असती तर बरं झालं असतं." एक निश्वास सोडून कर्वे म्हणाले. "हे तुम्हाला वाटतंय हो. त्यांच्या मुलाला काही आहे का त्याचं! म्हातार्या आईवडलांना सोडून खुशाल अमेरिकेला जाऊन बसायचं. इकडे म्हातारा म्हातारी असले काय आणि नसले काय, यांचे राजाराणीचे संसार चालू!" देशपांडे संतापून म्हणाले.