मी बाई होते म्हणुनी - भाग १३

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
28 Feb 2017 - 7:05 pm

मी तिथुन निघाले, मनांत काही विचार चालु होतेच, समोरुन काही दासी येताना दिसल्या त्यांना एका कामाला लावलं अन् माझ्या दालनात येउन माझी तयारी सुरु केली, काही मोठया पेटयात ठेवलेले सामान काढायला लावलं, तेवढ्यात मगाशी गेलेली दासी परत आली, तिनं येउन सांगितलं की त्या दोघी सुवर्णलंकाराच्या सहित निळ्या रंगांच्या वस्त्रांची तयारी करत आहेत, मी देखील माझी तयारी करायला सुरुवात केली, काही वेळानं आई दालनात आली, आणि त्याचवेळी मी मागवलेल्या वस्तु घेउन दासी सुद्धा येत होत्या, त्यांच्याकडं पाहुन आईनं विचारलं, हे काय आहे, उर्मिले, हे सर्व का मागवलं आहे आज,....

... पुढे.....

मी आज तपकिरी रंगाच्या वस्त्रांवर करड्या रंगांच्या मोत्यांचे अलंकार घातले होते, आणि त्यावर खड्गबंध घातला होता, दासीनं माझं खड्ग आणलेले होतंच, ताटातुन ते उचलुन आईसमोर धरलं, आईनं त्याला हात लावला आणि माझ्याकडं पाहात हसुन म्हणाली, वा.. तिनं धनुष्य पणाला लावुन पती निवडला आणि तु काय खड्ग युद्ध करणार आहेस का, छान आहे विचार,’ तिनं ते वक्रखड्ग माझ्या बंधात सरकवलं, मी या टोकापासुन त्या टोकापर्यंत चालुन पाहिलं, ‘ अजुन थोडा डौल हवा आहे चालण्यात आणि हनुवटी सरळ समोर दोन्ही पायांच्या मध्ये असली पाहिजे, डोळे थेट समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे रोखलेले अन हात खड्गमुठीवर’ आईची दासी तिच्या म्हाता-या काप-या स्वरात बोलत होती.’ ‘ अशी तयारी करणार होतीस तर कालपासुनच सांगायचं, तुझं खड्ग सोन्याच्या साखळ्यांनी सजवुन ठेवलं असतं’ आई म्हणाली. ‘ प्रसंग उदभवलाच तर वापरता यावा यासाठी घेते आहे ते बरोबर, गुप्तचरांनी आज देखील काही शत्रु सैनिकांचा नगरीत वावर आहे अशी वार्ता दिली आहे’ मी आईला स्पष्ट केलं, ‘ अरे वा, म्हणजे आता तुला देखील स्वतंत्र गुप्तचरांची गरज पडु लागली वाटतं,’ आईनं किंचित आश्चर्य वाटुन विचारलं, ‘ नाही गरज तिला नाही, माणसं ओळखणं आणि विश्वास अविश्वासाचा खेळ समजुन घेता यावा यासाठी आम्हीच ही व्यवस्था केलेली आहे काही महिन्यांपासुन. नुसतं गोशाळेत वासरांना खेळवुन राज्य हाकता येत नाही आणि क्षत्रियकन्येला शस्त्र चालवण्याच्या शिक्षणाबरोबरच ती कधी आणि का चालवायची याचं ज्ञान असणं फार आवश्यक आहे. त्या व्यवस्थेचा एक भाग म्हणुन राज्याच्या गुप्तहेरांच्या समांतर आणखी एक दल उर्मिलेच्या आज्ञेत काम करत आहे काही काळापासुन,’ बाबा आत येत आईच्या प्रश्नांचं उत्तर देत होते.

मी झटकन् बाबांना नमस्कार केला, ‘भोजनाची व्यवस्था कोणी केली आहे वनांत उर्मिले, आणि वनविहाराच्या वेळी बरोबर किती सैनिक बरोबर असणार आहेत ?’ ‘ बाबा, श्रीसर्वण आणि त्यांचे चौदा सहकारी स्वयंपाकाच्या तयारीसाठी काल संध्याकाळीच वनांत गेले आहेत आणि वनविहाराच्या वेळी आमच्या बरोबर आठ सैनिक सहा पुरुष अंतरावर असतील तर हरेक सोळा मोठ्या झाडांच्या वर एक धनुष्यधारी सैनिक असेल अशी व्यवस्था आहे, आणि हे सर्व सैनिक तुमच्या विशेष दलातील असतील.; माझं उत्तर ऐकुन बाबांच्या चेह-यावर समाधान दिसत होतं, आई अजुन गोंधळात पडली होती, ‘ कधी पासुन सुरु आहे हे तुम्हा दोघांचं, इतर कुणाला माहित आहे का हे सर्व.’ तिनं विचारलं. ‘ ही व्यवस्था या राज्याच्या व्यवस्थेचाच एक भाग आहे, मांडवी गेले काही दिवस धन भांडार आणि श्रुतकिर्ती भुभाग,धान्य व पशु भांडार सांभाळत आहे, समांतर पद्धतीने, आणि या गोष्टी कुणाला कळु नयेत ही काळजी उर्मिलेनं घेतली आहे, गुप्तचर संस्था व सैन्य हालचाली या तिच्या निगराणीत होत्या.; बाबांच्या उत्तरानं आईच्या समाधान झालं की नाही कळालं नाही, पण चेहरा मात्र पडला होता.

आज मोठ्यांपैकी फक्त काकाच आमच्या बरोबर येणार होते, ते देखील वनांत उभारलेल्या मोठ्या कनातीपर्यंत. तिथुन पुढं आम्ही आठजण वनविहारासाठी जाणार होतो, त्यासाठी खास रथांची व्यवस्था केलेली होती, त्यांचे अश्व हे अतिशय संथगति चालण्यासाठी प्रशिक्षत केलेले होते, मोठ्या सणांच्या दिवशी किंवा युद्ध जिंकुन आल्यानंतर काका आणि बाबा त्याच रथांतुन नगर प्रदक्षिणा करायचे. दुस-या प्रहराला अजुन काही वेळ होता, मी वाड्याच्या बाहेरच्या दालनात येउन माझ्या गुप्तचरांच्या बरोबर काही चर्चा केल्या, काका येत असल्याची घोषणा झाली.. ताई, मांडवी अन् श्रुतकिर्ती त्यांच्याबरोबरच होत्या. वाड्याच्या मोठ्या दरवाज्याबाहेर मोठा रथ उभा होता. आठ अश्वांचा आणि चार चाकांचा तो रथ आमच्या रथसेनेच्या प्रमुखांचा होता. चारही बाजुंनी जाड शिसवी लाकडानं बनवलेल्या त्या रथाला लोहपट्ट्यांनी अधिक स्थिरता आलेली होती आणि आतल्या बाजुस अदमासे शंभर बाण आणि सहा धनुष्य ठेवलेले होते. काकांनी स्वताच्या सुवर्णरथाच्या ऐवजी या रथाची निवड का केली हे मला नक्की समजलं नव्हतं. मी कशी येणार आहे हे काकांना समजलेलं होतं, पण या तिघींना याची काहीच कल्पना नव्हती त्यामुळं त्या खुप गोंधळलेल्या दिसत होत्या, सर्वात जास्त गोंधळ ताईचा झाला होता, तिच्या बाजुनं मी चालताना माझ्या खड्गाचा तिला धक्का लागत होता, आणि या वेळी तिला सावरुन घ्यावं लागत होतं.

महिषीदलाच्या सैनिकांच्या मदतिनं या तिघी रथांत चढल्या, मी मात्र सहज उडी मारुन रथांत चढले आणि शेवटी काका वर आले. बाबा दुस-या रथात आरुढ झालेले मी पाहिलं होतं. सारथ्यानं निघण्याची अनुज्ञा मागितली काकांना. काका रथाच्या ध्वजदंडाच्या डाव्या बाजुला उभे होते आणि आम्ही बाजुच्या छोटया आसनांवर बसलो होतो. काकांनी मला ध्वजदंडाजवळ बोलावलं,’ शस्त्रसिद्ध असाल तेंव्हा..’ रथात बसुन राहायचे नाही.’ रथाशास्त्राच्या या नियमानुसार मी उभी राहावे असे त्यांनी सांगितले आणि त्यांच्या दुस-या बाजुनं ध्वजदंडाला धरुन उभी राहिले. काकांचा हात वर झाला तसा सारथ्यांनी अश्वांचे कासरे ओढले आणि त्या ओढीचा अर्थ समजुन आठही अश्व एका विशिष्ट लयीत चालायला सुरुवात झाली. त्या लयीचा परिणाम असा होत होता की रथात बसलेल्या कोणालाही धक्का बसत नव्हता. आज वनापर्यंतच्या रस्त्यांवर जलसिंचन केलेलं असल्यानं धुळ उडत नव्हती. राज्यातले नागरिक त्यांचे नेहमीचे व्यवहार करतच आमच्याकडे पाहुन नमस्कार करत होते.

टिप - आळस आणि काही इतर कारणांनी हि मालिका बराच काळ खंडित झाली होती, ती पुन्हा सुरु करत आहे. ह्या मागच्या भागाच्या लिंकस खाली दिल्या आहेत.

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964
मी बाई होते म्हणुनी .. भाग - ०६ http://misalpav.com/node/36166
मी बाई होते म्हणुनी .. भाग - ०७ http://misalpav.com/node/36252
मी बाई होते म्हणुनी . . भाग - ०८ http://misalpav.com/node/36339
मी बाई होते म्हणुनी . . भाग - ०९ http://misalpav.com/node/36429
मी बाई होते म्हणुनी . . भाग - १० http://misalpav.com/node/36490
मी बाई होते म्हणुनी . . भाग - ११ http://www.misalpav.com/node/36541
मी बाई होते म्हणुनी . . भाग - १२ http://www.misalpav.com/node/37010

समाजजीवनमान

प्रतिक्रिया

सूड's picture

1 Mar 2017 - 6:50 pm | सूड

वाचतोय.

यशोधरा's picture

1 Mar 2017 - 7:05 pm | यशोधरा

वाचतेय.

सखी-माऊली's picture

3 Mar 2017 - 10:38 am | सखी-माऊली

खुप दिवसानी.... लवकर येवु द्यात पुढले भाग...

अभ्या..'s picture

3 Mar 2017 - 10:53 am | अभ्या..

अह्हहाहाहाहा,

पन्नासराव, पटपटा येऊ द्या पुढचे भाग.

कविता१९७८'s picture

3 Mar 2017 - 4:00 pm | कविता१९७८

आज खुप दिवसांनी मिपावर आले, अधाशा सारखे आधी सर्व भाग वाचुन घेतले आता सर्व धाग्यांवर प्रतिसाद देते.

हा भाग ह नेहमी प्रमाणेच सुंदर.