मी बाई होते म्हणुनी .. भाग -०६

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
26 May 2016 - 1:29 am

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964

सगळी सभा आश्चर्यचकित होउन पाहात होती, तिनं पुन्हा एकदा काकांकडं पाहिल, आणि पुन्हा त्याच वेगानं ती प्रत्यंचा उतरवली, अन धनुष्य पुन्हा त्या चौरंगावर ठेवलं,त्याला नमस्कार करुन ती पुन्हा त्या संरक्षक कड्यातुन व्यासपिठावर परत आली. मी तिचे दोन्ही हात हातात घेतलं, तिच्या नाडीचे ठोके अतिशय जलद झालेले मला जाणवलं, तिला तिच्या आसनावर बसवुन आम्ही तिच्या मागं उभ्या राहिलो.

...... पुढे..

आणि, उजव्या रांगेच्या पहिल्या राजाच्या मंत्र्यानं उभं राहुन त्या राजाची ओळख करुन द्यायला सुरुवात केली. ते झाल्यावर काकांनी ताईला विचारलं, ' योग्य ?' तिनं उत्तर दिलं ' योग्य' . काकांनी हात उंचावुन तिची मान्यता सभेला कळवली, आणि निसंदन क्षेत्राचा तो राजा धनुष्यावर प्रत्यंचा चढवण्याकरिता उभा राहिला.
त्यानं ते धनुष्य उचललं, अगदी सहज पेललं आणि प्रत्यंचा उचलण्यासाठी तो खाली वाकला, पण त्यावेळी त्याचा तोल गेला अन तो खाली पडला, मला तर हसुच आलं, आणि मग लक्ष गेलं या गडबडीत देखिल ते धनुष्य खाली जमिनिवर पडलं नव्हतं तर त्या चौरंगावर एका टोकाला आलं होतं. तो राजा चिडुन निघुन गेला, अगदी सभा सोडुनच गेला. मग दुसरा राजा, मग तिसरा असं सुरु झालं. काहींना तर ते धनुष्य पेलता देखिल आलं नाही, तर बरेच जण त्या प्रत्यंचेच्या गोंधळात फसत होते, काही जणांना तिच्यामुळं मला झाली होती तशी जखम देखिल झाली होती. दोन प्रहर झाले, कुलगुरुंच्या संमतीनं एक प्रहराची विश्रांती घेण्याचं ठरलं. त्यानुसार स्वयंवराचा कार्यक्रम एक प्रहरासाठी स्थगित केल्याची घोषणा केली गेली. ज्या राजांना संधी मिळाली होती पण यश मिळालं नव्हतं, त्यापैकी बरेचसे सभास्थानाच्या बाहेर काही अंतरावर एकत्रित झाले असल्याचा निरोप दुताकडुन आल्यावर, बाबा आणि व्यासपिठाजवळ उभ्या असलेल्या सैनिकांचा एक गट त्या दिशेला गेला. जाताना ज्या पदधतीनं बाबांनी आपली तलवार सिद्ध केली होती ते पाहुन मला सकाळ्चे आईचे शब्द आठवले.
काही वेळानं बाबा आणि ते सैन्यदल परत आलं तेंव्हा कळालं की, फक्त बोलणी होउन होउ घातलेला तणाव टाळला गेला होता. तरी देखील बाबांची नजर बदललेली दिसत होतीच. आल्यावर त्यांनी लगेच काकांच्या कानात काही गोष्टी सांगितल्या, आता समोर फार कमी राजे होते, आणि ते सुद्धा वेगवेगळ्या जागी विखुरलेले होते. स्वयंवर पुन्हा सुरु होण्यास अजुन काही वेळ होता, आम्ही सा-या जणी एका बाजुला पडद्यांच्या आडोशात जलपान करुन परत येईतो पाहिलं तर समोरच्या सगळ्या मोकळ्या जाग्या नगरातल्या नागरिकांनी भरुन गेलेल्या होत्या, पुन्हा एकदा नजर फिरवल्यावर समजलं की समोर उभ्या असलेल्या नागरिकांच्या मागे आमचं सैन्यदल विखुरलेलं होतं. पुन्हा एकदा मनात भीती, उत्सुकता दाटली आणि आईच्या शब्दांनी पुन्हा एकदा धीर दिला. ताईचा हात हातात धरला, किंचीत ओलावा जाणवत होता तिच्या हाताला आणि कंप देखील. माझा दुसरा हात धाकट्या मांडवीच्या हातात होता, ती मात्र स्थिर होती, का असावं असं, तिच्या चेह-याकडं पाहुन देखील तिच्या नजरेतली शांतता मला सुखावुन गेली.
स्वयंवर पुन्हा सुरु झाल्यावर, पुन्हा आणखी काही राजांच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर एका उंच आणि बलदंड पुरुषानं सभास्थानी प्रवेश केला, सगळ्यांचं लक्ष त्यानं वेधुन घेतलं, सर्वांगावर घातलेल्या सुवर्णालंकारानी त्याच्या भोवतालचा काही भाग स्वप्रकाशित झाल्यासारखा दिसत होता, एखाद्या पुरुषाच्या अंगावर एवढं सोनं मी प्रथमच पाहात होते, आमच्या नाट्यशाळेतले नट देखिल एवढे दागिने घालत नसत. तो धनुष्याजवळच असलेल्या एका रिकाम्या आसनावर बसला, आणि मोठ्या अभिमानानं त्यानं त्याचं खड्ग दोन्ही पायांच्या मध्ये टेकवलं, त्याच्या मुठीवर उजवा हात ठेवुन डाव्या हातानं त्यानं त्याच्या मानेवरचे केस मागे फिरवले ते त्याच्या बलदंड बाहुंचं प्रदर्शन करण्यासाठीच. अजुन एक दोन राजांनी धनुष्याला प्रत्य्ंचा लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर त्याचा मंत्री उभा राहिला, त्यानं काकांना नमस्कार केला आणि सर्व सभेला उद्देह्शुन म्हणाला ' या सुदिनी सुमुहुर्तावर मी सुवर्णलंकाधिपती रावणाचा मंत्री या नात्यानं या स्वयंवरात त्यांच्या भाग घेण्याची इच्छा महाराज जनकांसमोर सादर करतो आहे, त्यांची अनुज्ञा द्यावी.'
काकांनी प्रथम जानकीकडं पाहिलं ती गोंधळलेली आहे, हे दिसतच होते, मी लगेच बंधनेनं दिलेल्या निलवस्त्रानं तिच्या मानेवरचा घाम पुसला, क्षणार्धात ते वस्त्र लाल झालं. मी दंडावरच्या बाहुबंदामध्ये दडवलेल्या कुपी काढण्यासाठी हात वर केला खरं पण तो हात तिथंच धरला गेला, मी चमकुन मागं पाहिलं, बाबा उभे होते. मी हात खाली केला अन तिच्या दुस-या बाजुला जाउन शांत उभी राहिले, जे होईल ते पाह्त. काही क्षण असेच तंणावात गेले, जानकीनं एकदा रावणाकडं अन एकदा काकांकडं पाहिलं, यावेळी मात्र तिचे डोळे चमकल्याचं जाणवलं मला, दोन क्षणांत काकांचा हात वर झाला. राजा रावण, उठला, खांद्यावरचं वस्त्र आसनावर ठेवुन त्यावर आपलं खड्ग ठेवलं, अन दोन पावलं टाकत त्या धनुष्यापर्यंत पोहोचला देखील. एका गुड्घ्यावर खाली बसत त्यानं त्याला नमस्कार केला, अन वर उठतानाच एका झट्क्यानंच ते धनुष्य उचललं, त्याबरोबरच, आतापर्यंत सा-यांनाच गोंधळात टाकणारी त्याची प्रत्यंचा देखील सर्र्कन हवेत फिरली. ती वर हवेतच झेलत त्यानं धनुष्याच्या एका टोकाला ती बांधली, दुसरं टोक धनुष्याच्या टोकावर बांधणार इतक्यात त्याच्या वरच्या टोकाच्या दोन करड्या रंगाच्या रत्नांपैकी एक निघुन त्याच्या डोळ्यावर पड्लं, रावणाचं लक्ष विचलित झालं अन ताणलेली प्रत्यंचा त्याच्या हातुन गळुन पडली, अन धनुष्य खाली जमिनीवर पड्लं.

निशब्द शांततेमध्ये जानकीनं सोडलेला निश्वास बाकी कुणाला नसेल पण मलातरी नक्कीच ऐकु आला. मी पुन्हा तिचा हात हातात घेतला, मगाशीचा कंप नाहीसा झालेला होता. यानंतर फारच कमी लोक उरले होते,

कथासमाजजीवनमान

प्रतिक्रिया

सगळं डोळ्यासमोर येतय. छान लिहिताय.

प्रचेतस's picture

26 May 2016 - 6:35 am | प्रचेतस

उत्तम लिहिलंय.
ड्रामाटायझेशन छान केलंय रामायणाचं. मात्र सीतास्वयंवरात रावण येतो हे ही घटना वाल्मिकीरामायणात नाही.

एस's picture

26 May 2016 - 12:05 pm | एस

उत्तम बांधताय कथा!

सुरेख वर्णन!आता श्रीरामाच्या प्रतिक्षेत...
पु भा ल टा.

सुंदर!! चित्रदर्शी झालंय लिखाण.

किसन शिंदे's picture

26 May 2016 - 8:36 pm | किसन शिंदे

अतिशय सुंदर लिहीलंय!!