मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
8 May 2016 - 6:57 pm

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073

.....

सकाळपासुनच सगळ्या नगरात प्रचंड गडबड सुरु होती, वाड्याच्या सगळ्या खिडक्यांना जाड गवतांच्या चटयांनी झाकलेलं असल्यानं आमच्या कानावर बारीक आवाजच येत होते, पण् तणाव जाणवत होता.

आई येउन माझ्यामागं उभी राहिली, ' आज क्षत्रियकन्या म्हणुन उभ्या आहात ठिक आहे, पण उद्या क्षत्रियपत्नी व्हाल तेंव्हा अशी नजर बावरी होउन चालणार नाही शंखनादानं, तुमच्या हातातल्या कंकणाच्या आवाजापेक्षा हा तलवारींचा खणखणाट मन सुखावुन गेला पाहिजे. वाड्यातल्या मैनेची शिळ गोड वाटु दे पण त्यापेक्षा धनुष्यावर होणा-या बाणाच्या घर्षणाचा नाद जास्त घुमला पाहिजे कानात.' मागे उभं राहुन आईनं माझं वक्षवस्त्र आवरुन दिलं, आज घातलेले मोत्याचे दागिन्यांचे स्पर्श नेहमीपेक्षा वेगळे होते, ते सावरता सावरता, वस्त्रांकडं थोडं दुर्लक्ष झालं होतं.
मी तिच्या पाया पडण्यासाठी मागं वळले, पण तिनं थांबवलं अन म्हणाली ' आज खरोखरी स्वर्गस्वामिनी दिसतेस, आज नकोस करु नमस्कार, फक्त एकच सांगणं आहे, बाकी तिघिंना सांभाळायची जबाबदारी तुझ्यावर आहे, कारण ती शक्ती तुझ्यातच आहे. काल जेंव्हा गोशाळेत गेला होता तेंव्हा ज्या सहजतेनं अनेक वासरांना खेळवत होतीस ते पाहिलंय मी, तसंच आज भावनांच्या वासरांना आवरायचं आहे. स्वयंवर म्हणजे जेवढी आलेल्यांची परीक्षा आहे तेवढीच ती तुमची देखिल आहे. तुम्हा तिघींसाठी एक पुर्वतयारी आहे असं समजा हवं तर. आणि अजुन एक विसरलेच सांगायचं, आता बंधना दासी एक विशेष वस्त्र घेउन येईल, काही काही क्षणांनी ताईच्या मानेवर येणारा घाम पुसत रहा, त्या वस्त्राचा निळा रंग तांबडा झाला समजायचं की तिचा स्वतावरचा ताबा सुटतो आहे आणि सावरायचं तिला.'

' आई, पण जायचंय कधी तिथे, त्याआधी मला ताईला पाहायचंय, नविन बनवलेल्या सुवर्ण वस्त्रांत ती कशी दिसते ते पहायचंय मला, जाउ तिच्याकडं मी.?' माझी उत्सुकता मी लपवु शकतच नव्हते, ' जा, बंधना येउन गेली की जा मग, पण तुला तिलाच पाहायचंच त्या वस्त्रांत की तु कशी दिसली असतीस ह्याची कल्पना करायची आहे. हं ?' आई माझ्या खोलीच्या बाहेर पडत होती, मला ओरडुन सांगायचं होतं तिला, की हो हो हो, मला तेच पाहायचंय, ती सुवर्णाची झळाळती वस्त्रं मला माझ्या अंगावर मिरवायची आहेत, पण आवाज आतच दाबला, समोर बंधना उभी होती, एक अतिशय तलम निळंशार वस्त्र होतं, त्याच्या किना-यावर बारीकशी मोत्याची नक्षी काढलेली होती, ते वस्त्र आणि एक चांदिची कुपि माझ्या हातात देत तिनं अतिशय हळुवार आवाजात सांगितलं, ' हयात बेशुद्धिची मात्रा आहे, प्रसंग पाहुन तुम्ही निर्णय घ्या, असा महाराजांचा निरोप आहे. '

मी आणि ती एकत्रच बाहेर पडलो, तिच्या दालनात येईपर्यंत अजुन काही मैत्रिणि बरोबर आल्या होत्या, माझ्या अंगावरची निळी वस्त्रं आणि मोत्यांचे दागिने यांचे कौतुक त्यांच्या नजरेत दिसत होतंच. तिच्या दालनात बाकी सगळेच जण होते, आणि विशेष म्हणजे, आमच्या वाड्यात असणा-या महिक्षा दलाच्या स्त्री सैनिक होत्या, त्यांनी आम्हांला चौघींना आमच्या वस्त्रांलंकारांना शोभेल आणि सहज लपवता येईल अशी शस्त्रं दिली, अगदी छोटीशीच पण कमालीची धारदार. एका खाली एक अशा सहा माळा असलेल्या माझ्या मोत्यांच्या कंबरपट्यात ते शस्त्र अगदी सहजी लपुन गेलं, जसं काही दोन्ही एकाच कलाकारानं बनवलेली आहेत. ताईच्या सुवर्णलंकारात मात्र ते स्पष्ट उठुन दिसत होतं, तसंही तिच्या नाजुकशा शरीरावर एवढे अलंकार अगदी शोभत नव्हते असं नाही, पण ती चालताना मात्र सगळ्यांनाच ते जाणवलं, मग थोडा वेळ तिचे अलंकार कमी करण्यात आणि सावरण्यात गेला. आता इथुन निघुन बाहेर कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्याचा निरोप आल्यावर आम्ही चौघी आई आणि काकुला नमस्कार करुन निघालो, वाड्याच्या व्हरांड्यातुन बाहेर पडताच ताईच्या अंगावर सुर्याचे किरण पडले आणि आम्हां मागच्यांना एकदम डोळे दिपल्यासारखं झालं, क्षणभर थांबलोच आम्ही सर्व, पण ती मात्र पुढं निघुन गेली होती.

स्वयंवराच्या ठिकाणी, एक खुप मोठं व्यासपीठ तयार केलेलं होतं, जवळपास एका गजाएवढी उंची होती त्याची, त्यावर काका आणि बाबांची आसनं होती मध्यभागी, आणि त्यांच्या उजव्या बाजुला काही ब्राम्हणांच्या बसण्याची व्यवस्था होई, व्यासपीठाच्या चहुबाजुला, आमच्या सैन्यातलं सर्वात उत्तम दल शस्त्रसज्ज उभं होतं. आम्ही व्यासपीठावर चढल्यावर समोरच्या गर्दीचा अंदाज आला, जवळपास शंभराहुन जास्त राजे जमा झालेले होते, आणि हे सगळे निमंत्रित होते, त्यामुळं त्यांना त्या मानानं बसण्याची व्यवस्था केलेली होती. तिथं खाली मधल्या मोकळ्या जागेत एका मोठ्या चौरंगावर ते धनुष्य ठेवलेलं होतं, त्याची प्रत्यंचा एका बाजुला गुंडाळलेली दिसत होती.

काकांनी उठुन सर्व उपस्थितांना अभिवादन करुन, या स्वयंवराची प्रस्तावना केली, आणि ताईचा जो पण होता, तो सांगितला ' हे भद्र पुरुषहो, आमची ज्येष्ठ कन्या जानकी, आपणांसर्वांसमक्ष ह्या अद्वितिय अशा धनुष्याला प्रत्यंचा ओढुन दाखवेल, तिची अशी इच्छा आहे की जो कोणि योग्य पुरुष हा पराक्रम पुन्हा करुन दाखवेल त्याचाच ती पतिरुपात स्विकार करेल. आपण सर्वांनी आपापल्या मंत्रीगणांना आपली ओळख करुन देण्यास सांगावे, आणि त्यानंतर जानकीची इच्छापुर्ती करण्याचा मानस असल्यास तिची मान्यता घेउन धनुष्यास प्रत्यंचा ओढावी. ' एवढं बोलुन काकांनी ताईला व्यासपीठावरुन खाली जाण्यास सांगितलं. आठ महिक्षा आणि त्यांच्या भोवती आठ सैनिक अशा संरक्षित पद्ध्तीनं ती खाली उतरली, त्या धनुष्याकडं जाउन, तिनं नमस्कार केला, आणि सहजच ते धनुष्य उचलुन पेललं, खालच्या टोकाला प्रत्यंचा बांधुन ते टोक डाव्या पायाच्या अंगठ्यात पकड्लं ,आणि डावा हात धनुष्याच्या मध्यात पकडला, मागं वळुन काकांकडं बघत मस्तक वाकवलं, आणि पुढच्याच क्षणी दोन्ही हातांच्या विजेसारख्या हालचाली झाल्या, आणि ते धनुष्य प्रत्यंचित झालं.

सगळी सभा आश्चर्यचकित होउन पाहात होती, तिनं पुन्हा एकदा काकांकडं पाहिल, आणि पुन्हा त्याच वेगानं ती प्रत्यंचा उतरवली, अन धनुष्य पुन्हा त्या चौरंगावर ठेवलं,त्याला नमस्कार करुन ती पुन्हा त्या संरक्षक कड्यातुन व्यासपिठावर परत आली. मी तिचे दोन्ही हात हातात घेतलं, तिच्या नाडीचे ठोके अतिशय जलद झालेले मला जाणवलं, तिला तिच्या आसनावर बसवुन आम्ही तिच्या मागं उभ्या राहिलो.

कथासमाजजीवनमान

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

8 May 2016 - 7:18 pm | अभ्या..

आह्ह,
अप्रतिम.

सतिश गावडे's picture

8 May 2016 - 7:22 pm | सतिश गावडे

पुनरागमनाच्या शुभेच्छा !!!

त्या हेम्याचं काय झालं हो पुढे. आता विंडोज १० आली आहे. ;)

जेपी's picture

8 May 2016 - 7:39 pm | जेपी

आ वडल...
पुर्वी एका ब्लॉगवर मागचे भाग वाचले होते..
मिपावरही आहेत हे ठौक नव्हत..

पिंगू's picture

8 May 2016 - 9:45 pm | पिंगू

पन्नासराव, तब्बल दोन वर्षांनंतर हा भाग आलाय आणि अतिशय उत्तम झाला आहे.. लवकरच पुढील भाग पण येऊ द्या..

लवकरच पुढील भाग पण येऊ द्या..

पुढील भाग दोन वर्षांनी येऊ नये अशी आशा मी येथे व्यक्त करतो.

बोका-ए-आझम's picture

8 May 2016 - 10:01 pm | बोका-ए-आझम

या मालिकेच्या आधीच्या भागांबद्दल माहित नव्हतं. पन्नासरावांच्या हेम्या चा तर मी मोठा कूलर, एसी वगैरे आहे. पण हीसुद्धा मालिका उत्तमच आहे. पुनरागमनाबद्दल धन्यवाद!

नाखु's picture

9 May 2016 - 9:46 am | नाखु

लेखमाला अर्ध्वट न ल्टकवता पुढचा भाग टाकल्याबद्दल विशेष धन्य्वाद.

वाचक वचन पुर्तीवाल्यांचा पंखा

प्रीत-मोहर's picture

9 May 2016 - 9:28 pm | प्रीत-मोहर

वाह. वेल्कम ब्याक. आता गॅप न टाकता पुढले भाग टाका

आनन्दा's picture

9 May 2016 - 10:38 pm | आनन्दा

हेच्च म्हणतो.

सूड's picture

9 May 2016 - 11:19 pm | सूड

क्रमश: दिसत नाहीये.

रेवती's picture

9 May 2016 - 11:25 pm | रेवती

हा भाग लगेच वाचला. नेहमीप्रमाणेच छान.

हेमंत लाटकर's picture

10 May 2016 - 7:33 am | हेमंत लाटकर

फारच छान। तिसर्या भागापासून समजले हे लेखन सीता स्वयंवराविषयी आहे.

प्लीज ही कथा पूर्ण करा . बऱ्याच काळात रामायणावर इतकं दर्जेदार नवीन काहीच वाचायला मिळालेलं नाही . अजिबात काल्पनिक वाटत नाहीये . कथा उर्मिलेच्या दृष्टीकोनातून असावी असं वाटतं . यू आर अ रिअली ग्रेट रायटर .

मृत्युन्जय's picture

10 May 2016 - 11:30 am | मृत्युन्जय

अर्रे तुम्ही पुनरागमन करताय हे माहिती नव्हते.

वपाडाव's picture

10 May 2016 - 2:00 pm | वपाडाव

---

५० फक्त's picture

26 May 2016 - 1:30 am | ५० फक्त

http://misalpav.com/node/36166

भाग -०६ प्रकाशित केला आहे,,,

धन्यवाद