कविता माझी
अतृप्त ओळी
आत्मसमरूप दिसतात ओळी
आत्मस्वरूप असतात ओळी .
इथे नदीचा दिसतो काठ
तिथे संथ प्रवाह पार लावतात ओळी .
निराळ्या वेदनेच्या एकाच गावी
दिसता दिसतो आम्ही सहप्रवासी
कुठे दूर अंधारात हरवले गाव माझे
दिसे मी उगाचच तिथला निवासी
असे शब्द साधे येतात साथी
कविता त्यातुन वाहते प्रपाती .
उरी अंतरी घाव नाजूक खोल
वरी दिसते केवळ शांत ज्योती !
आम्ही नाही ऐसे कवी ज्यास म्हणती
जशी वेदना ती , तसे शब्द हाती.
मनाचेच सारे इथे मांडयाचे ..
न पूर्ती मिळे त्यातूनी .. काय त्याचे?
ओल्या खुणा
हळव्या झाल्या काळजातल्या ओल्या खुणा
हृदयातला रेशमी घाव दाखवू कुणा
फुले शोधता लागला जिव्हारी काटा
डोळ्यातल्या दर्यात उसळती अश्रूंच्या लाटा
नभाच्या वेशीवर उदास रंग उतरे
उरी लागलेला बाण घेऊन रावा फिरे
हरवून दूर गेली ओळखीची वाट
मोरपीशी स्वप्नांचा कोसळू लागे तट
मावळतीच्या वणव्यात सूर्यबिंब जळून गेले
प्राणाच्या शेजेवर निखारे उधळून गेले
उष्णकटिबंधीय वसंत
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना
माहितीची पाटी नसलेले झाड पाहून
साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले
हे झाड कोणते?
त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला
उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल!
(राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले)
वनस्पती वैज्ञानिक मित्राने
राजूची वसंत ऋतूवरील कविता
ऐकुन झाल्यावर
मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे
वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले
रोज किती पाणी प्यावे?
रोज किती पाणी प्यावे?
शरीराची गरज असेल एवढे
आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य
डॉक्टर सुचवतील तेवढे
रोज किती पाणी प्यावे?
अन्न पिकविण्यासाठी
शेतीसाठी
शिल्लक राहील एवढे
रोज किती पाणी प्यावे?
शेती आणि शरीरांची गरज
यांचे गणित नाही जुळली तर
इतर अपव्यय टाळून
लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व
ईतर चार जणांना पटवून
शरीराची गरज भागेल तेवढे
आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळें साहित्य संमेलन
आङळे वाङळेंना म्हणाली
मराठी साहित्य संमेलनाला
नाही गेलात कसे ते?
वाङळें आङळेंना म्हणाला
तुमच्या आङळीकेचे साहित्याने
अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला
जागा आता उरलीच कुठे ?
वाऱ्यावर जसे पान
नीज भरते दिशांत
माझे रिते नीजपात्र
उतरूनि ये अंगणी
जरी हळुवार रात्र
रात्र रात्र जागते
गोड स्वप्नातूनि
धुंद गात राहते
अबोल मौनातूनि
येती कानी दुरून
सूर सारंगीचे छान
मन खाई हेलकावे
वाऱ्यावर जसे पान
पान पान जागते
पाचूच्या बनातूनि
शुभ्र सोनसकाळी
झळाळते दवातूनि
- संदीप चांदणे
व्हॅलेंटाईन दिनी
कोणे एके काळी
व्हॅलेंटाईन दिनी
मोठ्या उत्सुकतेने
मी आणली होती साडी
होती जरी साधी
ती खुश मात्र झाली
प्रयत्न केला खूप तिने
पण नीट नेसता नाही आली
गोंधळली क्षणभर हसली
ती म्हणे हे ध्यान माझ्या भाळी
पण गोड आठवण प्रेमाची
तिने अजूनही जपून ठेवली
आता एवढ्या वर्षांनी
सुचतील कशा प्रेम ओळी
पण मला पाहायची असते
तिच्या गालावरील सुंदर खळी
त्यासाठी कविता विनोदी
ऐकून म्हणे अजून नाही जमली
मला वाटलं कविता
तिला म्हणायचं होतं साडी
(सौं साठी!)
कळते जगत जाताना
युगायुगांचे असते एकटेपण
लाखोंच्या सोबतीने जगताना
खोल खोल भासते आयुष्य
रितेपन भरून काढताना
अनामिक नात्याची वीण
दिसते कधी घट्ट बसताना
नकळत मग तुटते काही
तिथे मनापासून गुंफताना
डोळ्यादेखत ढळते, ज्यात
वेचले आयुष्य रचताना
हे असे घडू नये वाटते
नेमके तेच घडत असताना
पतंग विसरतो दाहकता
पिंगा घालून जळताना
आयुष्यही असते असेच
कळते जगत जाताना
- संदीप चांदणे
शीर्षक सुचले नाही
झोप येईनाच आज
झोप हवी असताना
जांभयाच्या येती लाटा
वर तारे मोजताना
काय आणून वहावे
निद्रादेवीच्या चरणी
झोप येऊन निवांत
उद्या उजाडेल झणी
किती थकून भागून
देह दिला पसरून
डोळ्यात बाहुल्यांना
काय दिसते अजून?
दिसे कालचा प्रकाश
अन्, तम भेसूर उद्याचे
त्यांच्या मध्ये भांबावले
पाऊल हळव्या झोपेचे
एक मायेचा, माथ्याला
हवा सांगणारा हात
सोड उद्यावर, नीज
खूप झाली आहे रात
- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, २१/१२/२१)