आज जरी
चंद्रधगीने रातराणी
उत्फुल्लपणे-
परिमळेल तेव्हा
व्याधविद्ध मृगशीर्ष जरासे
मावळतीवर-
ढळेल तेव्हा
केतकीत नागीण निळी
टाकून कात-
सळसळेल तेव्हा
नि:शब्दांची धून खोलवर
रुजून ओठी-
रुळेल तेव्हा
वास्तवतळिचे अस्फुट अद्भुत
कणाकणाने-
कळेल तेव्हा...
....वीज शिरी
कोसळली तरीही,
सावरेन मी
अद्भुत अवघे विरून, वास्तव
क्षणोक्षणी मग-
छळेल तेव्हा...
....आज जरी
निष्पर्ण तरी
बहरेन उद्या मी