आवाज
डॉक्टर रावांची अपॉइंटमेंट संध्याकाळी सहाची होती. पण वाटेत ट्रॅफिक जॅम असण्याची दाट शक्यता असल्याने, अर्धा तास लवकरच निघालो. डॉ. राव, कान, नाक, घशाचे तज्ञ होतेच, पण त्यांनी बहिर्या लोकांसाठी एक औषध तयार केले होते. त्यामुळे कदाचित, त्यांना नोबेल देखील मिळण्याची शक्यता होती. त्यांच्या औषधाने बहिर्या लोकांच्या श्रवणक्षमतेत लक्षणीय सुधारणा होत असल्याचे रिपोर्ट होते. अशा लोकांची, महागड्या श्रवणयंत्रापासून मुक्तता झाली होती. अनेक लोकांना चांगला अनुभव आल्याने, त्यांची भेट घेणं, म्हणजे मोठे दिव्य होते. दोन महिन्याच्या प्रतीक्षायादीला सामोरे जावे लागे.