स्वीच on / स्वीच off हे असे शब्द मानसिक संतुलनाबाबत असंख्य वेळा ऐकायला मिळतात. मला तर अनेक सामन्यांतून हेच जाणवतं , शिकायला मिळतं. फक्त अनुभवी खेळाडूच नव्हे, तर नव-नवे खेळाडू देखील हल्ली त्यांचा खेळ अचानक पणे बदलून परिस्थितीनुसार बदलताना दिसतात. मग तो फक्त एकच फलंदाज (उमेश यादव) शिल्लक राहिला असताना अचानक t २० पद्धतीत सामना फिरविणारा हार्दिक पंड्या असो, किंवा युगंधर महेंद्र सिंह धोनी असो.
क्रिकेट खेळाचं वैशिष्ट्यच मुळी त्याचं लवकर न संपणे हे आहे. बघा ना, सर्वात लवकर संपणारा सामना देखील (टी २०) ४ तास चालतो. ह्याउलट इतर खेळ ४५ मिनिटे- १.५ तास , दोन तास असे चालतात. सांघिक बरं का. त्यामुळे ह्या सामन्यात खेळाडूंची मानसिक ताकद प्रचंड लागते. हल्ली खेळाडू ह्या बाबतीत कसलेले दिसतात.
रविवारच्या लंका-भारत सामन्यात लंकेला बुमारह च्या अप्रतीम गोलंदाजीमुळे ( ३ सामन्यात त्याने ११ बळी घेतलेत) फक्त २१७ च धावा करता आल्या. एखाद्याने दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र पाहिलं असेल, तर अंतिम निकाल बघून ( ४-२१८ भारत विजयी) “भारताने आरामात सामना खिशात टाकला” अशी प्रतिक्रिया झाल्यास नवल नाही. पण विश्वास ठेवा, ते तितकं काही सरळ-सोप्पं नाही झालं.
कोहली-जाधव-राहुल नी माती खाल्ली
कोहली अत्यंत चुकीच्या फटक्यावर बाद झाला, धवन कडून किती वेळा किती धावांची अपेक्षा ठेवायची ? पण के.एल.राहुल आणि केदार जाधव ह्यांना पुन्हा एकदा अकिला धनंजयाने लागोपाठच्या षटकांत बाद करून सामन्याची सूत्र श्रीलंकेकडे आणली. ह्यावेळी गेल्या सामन्यासारख्या ६ वगैरे विकेट नव्हत्या गेल्या , पण धावा मात्र कमीच होत्या. फक्त ६१. चार बाद ६१. आणि ह्याही वेळी सव्वा पाच फुटी धनंजया राक्षसा समान भासत होता. नाही म्हणायला रोहित शर्मा सेट झालेला होता, पण त्याचा काहीच भरवसा देता येत नाही. ( एक दोन वेळा त्याला बाद करायची संधी श्रीलंकेने घालवली) त्याला मिळालेली जीवदाने वगळता त्याने खेळ चांगलाच केला. शतकही झळकावले.
परंतु समोर “फ्रीज” होता !
४ गडी धक्कादायक रीतीने बाद झाल्यावर मात्र धोनी आला. “नेहमीच काय हा टिकेल ?” हा मनात उठणारा कुत्सित सवाल त्याने धुळीस मिळविला. आगळ्या वेगळ्या स्पिन गोलंदाजाचा सामना कसा करायचा , हे त्याच तंत्र बघण्यासारखं होतं. गोलंदाजाच्या आधीच तो तयार असायचा. आणि वेळ प्रसंगी चेंडू सीमापारही धाडायचा. एक-दोन धावा चोरत राहणे हा तर त्याचा हातखंडा.पहिली धाव कशी घ्यावी हे केवळ धोनी कडूनच शिकावं. हळू हळू स्थिरावत, पुन्हा एकदा नांगर टाकत (किती काळ पुरणार आपल्याला हा) रोहित ला फटकेबाजीला पूर्ण अवसर देत धोनीने गेलेला सामना पुन्हा एकदा हातात आणला, आणी ....
श्रीलंकेचे प्रेक्षक चिडले !
प्रेक्षकांना हे सहनच झाले नाही. कारणही तसेच होते. एवढी चांगली संधी निर्माण होवूनही, ( “अकिला अकेला” धनंजय क्या करेगा ?) सामना हातातून चालला होता. ह्या सामन्याला प्रेक्षकांची उपस्थिती चांगली होती, ते खेळाडूंना प्रेरीतही करत होते आधीपासून. ते संतापले आणि बाटल्या फेकाफेक करू लागले. हे काही आपल्याला नवे नाही. आपल्याकडे असं चिडून बाटल्या फेकाफेक हे काही काळापुर्वीपर्यंत अगदी नित्याचं होतं. असो. आवाहन करूनही स्थिती आटोक्यात येईचना.
शेवटी धोनी चक्क झोपला !
आधी थोडा वेळ दोघांनीही स्ट्रेचिंग वगैरे केलं ; पण नंतर धोनी चक्क झोपला, म्हणजे दिसलं तसच. मला नक्की खात्री आहे कि त्याने मकरासन वगैरे करून तेवढ्या वेळात विश्रांती घेतली असणार ! तिथे समालोचकांच्या कक्षात याच्यावर एकच चर्चा ... गावस्कर तर चक्क त्याला “फ्रीज” म्हणाला.
स्वीच on स्वीच ऑफ चं इतकं उत्तम उदाहरण तुम्ही पाहिलयेत का ?
अर्थात थोड्याच वेळात प्रेक्षक शमले , आणि भारताने उरले सुरले सोपस्कार संपवून सामना खिशात घातला. पण धोनीची “योग निद्रा” दीर्घ काल स्मरणात राहणार हे नक्की!
प्रतिक्रिया
29 Aug 2017 - 9:17 pm | स्पा
बर मग?
29 Aug 2017 - 9:24 pm | पैसा
मॅच पाहिली नाही. हल्ली काय काय फिक्स असेल देवजाणे असे वाटते. त्यामुळे महिला क्रिकेट सोडून इतर क्रिकेट बघत नाही. तुमचा लेख मात्र आवडला.
30 Aug 2017 - 7:43 am | १००मित्र
ठीकच की. धन्यवाद.
30 Aug 2017 - 3:56 pm | जेम्स वांड
ऑ? महिला क्रिकेट फिक्स होऊ शकत नाही?
30 Aug 2017 - 4:33 pm | पैसा
पण सध्यातरी पैसे, लोकप्रियता नसल्याने महिला क्रिकेटमधे फिक्सिंग होत नसावे अशी आशा आहे.
31 Aug 2017 - 7:03 am | जेम्स वांड
पैसा, लोकप्रियता हे भारतात नाहीये, महिला क्रिकेटला, बाहेर बऱ्यापैकी 'पॅरीटी' आहे, कॉन्ट्रॅक्ट, वगैरे ठरवून असतात, अन एकंदरीत जर पैसा कमी आहे म्हणले तर उलटं फिक्सिन्गचा चान्स वाढणार.
30 Aug 2017 - 1:58 am | जुइ
हल्ली मॅच पाहिली जात नाही. मात्र ही बातमी वाचनात आली होती. तुम्ही चांगले लिहिले आहे.
31 Aug 2017 - 7:28 am | १००मित्र
कोणताही खेळ जेव्हां अतिशय मोठ्या प्रमाणावर खेळला जाऊ लागतो , तेव्हा त्यातून व्यावसायिक लाभ उठवू पाहणारे घटक येतातच. सध्याच्या काळात तरी. मग त्यात इष्ट-अनिष्ट प्रकार आलेच.
हे प्रकार कानावर येवू लागले, की त्यातून मन उडून जातं हेही स्वाभाविक. तरीही एक गोष्ट निश्चित, की अगदी फिक्सिंग मधूनही जरी पैसे मिळवायचे असतील , तरीही उत्तम खेळ करावाच लागतो, स्वत:ला उत्तम , फिट , तरबेज वगैरे ठेवावाच लागतं.
एकंदरीतच जीव तोडून होणारे क्षेत्ररक्षण, घणाघाती फलंदाजी, टिच्चून गोलंदाजी, किंवा दिवस दिवस यष्टीरक्षण करून पुन्हा तितक्याच तडफेने फलंदाजी करणारे सध्याचे खेळाडू विविध स्पर्धांत पाहत राहणं, त्यांच्या व्यूह रचनेबद्दल सामन्यानंतर किंवा दरम्यान होणाऱ्या तज्ज्ञांच्या चर्चा ऐकणं हा एक नक्कीच आनंदाचा भाग आहे.
30 Aug 2017 - 11:52 am | चांदणे संदीप
लेख आवडला!
Sandy
31 Aug 2017 - 7:29 am | १००मित्र
धन्यवाद संदीप !
30 Aug 2017 - 12:23 pm | संजय पाटिल
हे ही परीक्षण उत्तम!!
31 Aug 2017 - 7:31 am | १००मित्र
मागच्याच प्रमाणे ह्याही वेळी आवर्जून लेख वाचल्याबद्दल धन्यवाद संजय !
30 Aug 2017 - 3:57 pm | जेम्स वांड
स्मॉल टाऊन बॉईजचा आदर्श असावा असा हा माणूस जबराटच आहे..
31 Aug 2017 - 7:36 am | १००मित्र
त्याच्या मानसिक क्षमता अफलातून आहेत, त्यामुळे तो त्याच्या शारीरिक फिटनेसकडे सतत सतर्कतेने लक्ष देवून काम करतो. तसच वाद-विवादांमध्ये न पडणे व “संघ प्रथम” ह्या गोष्टी त्याच्याकडून प्रचंड घेण्यासारख्या आहेत. वर्षानुवर्षे हे तो करतोय !