वायूमंडल
ज्या पृथ्वीवर आपण राहतो, त्या पृथ्वीवरच्या भूपृष्ठाचा एक तृतियांश भाग पाण्याने अनावृत्त असला तरी दोन तृतियांश भागावर पाण्याचे विशाल साठे विपुलतेने विखुरलेले आहेत. महासागर आहेत ते. अनावृत्त भागही वस्तुतः वायूंच्या सुमारे दहा किलोमीटर उंचीच्या थराने आवृत्तच आहे. ह्या वायूंचे वजन, म्हणजेच वातावरणीय हवेचा दाब. जो ७६ सेंटीमीटर उंचीच्या पार्याच्या स्तंभाच्या दाबाइतका किंवा सुमारे १० मीटर पाण्याच्या स्तंभाच्या दाबाइतका दाब असतो. खरे सांगायचे तर पाण्याने आवृत्त असो वा अनावृत्त, भूपृष्ठाच्या सर्वच भागांवर हवेचा हा महासागर विहरत असतो.