----------------------
नमस्कार मंडळी.
यावेळी तुमच्यासाठी एक चॅलेंज टाकलं आहे.
तिसरी कथा शतशब्दकथा आहे…पण ती आहे अपूर्ण. तुम्हाला येईल का ती पुर्ण करता…
-----------------------------------------------
१. स्मशानचोर
दिग्या अन जग्या मुडदे चोरायचे… स्मशानात पुरलेले. संशयाला जागाच सुटणार नाही असं परफेक्ट त्यांचं काम. म्हणून गुप्तपणे संशोधन करणाऱ्या संस्था/शास्त्रज्ञ, आणि काही मेडिकल कॉलेजेस त्यांनाच काम द्यायच्या. या डेड बॉडीजचं पुढे काय होतं याच्याशी त्यांना काही देणंघेणं नव्हतं. त्यांच्या मतलब होता पैशांशी.
आजची सुपारी मोठी होती. दोघांनी अख्खी रात्र घाम गाळून सहा मुडदे उकरून काढले. त्यांना मटकावून गाडी जंगलाच्या दिशेने सुसाटत निघाली.
जग्याने खिशात हात घातला, रिव्हॉल्व्हरच्या थंडगार नळीचा स्पर्श सुखावणारा होता. आज रग्गड पैसा मिळणार होता; पण या पैशात त्याला भागीदारी पाहिजे नव्हती. दिग्या त्याचा चांगला मित्र होता पण पैशापुढे कोणी बाप नसतो का दादा. एवढ्या पैशात त्याला दुबईला जाऊन सेटल होता आलं असतं. दिग्याला टपकवायचं त्याने पक्कं केलं.
त्या विशिष्ट ठिकाणी ते पोहोचले तेव्हा टकलू आधीच पोहोचला होता. त्याने आपल्या लांबलचक कारच्या नंबरप्लेट झाकलेल्या होत्या.
“वेल डन बॉइज. तुम्ही आहात म्हणून आमचे प्रयोग बिनबोभाट सुरू आहेत.” टकलू खुशीत बोलला.
“अपनेको सिर्फ पैसों से मतलब.”
“मिळतील मिळतील. आधी त्या सात डेडबॉड्या तर माझ्या गाडीत टाका.”
“सात ?!! दिग्या, तू तर बोलला होता की सहाच बॉड्या पाह्यजे.”
“सातच आहेत भावा”
त्याने रिव्हॉल्व्हर बाहेर काढली, ट्रिगर दबला.
---------------------------------------------
२. परग्रहावरची मजा
आपण जिवंत आहोत यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. नुसता जिवंतच नाही तर चांगला ठणठणीत होता तो. डोळे उघडून त्याने आजूबाजूला पाहिलं... पोपटी झाडांचं जंगल, निळसर माती अन आकाशात मंद तेजाने चमकणारे दोन तांबूस सूर्य. त्याच्या लक्षात आलं की आपण पृथ्वीवर नाही.
पुष्पक कंपनीने लकी ड्रॉ काढला अन अवकाशयात्रेसाठी त्याची निवड झाली, तो प्रचंड खुश झाला होता तेव्हा. सोबतचे पाच प्रवासी पैसे भरून आले होते. सगळं सुरळीत सुरू असतांना अचानक अपघात झाला अन तो या अनोळखी ठिकाणी येऊन पडला. त्याने सहप्रवाशांना बराचवेळ आवाज दिला पण कुणीच सापडलं नाही.
पाठीमागून कसलातरी आवाज आला. त्याने वळून पाहिलं…अन तो पाहतंच राहिला. दहाबारा सुंदर एलीयन तरूणी फरच्या बिकिनी घालून उभ्या होत्या. जवळपास माणसांसारख्याच दिसणाऱ्या ह्या अप्सराच जणू. सगळ्यांनी महत्वाचे भाग झाकतील इतपतच कपडे घातले होते ! त्याला वाळवंटात मृगजळ दिसावं त्याहून जास्त आनंद झाला.
“हाय, मी सखाराम” तो पाच बोटं नाचवत म्हणाला.
पण त्या तरूणी शांत होत्या. सगळ्यांची नजर त्याच्यावरच खिळलेली होती.
‘यांना आपली भाषा काय घंटा समजणार’ त्याने मनाशी विचार केला अन चुप बसला. सगळ्यात पुढे असलेली तरूणी त्याच्या जवळ आली. तिच्या शरीराचा अनामिक, धुंद करणारा सुगंध त्याला जाणवला. तिने त्याला खालपासून वरपर्यंत न्याहाळलं.
“पृथ्वीवरचा दिसतोस.” तिने चक्क पुणेरी मराठीत विचारलं.
आयला ही काय भानगड आहे !
“तुम्हाला…मराठी…”
“आमच्याकडे भाषा रुपांतरण यंत्र आहेत. विश्वातली कोणतीही भाषा आम्ही ऐकू शकतो आणि समजू शकतो.”
“वॉव ग्रेट.”
“तू पुरुष आहेस ??” तिचा पुढचा प्रश्न.
“तुला दिसत नाही ??” तो रागाने बोलला. पौरूषत्व हनन करणारी कुठलीही गोष्ट तो सहन करू शकत नव्हता.
“दिसतंय, पण तू एलीयन आहेस म्हणून कन्फर्म केलं. काही वर्षांपूर्वी अवाढव्य कासवांसोबत झालेल्या युद्धात आमचे सगळे माणसं ठार झाले. म्हणून आम्हाला पुरूषाची गरज होती. ती आज पूर्ण झाली.”
स्वतःला अजिबात चिमटा घ्यायचा नाही हे त्याने ठरवून टाकलं, यदाकदाचीत हे स्वप्न असेल तर मोडू नये म्हणून.
“तू तयार आहेस का आमचा वंश वाढवायला ?”
“हो हो तयार आहे, मदत करायला मराठी माणूस एका पायावर तयार असतो.” तो खास ठेवणीतलं हास्य चेहऱ्यावर पसरून म्हणाला. एवढा आनंद त्याला आयुष्यात कधी झाला नव्हता. या ग्रहावरचा तो राजा होता अन बाकीच्या सगळ्या राण्या !!
“केव्हा करायची मग सुरुवात ?” त्याने दोन्ही हातांचे तळवे चोळत विचारलं
“तुझी इच्छा असेल तर लगेच.” त्याच्या डाव्या हाताला उभी असलेली सडपातळ तरूणी म्हणाली.
तो फक्त नाचायचंच बाकी उरला.
“पण अनुभव आहे का तुला ? तुला एकट्याला इतकेजण हँडल करता येतील ?
“त्याची तुम्ही चिंताच करू नका. या विषयात मी बाप आहे म्हटलं. सखाराम हे नाव जरी उच्चारलं तरी अख्खी बुधवारपेठ हादरून जाते. फक्त दोन दिवसांच्या अवकाशप्रवासात सोबतच्या दोन आन्ट्या पटवल्या भाऊनं.”
“गुड. मला सांगा तुम्ही इथे कशी सुरुवात करणार आहे ?”
“अम्म… सध्या एक तरूणी द्या माझ्यासोबत. प्रॅक्टीस झाली की एकावेळी दोन तीन, जेवढं पचेल, रूचेल तेवढं हँडल करू.”
“जशी तुझी मर्जी.”
तिने मागे वळून एका तरूणीकडे पाहिलं. इशारा ओळखून एक ती पुढे आली. ग्रुपमधली सगळ्यात सुंदर तरूणी होती ती.
“याला घेऊन गुहेत जा.“
आनंदाचा आवंढा गपकन त्याच्या घशात अडकला.
“चालेल ना ?”
“चालेल नाही धावेल, उडेल.” तो आनंदाने चित्कारला.
थोड्याच वेळात ते दोघे एका गुहेत आले. अंधुक उजेड होता पण आवश्यक ते दिसायला तेवढा पुरेसा होता.
“पोहोचलो आपण.” तिने माहिती दिली.
त्याने एका झटक्यात टी शर्ट अन बनियेन काढून फेकला. तिच्या अंगावर झेप घेणार तेवढ्यात तिने त्याला थांबवलं.
“एक सांगायचं राहीलंच, आमची स्त्रीप्रधान संस्कृती आहे. तुमच्या पृथ्वीवर आहे त्याच्या उलट.”
“नो प्रॉब्लम. तू पुढाकार घे.”
तिने समोरच्या भिंतीवरचं बटन दाबलं, भिंत दरवाजासारखी बाजूला सरकली. समोरच्या दालनात होती लहानमोठी शेकडो एलीयन मुलं.
“आम्ही शिकारीला गेलो की यांना तू सांभाळायचं आहेस. आमचा वंश वाढवणं तुझ्या हातात…..
.
.
.
अरे तू चिमटे का घेतोयस स्वतःला ??”
------------------------------------------------------
३.
अख्खा वाडा बाया, माणसं अन पोरांनी फुलला होता. विस्फारलेल्या डोळ्यांच्या शेकडो जोड्या टकामका बघत होत्या. कुणी म्हणालं ही जादू आहे तर कुणाला स्वप्न वाटत होतं. काही विद्वानांनी चारिबाजूंनी फिरुन पाहिलं, आबांनी काठी आपटंत कोणी लपलंय का ते शोधलं, लहानसहानांनी आनंदाने टाळ्या पिटल्या. त्यांच्या आया मात्र घाबरलेल्या होत्या. जवळ जाऊ नये म्हणून पोरांना त्यांनी मागे खेचलं.
ही बातमी पंचक्रोशीत वणव्यासारखी पसरली. बघ्यांची रांग लागली, तांत्रिकमांत्रिक डोकावून गेले. काहीजण लांबच राहिले. गर्दी पाहून विक्रेत्यांनी धाव घेतली. अखेर बराच नावलौकीक असलेल्या पुजाऱ्यांना बोलावण्यात आलं, विधिवत पुजा होऊन ब्राह्मणजेवणाच्या पंगती उठल्या .............
--------------------------
हे आहेत ८७ शब्द, अजून फक्त १३ शब्द हवेत. कुणाला काय शेवट सूचतो वाचायला उत्सुक. (अर्थात हे ऑप्शनल आहे. शेवट नाही सांगितला तरी पहिल्या दोन कथा कशा वाटल्या याबद्दल मात्र जरूर सांगा)
(माझ्या डोक्यातले १३ शब्द मी जव्हेरगंज यांना व्यनि द्वारे पाठवले आहेत. आज (रविवारी) संध्याकाळी ७ वाजता ते इथे टाकेन.)
प्रतिक्रिया
16 Apr 2017 - 1:00 am | अॅस्ट्रोनाट विनय
काल (शनिवारी) संध्याकाळीच पोस्ट करणार होतो पण site वर technical error असल्यामुळे थोडा उशीर झाला
16 Apr 2017 - 10:12 am | जव्हेरगंज
=))
मजा आली दोन्हीपण कथा वाचताना!
तिसऱ्या कथेचा व्यनी वाचला.
पटण्यासारखा आहे! मस्त!!!
येऊंद्या अजून...!
16 Apr 2017 - 1:13 pm | चिनार
पहिली कथा मस्त!
16 Apr 2017 - 1:13 pm | चिनार
पहिली कथा मस्त!
16 Apr 2017 - 1:59 pm | अॅस्ट्रोनाट विनय
धन्यवाद जव्हेरगंज & चिनार
16 Apr 2017 - 3:42 pm | प्राची अश्विनी
आणि सर्वानुमते बाळक्रुष्णाची ती हातपाय हलवणारी दगडी मूर्ति नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
16 Apr 2017 - 4:04 pm | जव्हेरगंज
कडक!
हा अँगल तर लय भारी!!!
16 Apr 2017 - 5:00 pm | संजय पाटिल
मस्तच वटतोय क्लायमॅक्स...
16 Apr 2017 - 4:42 pm | अॅस्ट्रोनाट विनय
जबरा. असंही होऊ शकतं
16 Apr 2017 - 7:37 pm | अॅस्ट्रोनाट विनय
माझ्या डोक्यात काय होतं ते सांगतो :
तर अशी होती तालुक्यातल्या पहिल्या टीव्हीचीमजा.मी लहान होते तेव्हा... आजी म्हणाली
16 Apr 2017 - 8:02 pm | चिनार
आयला जबराट!
16 Apr 2017 - 8:12 pm | Ranapratap
3 हि कथा आवडल्या, 3 ऱ्या चा शेवट धक्कादायक, मजा आली.
16 Apr 2017 - 9:52 pm | पिलीयन रायडर
कथा छान.. तिसर्या कथेत टिव्हीचे वर्णन आहे हे लगेच कळाले त्यामुळे पंच कमी होतोय..
18 Apr 2017 - 2:49 pm | प्राची अश्विनी
तिन्ही कथुकल्या आवडल्या.
19 Apr 2017 - 10:25 am | अॅस्ट्रोनाट विनय
सर्वांचे आभार _/\_