कथुकल्या २

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
8 Apr 2017 - 2:57 pm

१. आवाहन…

दिशाचे आईवडील पार्टीला गेले अन तिने लगेचच पुजाला घरी बोलावलं. पुजा सगळी तयारी करून आली होती. आल्याआल्या तिने दरवाजा खिडक्या बंद केल्या, खिडक्यांवरचे पडदे ओढून घेतले. नंतर टेबलावर बॅग ठेवून त्यातलं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. सगळ्यात आधी काचेचा चकचकीत गोळा बाहेर आला. खोलीतल्या अंधारातही तो मंदगूढ उजेड फेकत होता.

“काय आहे हे?”

“याच्या मदतीने आपण भूतांना बोलावू शकतो.”

“काहीपण काय फेकतेस गं.”

“अगं खरंच. बाबांच्या जॉबमुळे आम्ही आफ्रिकेत होतो न तिथे मी तंत्रमंत्र शिकले होते. बघ तर खरं, मजा येईल.”

पुजाने वेगवेगळ्या रंगाच्या मेणबत्त्या बाहेर काढल्या. पांढऱ्या रंगाची कसलीतरी भुकटी बाहेर काढून भराभर वेगवेगळे आकार रेखाटायला सुरुवात केली. नंतर त्या आकृत्यांमध्ये तिने वेगवेगळ्या ठिकाणी मेणबत्त्या ठेवल्या अन पेटवल्या.

“ भारी वाटतंय यार हे. हॅम्लेटच्या बापाच्या भूताला बोलवू चल.”
दिशा मिश्किल हसत म्हणाली

“तुला गंमत वाटतीये का ही.”

“नाही बाबा आपण तर एकदम सिरीयस आहे.” दिशा तोंडाचा चंबु करत म्हणाली. पुजाने तिकडे दुर्लक्ष केलं. अजून बरचसं सामान मांडून तिने विधिवत सगळी तयारी पूर्ण केली. टेबलाच्या दोन्ही बाजूंनी दोन खुर्च्या मांडल्या.

“झालं सगळं. बैस इथे.” पुजा एका खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाली.

“मी कशाला, तू बोलाव न.”

“मग मंत्र कोण म्हणणार ? मला तुझी मदत लागेल. जवळपास जर एखादं भूत फिरत असेल तर त्याचं आपण आवाहन करू, बैस पटकन.”

“आणि बाटलीतही बंद करून ठेवू, ते पछाडलेला मुव्हीसारखं. मजा येईल.”
दिशा खुर्चीवर बसत म्हणाली.

“ आता या गोळ्याच्या वर हवेत तळहात धर, अहं टेकवू नकोस. अर्धा फूट वर, ह बरोबर.”

पुजा तोंडाने मंत्र पुटपुटत तिच्याजवळ आली. ते अगम्य भाषेतले मंत्र वातावरणात घुमू लागले. दिशाच्या पाठीमागे येऊन तिने तिचं मनगट हातात पकडलं अन काही लक्षात येण्याच्या आतच दुसऱ्या हातातल्या चाकूने सपकन तिच्या तळहाताला चिरा दिला.
दिशा वेदनेने कळवळली. पण पुजाने तिच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तिचा मंत्र म्हणण्याचा आवाज वाढला होता, टिपेला पोहोचला होता.
आता तो गुढगोल हिरवट प्रकाशाने चमकू लागला, त्यावर सांडलेलं रक्त गायब झालं होतं. प्रकाश वाढला, वाढत गेला, मेणबत्त्यांच्या ज्योती हेलकावे घेऊ लागल्या अन काही क्षणांतच गपकन विझल्या. त्याचबरोबर पुजाच्या तोंडून बाहेर पडणारा मंत्रोच्चारही थांबला. सगळीकडे फक्त रहस्यमयी हिरवट प्रकाश होता, तरीही आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं. दिशाची मिश्किल हसणारी मुद्रा आता भीतीने काळवंडू लागली होती.

“दिशा S” काळजावर चरे उमटवणारा आवाज कानांवर पडला.

“क…कोण?”

काहीच उत्तर नाही

“दिशाSS “ यावेळचा आवाज जवळून आलेला

“क…कोण आहेस तू ?”

“आत्मा.” कुणीतरी कानात बोलतंय इतक्या जवळून ऐकू आलेला तो बर्फगार आवाज.

दिशाने चारिबाजूंने गरगर मान फिरवली पण कुणीच नव्हतं. पुजा डोळे मिटून बसलेली होती.

“तुझा मृत्यू कसा झाला ?” स्वतःला सावरत तिने खंबीर आवाजात विचारलं.

“कार अॅक्सीडेंट.”

“पुजा S हा जर प्रॅक्टिकल जोक असेल तर बंद कर प्लीज."
पण पुजा मात्र काहीच उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हती.

कुणीतरी आपल्या अगदी जवळ आहे असा आभास दिशाला होऊ लागला
"निघून जा इथून.” ती ओरडली

काहीच प्रत्युत्तर नाही

“आय से गो टू द हेल.”

“घाबरू नकोस बाळा…. मी तुझी आई आहे.”

आत दिशा धाय मोकलून रडत होती अन बाहेर हातात टोपी अन मान खाली घातलेले इन्स्पेक्टर ‘तिला ही बातमी कशी सांगावी’ या विवंचनेत फसले होते.

-------------------------------------------

२. प्राणीसंग्रहालय (शशक )

“तो कशाचा पिंजरा आहे?” पाहुण्यांनी एका लोखंडी पिंजऱ्याकडे बोट दाखवत विचारलं.

“ती तर आमच्या प्राणिसंग्रहालयाची शान आहे. चला दाखवतो.”

सगळेजण पिंजऱ्याजवळ गेले.

“गेल्यावर्षीचं युद्ध जिंकल्यावर आम्ही तिथून या माकडांना पकडून आणलं होतं. फारच दुर्मिळ प्राणी आहे हा.”

“अरे वा! जवळ जाऊन बघतो.”

पाहुणे पिंजऱ्याजवळ गेले तळहातावर चणे घेऊन हात पुढे केला. लगेचच एका प्राण्याने त्यांचा हात आत ओढला. सगळेजण पुढे धावले अन पाहुण्यांची कशीबशी सुटका करून घेतली. पण ओरखड्यांमुळे हातांवर जखमा झाल्याच.
पाहुणे भयंकर चिडले.

“मॅनेजर कुठेय? चांगली अद्दल घडवतो या माकडांना.”

“नक्कीच. पण आधी आपण डॉक्टरकडे जाऊ.”

जाताजाता पाहुण्यांनी आपल्या सहा डोळ्यांनी बघितलं. पिंजऱ्याच्या पाटीवर लिहलेलं होतं- ‘मनुष्यप्राणी, पृथ्वी.’

------------------------------------------

३. पार्टी आणि ते दोघे

प्रमोशन झाल्याबद्दल निखिलने जंगी पार्टी ठेवली होती. सगळेजण आपल्या बायकामुलांसोबत ठेवणीतले पोशाख घालून आले होते. प्रत्येकाने उंची गिफ्ट्स आणले होते. आफ्टरऑल निखिल त्यांचा बॉस बनला होता. निखिल आणि त्याची बायको आलेल्यां पाहुण्यांचं अगत्याने स्वागत करत होते. कंपनीचे CEO आले अन पार्टीची शान वाढली. मंद संगीताच्या तालावर अन उंची मद्याच्या संगतीने अनौपचारिक गप्पा सुरू होत्या.
अन तेवढ्यात निखिलच्या पाच वर्षांच्या दोन जुळ्या मुलांनी हॉलमध्ये प्रवेश केला. ते दोघंही चक्क नागडे होते ! निखिल अन त्याच्या बायकोला मेल्याहून मेल्यासारखं झालं पण त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केलं.
ते दोघे आधी दबकत आले नंतर बिनधास्तपणे हिंडु लागले. नंतर जेवणाच्या टेबलांवर चढून तंगड्या वर करून नाचले, CEO च्या ढेरीवर बकाबक बुक्क्या मारल्या, नकली झाडांच्या कुंडीत भळाभळा मुतले. सर्वांनी बाहेर पडणारं हसू ओठांतच दाबलं. न राहवून शेवटी मुलांची आई त्यांना पकडायला धावली पण त्याआधीच त्यांनी हॉलबाहेर धूम ठोकली.

बाहेर पडता पडता एकजण दुसऱ्याला म्हणाला – “बघ म्हटलं नव्हतं, हे तेल लावल्यावर आपण अदृश्य होतो म्हणून.”

-----------------------------------------

कथाशब्दक्रीडाkathaaप्रकटनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

पहिल्या दोन्ही कथा मस्त !!! क्या बात है !!
तिसरी झेपली नाही

विनिता००२'s picture

8 Apr 2017 - 4:06 pm | विनिता००२

पहिल्या दोन आवडल्या.

जव्हेरगंज's picture

8 Apr 2017 - 6:28 pm | जव्हेरगंज

३. पार्टी आणि ते दोघे

=))

कानडाऊ योगेशु's picture

8 Apr 2017 - 9:20 pm | कानडाऊ योगेशु

कथुकल्या आवडल्या.
तिसरीही मस्तच आहे पण पहील्या दोन्हीच्या जातकुळीतली नसल्याने कदाचित थोडी आऊट ऑफ प्लेस वाटत असावी.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

8 Apr 2017 - 9:43 pm | अॅस्ट्रोनाट विनय

मुद्दाम वेगवेगळ्या (भिन्न/ टोकाच्या) कथा एकत्र केल्या आहेत. दोनतीन चवी एकत्र चाखायला मिळाव्या म्हणून :)

Ranapratap's picture

8 Apr 2017 - 10:18 pm | Ranapratap

तिसरी एकदम खतरनाक

बोका-ए-आझम's picture

8 Apr 2017 - 10:27 pm | बोका-ए-आझम

पहिल्या दोघांपेक्षाही तिसरी आवडली.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

9 Apr 2017 - 12:04 am | अॅस्ट्रोनाट विनय

:))

आषाढ_दर्द_गाणे's picture

10 Apr 2017 - 7:42 am | आषाढ_दर्द_गाणे

तिसरी वाचून हसलो फिस्कारून!
पहिलीचा जरा नेम चुकल्यागत वाटले...

५० फक्त's picture

10 Apr 2017 - 2:57 pm | ५० फक्त

पहिलीच भारी आहे...

तिसरीबद्दल म्हणाल तर हल्लीची पोरं आईबापाचं अनुकरण... असं काही ऐकलं होतं..
असो.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

10 Apr 2017 - 9:37 pm | अॅस्ट्रोनाट विनय

:))

प्राची अश्विनी's picture

10 Apr 2017 - 4:54 pm | प्राची अश्विनी

मस्त.

भृशुंडी's picture

11 Apr 2017 - 4:06 am | भृशुंडी

great! keep 'em coming.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

16 Apr 2017 - 1:02 am | अॅस्ट्रोनाट विनय

Thanks everybody

विचित्रा's picture

16 Apr 2017 - 8:58 am | विचित्रा

तिसरी जास्त आवडली.