साहित्यिक नामक जमात - कदाचित बहुसंख्येने - व्यवहारात म्हणजे प्रत्यक्ष जीवनात सुमारे कशी असते याचे प्रतिबिंबच "दरवर्षी" "वाजतगाजत" ( म्हणजे बोंबाबोंब करत ) साजरे होणा-या साहित्य संमेलनात दिसते !!! ते साहित्य संमेलन आले की काही तरी वादविवाद, हाणामारी, पेपरबाजी होणार हे अगदी ठरून गेलंय. म्हंजे एखाद्या साहित्यीकाविषयी काहीतरी भलते सलते लिहून आले की संमेलन आले असे ओळखावे इतके !! साहित्याव्यतिरिक्त अन्य संमेलनाच्या बाबतीत असे का नाही होत ? उदाहरण सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे घ्या. महोत्सवाला हजर न होणारांसाठी वा महोत्सवाच्या तारखा ध्यानात नसणा-या साठी त्याला महोत्सव वृत्तपत्रांतील सचित्र बातम्यांच्या माध्यामातुन दृष्टिस पडतो आणि एक चटका लाउन जातो, हे नक्की. "अशा स्वर्गीय आनंदात आपल्याला प्रत्यक्ष सहभागी होता येत नाहीय! काहीतरी भव्यदिव्य अनुभवायचं राहून जातंय आयष्यात. पण पुढल्या वर्षी आपण नक्की जाउच." असा वादा नक्की एखादा रसिक महोत्सव चुकल्यामुळे स्वत:शी करत असेल हे विधान नाकारता येत नाही इतका सुंदर होतो सोहळा, सालाबादप्रमाणे!
संमेलन आणि महोत्सव यामध्ये फरक असेल ना. पण मुद्दा साहित्य संमेलन आणि सवाई महोत्सव यातल्या तांत्रिक फरकांचा नाहीय. त्यामुळे त्यात कीस पाडत बसण्यात अर्थ नाही. मुद्दा रसिकांना या सोहळ्यातून मिळणा-या अनुभूतीचा आहे. साहित्य संमेलनाचे का नाही असे होत ? एखादे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायचे राहून गेले आणि आपण एका भव्यदिव्याला मुकलो अशी चुटपुट का नाही लागत ? बरं, तसे एखादे असामान्य व्याख्यान वा भाषण असेल ही, पण मुळात अशा एखाद्या भाषणाचा गंध पोचतच नाही, सामान्यजनांपर्यंत ! कारण त्या भाषणाच्या आजुबाजुला संमेलन सुरु होण्याच्या आधीची वर्ष सहा महिने चालणारी बोंबाबोंब आणि प्रत्यक्ष संमेलन सुरु झाल्यावर तिथे हार्डकोर साहित्यिक सोडून राजकारणी आणि धनिकांची दिसणारी फेटेबाजी यातुन या सर्वांच्या मानाने क्षीण किरकोळ कमकुवत असणारा अस्सल वाचक बिचारा पार दबून कुस्करून गेलेला असतो. त्या कुस्करून, गुदमरून जाण्याच्या अनुभवातून जाण्यापेक्षा साहित्य संमेलनाचा सोस नकोच असे वाटते.
एखाद्या वर्षी असा गोंधळ समजू शकतो, पण हे दरच वर्षी - अगदी सालाबाद प्रमाणे - कसे काय होते ? पडणारा उमेदवार जिंकलेल्या उमेदवाराचे भर पेपर मधून वाभाडे काढतो, चार चौघात! कशासाठी ? तर पडणा-याची अध्यक्ष बनण्याची संधी कोणत्या ना कोणत्या कारणांनी हुकली म्हणून ? आजतर एका पेपरात साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जिंकायचे कसे यावर मोठा लेख लिहून आलाय ! म्हंजे कोटा फॉर्मुला - आयआयटीवाल्यांसाठी असतो किंवा लातूर पद्धती दहावीच्या मार्कांसाठी असते तसे काहीसे !!! अरे काय चाल्लय काय ! या सगळ्यात भक्तिभावाने तुमचे साहित्य वाचणा-या आम्हा भीरु वाचकांचे काय ? आम्ही अहो तुमचे साहित्यवाचून तुमच्या विषयी तुमची भव्यदिव्य प्रतिमा आमच्या मनात उभी केली होती. पण प्रत्यक्षात बरेचजण कुडमुडेच असतात. एका अत्यंत महान लेखकाची अतिमहान सेक्युलर अशी प्रतिमा आहे. त्यामुळे सेक्युलर प्रथेप्रमाणे ब्राह्मणाना जोडे मारण्याचे काम या महोदयांना करावे लागते. एका वैयक्तिक बैठकीत त्यांनी कुळकर्णी नामक इसमासाठी जोडे काढले. एका मित्राने त्यांना ते कुळकर्णी ब्राह्मण नाहीत हे सांगितल्यावर लेखक महोदय प्रचंड ओशाळले. आणि नंतर परत परत खाजगीत - उतरेतोवर - "तो कुळकर्ण्या खरच ब्राह्मण नाही?" असे धडधडीत विचारत होते. एका लेखकाची प्रतिक्रिया फार भारी होती त्याला खाजगी भानगडी बद्दल छेडल्यावर : "आमचे पुस्तक वाचा हो , ती आमची प्रतिभा आहे. तो मी आहे. आमच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसू नका." अशी तंबी दिली. अहो, पण असे नाही चालणार आम्हा वाचकांना, सहन नाही होत ते. "गुळ खाउ नको असा उपदेश देण्याचा मला नैतिक अधिकार नव्हता कारण मलाच मुळात गुळ खायची सवय आहे. त्यामुळे आधी मी माझी सवय बंद केली आणि मग तुझ्या मुलाला मी अधिकारवाणीने गुळ खाऊ नको असे सांगितले, त्यामुळे मी उपदेश करायला थोडा वेळ घेतला " असे नैतिकतेचे अधिष्ठान असलेल्या महान संत साहित्यिकांच्या ओव्या अभंग आणि लिखाणांनी आम्हाला आम्ही वाढताना आमच्यावर संस्कार केले आहेत. आम्हाला समजायला लागले त्यावयात आमच्या आईबापानी घरी आणि शाळेत गुरुजींनी अशाच नैतिकतेचे अधिष्ठान असणा-या संताची वा सावरकरांसारख्या धगधगत्या अग्नीकुंडाची वा बापुजींसारख्या स्वत:वर सत्याचे खडतर प्रयोग करणा-या महंतांची साहित्यिक म्हणून सुरुवातीला ओळख करून दिली आहे. त्यामुळे आम्हाला साहित्याकडे त्याच संदर्भ चौकटीतून बघायची सवय आहे. या अशा पार्श्वभूमीवर तुम्हीजर वैयक्तिक आयुष्यातली तुमची धुळवड आम्ही डोळेझाक करावी असे म्हणत असाल तर तसे नाही ना हो होत !!
"शब्दामध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती, स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द I " हे सांगितलंय तुकोबांनी आणि त्यांचे साहित्य आमच्या जगण्याचा श्वास बनलाय. " कोणाचेही वर्म, व्यंग आणि बिंग, जात पात धर्म, काढूच नये I" असे सांगणारे साहित्य आम्ही वाचलंय. पण इथे तर साहित्यिकांचे नेतृत्व जित्या जागत्याची प्रेतयात्राच काढू म्हणते आहे ! "घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द, बोलण्या पूर्वी I" - असे म्हणाले होते ते जगदगुरू साहित्यिक पण इथे तर साहित्यिक आणि त्यांचे नेतृत्व रोज सकाळी दंतमंजन झाल्यावर जिव्हेवर ग्रीसचा लेप लाऊनच बाहेर पडताहेत !!
सर्वधर्मसमभावाचा जोरजोरात नगारा वाजवणारे संमेलनाचे अध्यक्ष रेडीओवर एका कवीचा संदर्भ देताना सतत "मुस्लिम" कवी असा उल्लेख करत होते ! भेद भिनला असेल रक्तात तर ओठात सहजपणे समानता येणार कशी यांच्या ? सगळ्या ठिकाणी नाटक करता येत नाही ना! अरे साहित्यीकांनो, तुमच्या लिखाणातून दिसणारी संवेदना वैयक्तिक तुमच्या आयुष्यात, वागण्याबोलण्यात दिसतच नाही ! त्यामुळे तुमचे साहित्यही तुमच्या संवेदनशील मनाची अनुभूती नसते, तर बाजारात विकण्यासाठी बनवलेले प्रॉडक्ट असते - हे आम्हा येड्या वाचकांना आता कळायला पाहिजे. तुमचे पाय प्रत्यक्ष मातीचेच असतात हे तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाचे वा पुढा-याचे बटिक होताना आम्हाला दिसता त्यावेळी आमच्या ध्यानात यायला पाहिजे. गुळ खाण्याची सवय जाऊ द्या ! रानावनावर फुले पक्षांवरल्या ज्यांच्या कविता वाचून आम्ही निसर्ग शरण गेलो त्या "महाथोर" कवीला बारामतीच्या ढेपेला घट्ट चिकटलेला बघितल्यावर निसर्गावरचे त्याचे भाष्य अनैसर्गिक वाटायला लागले. पक्षांशी पार्टी करणा-या बुजगावण्याच्या कळपातल्या कवीचा स्वर कसे काय आमच्या हृदयाचा ठाव घेईल ? कशाला पाहिजे अशांच्या साहित्याचा सोहळा ? कशाला पाहिजे तुमचे संमेलन ? असे काय देणार आहात तुम्ही त्यातून आम्हाला ? द्यायचे जाऊ द्या आधी तुम्ही स्वत: संवेदनशील माणूस असल्याची पावती तरी देणार का आम्हा भीरु वाचकांना ? तुमच्या साहित्यात तुमच्या संवेदनाशील विचारांचे, स्वानुभवाचे प्रतिबिंब आहे याची खात्री आम्हाला पटवणार का ? "जीभेवारी ताबा, सर्वांसुखदाता, पाणी वाणी नाणी, नासु नये I" एवढी माफक अपेक्षा केलीय रे माझ्या माउलीने, त्याला उतरणार का प्लीज ?
सुधीर मुतालीक
प्रतिक्रिया
17 Jan 2016 - 11:08 pm | पीके
जाउध्या हो.. एव्हडे नका मनाला लाउन घेउ.. त्याना मॉर्निंग्ग वोक ला जाण्याचा सला द्य्हा
18 Jan 2016 - 1:45 am | गामा पैलवान
सुधीर मुतालीक,
तुम्ही अगदी पोटतिडीकेनं लिहिलंय. म्हणूनच सवाई गंधर्व महोत्सव आणि साहित्य संमेलनातला मला आकळलेला फरक सांगावासा वाटतो.
त्याचं असं आहे की सवाई गंधर्व महोत्सवात जे कलाकार असतात त्यांनी भारतीय संगीताच्या प्राचीन परंपरेत राहून कला जोपासलेली असते. मात्र साहित्य संमेलनातल्या व्यासपीठावरील लोकं साहित्याची व्याख्या विसरलेले आहेत. साहित्य ही संज्ञा स + हित या शब्दांतून उत्पन्न झालेली आहे. त्यात सर्वांचे सामायिक हित अभिप्रेत आहे. व्यासपीठावरचेच्या बहुतांश लोकांना सामायिक हित कशाशी खातात ते ठाऊक नाही. शिवाय भरीस भर म्हणून राजकारणी आणि त्यांचा गलिच्छ पैसा आहेच. त्यातून रसिकांना काय डोंबल्याचा अमृतानुभव येणारे?
आ.न.,
-गा.पै.
18 Jan 2016 - 2:24 am | आदूबाळ
याच्यापेक्षाही बेसिक फरक म्हणजे सवाई गंधर्व महोत्सव खाजगी ट्रस्ट आयोजित करतो, प्रायोजक मिळवतो, एकही सरकारी पैसा घेत नाही. इतकंच कशाला - थोर्भारतीयसांगीतिकप्रपंरेलाजोपासण्यासाठी दहा वाजता लाऊडस्पीकर बंदचा नियम बारापर्यंत ताणावा यासाठी पुणे मनपाच्या नाकदोऱ्याही काढत नाही.
साहित्य संमेलनाचा ग्यासच सरकारी अनुदानावर पेटतो. त्यामुळे त्या बापाचे उतराई व्हायची जबाबदारी आपोआप येते.
18 Jan 2016 - 5:57 am | DEADPOOL
अहो व्यासपिठावर साहित्यिक कमी आणि राजकारणीच जास्त होते.
18 Jan 2016 - 6:45 am | उनाड
इतर अनेक साहित्य सम्मेलने ( सावरकर, कोकण, विद्रोही, मुस्लिम ) होतात. तिथे अध्यक्षपदासाठी मारामारी होत नाही. हे मोठे संमेलन गेली काही वर्षे चमको गिरी करण्यासाठीच भरत आहे. ज्यांच्या साहित्याबद्दल आदर वाटाव असे साहित्यिकही वय विसरून निवडणूकिलउह्ब्भे रहातात, गावोगाव मते मागत हिंडतात, जाणत्या राजाल साकडे घालतात, हरले कि रुसून बसतात.
18 Jan 2016 - 7:52 am | कंजूस
खरं आहे.
आमच्या डोंबिवलीत रोटरीने भरवलेले सासं ला तिन्ही दिवस होतो.अंधकवी संमेलनही वेगळे ठेवले होते.
18 Jan 2016 - 8:01 am | उनाड
साहित्य संमेलनाचे अध्यक्शपद दीड दिवसाच्या गणपती पेक्षाही कमी असते. पूर्वी निदान उद्घाटन समारंभात तरी अध्यक्षांची शान असायची. आता उद्घटनालाही डझनभर नेते असल्याने अध्यक्ष कुठेतरी कोपच्यात असतात. तरीही अध्यक्ष होण्यासाठी केविलवाणी धडपड.
18 Jan 2016 - 1:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपलं भांडन लेखकाशी आहे की त्याच्या जिल्बीशी ?
आपण ना.धो.महानोरांच काय काय वाचलं आहे ?
-दिलीप बिरुटे
18 Jan 2016 - 1:30 pm | गामा पैलवान
प्राडॉ,
सहमत आहे.
त्याचं काय असतं की एखाद्या साहित्यिकाच्या कलाकृती वाचून वाचकाच्या जाणीव प्रगल्भ झालेल्या असतात. त्यामुळे काही रसिकांना तो साहित्यिक जीवनाच्या सगळ्या अंगांत परिपूर्ण असेलसं वाटू लागतं. पण प्रत्यक्षात हे खरं असेलंच असं नाही. ज्यांना महाराष्ट्राचं भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून गौरवलं गेलं होतं ते पु.ल.देशपांडे खाजगी आयुष्यात सर्वसामान्यासारखेच होते. सुनीताबाईंच्या 'आहे मनोहर तरी' पुस्तकात बरंच वर्णन आलं आहे. त्यामुळे लेखक आणि कलाकृती वेगवेगळ्या मापाने मोजावेत.
आ.न.,
-गा.पै.
19 Jan 2016 - 3:42 pm | नया है वह
.
लेखक(माणुस) मोजायचा असेल तर त्याचे आत्मचरित्र वाचावे. त्यातुनही त्याचे सर्व पैलु समजतीलच असे नाही.
19 Jan 2016 - 7:22 am | सुधीर मुतालीक
अगदी असंबंध्द प्रश्न आहे, पण ठिके. महानोर जेवढे अस्तित्वात आहेत तेवढे वाचलेत, सर !!!पण म्हणुन मग पुढे काय ? मी ही एक प्रश्न विचारतो ! लष्कर-इ-तय्यबाच्या सामाजिक योगदानाविषयी काही माहिती आहे आपणास ?
19 Jan 2016 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> अगदी असंबंध्द प्रश्न आहे.
अजिबात नाही. माझं म्हणनं मग तुम्हाला कळलं नाही. गामा पैलवान यांनी माझ्या प्रतिसादाचा विस्तार केला आहे. लेखक एक माणूस आहे त्यालाही सामान्य माणसाचे षडरीपुनी ग्रासलं आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे आणि त्याने केलेल्या लेखनावर आपण सॉरी मी एक वाचक म्हणून प्रेम करतो. उदा.
'तिच्या स्वप्नात सतरावी लेणी
पहाडाएवढा गौतम बुद्ध
जगाचं दु:ख कमी करायला निघालेला.
शांत करुण डोळ्यांचा.
शुभ्रलांब अंगरख्यातला
भिक्षापात्र घेऊन त्याच्याच दाराशी
बारा वर्षांनी.
त्याची बायको यशोधरा दारात उभी
मुलगा भिक्षा वाढणारा
ती कारुण्यमयी भीतिग्रस्त.
मनानं मोडलेली. बाळाला सावरते.
कित्येक वर्षांनी नवर्याला साक्षात सामोरा बघावं
भिक्षापात्र घेऊन.
पुन्हा त्याच वाटेनं त्याच दारात
महात्मा गौतम बुद्ध करुण डोळ्यांचा''
(पृ. ६४. अजिठा, ना.धो.महानोर मधुन साभार)
ना.धो.महानोर यांच्या वरील चित्रबद्ध ओळी वाचतांना माझ्या डोळ्यासमोर लेणी आणि चित्र येतं.
मा.श्री. शरदपवार आणि त्यांचे संबंध येत नाहीत. काय म्हणता ?
-दिलीप बिरुटे
19 Jan 2016 - 10:45 am | प्रचेतस
१७ व्या क्रमांकाच्या लेण्यातील गौतम बुद्ध, यशोधरा आणि राहुलचे चित्र करुणरसाने ओतप्रोत भरलेले आहे. सिंपली फ़्याण्टास्टिक.
19 Jan 2016 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> लष्कर-इ-तय्यबाच्या सामाजिक योगदानाविषयी काही माहिती आहे आपणास ?
नाही. लस्कर ये तैय्यबा ही एक दहशतवादी संघाटना आहे त्या संघटनेचं सामाजिक योगदान कशाप्रकारचं आहे हे अजिबात माहिती नाही.
आपण सांगितलं तर माझ्याबरोबर अनेकांचं सामान्य ज्ञान वाढेल.
-दिलीप बिरुटे
19 Jan 2016 - 4:13 pm | सस्नेह
बाकी, साहित्य आणि साहित्यिक एकरस असलेले फारच कमी पाहिले आहेत.
...साहित्याशी एकनिष्ठ पाडगावकर एखादाच असतो. आणि तो संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राजकारणे करीत नाही.