चहावाल्याचे पंख.....
काय करतो? ......... चहा विकतो.
किती वर्षे झाली?........ चाळीसेक.
वय?...... साठीपार.
कर्ज?...... बरेच. कायमचे फेडतोय.
कशासाठी काढलेय?........ फिरण्यासाठी आणि shortfilm बनविण्यासाठी.
चौकोनी आयुष्य जगणाऱ्या मानसिकतेला अज्जिबात न पेलवणारा हा परिचय आहे श्री. हरि एम. मोहनन आणि त्यांची पत्नी मोहना यांचा!
केरळातल्या एर्नाकुलम् येथे गेली चाळीसेक वर्षे चहाचे दुकान चालविणाऱ्या या दाम्पत्याचे भटकंतीचे वेड कुणालाही आश्चर्य चकित करते. हातात पैसे असूनही कधीही आपल्या गावाशहराची वेस न ओलांडणारे लोक आहेतच! पण पैपै जमा करून केवळ, देशातच नव्हे, तर देशोदेशी भटकंती करणाऱ्या या जोडप्याचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे.
आजपर्यंत त्यांनी सुमारे सतरा देशांत भटकंती केली. त्यांत ईजिप्त, जोर्डन (Jordan ) सारखें मध्य पूर्वेतील, तर सिंगापूर, मलेशिया सारखे अतिपूर्वेकडील, युरोपातील सदैव हिटलिस्ट वर असणारे इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, तर पार पलीकडे असणाऱ्या अमेरिकेचीही सफर त्यांनी केली.
पैशाची जुळवाजुळव हा महत्वाचा मुद्दा! पण ते सांगतात, ‘पैसा लागतोच! पण त्याहून जास्त महत्वाचे एक भटके, स्वच्छंद मन पाहिजे, मग कुठलेही ठिकाण दूर वाटत नाही!’
दररोज तीनेकशे रुपयांची बचत करूनही पैशांची तजवीज होत नव्हतीच. मग त्यांनी वेळोवेळी कर्ज काढले. फिरून आलं, कि दोनतीन वर्षे चहा विकून ते कर्ज फेडायचं. परत पुढचं destination, पुढचा देश, परत कर्ज, परत कष्ट, परत कर्जफेड हे चक्र! पण त्याचा त्यांना बोजा वाटत नाही. कारण भटकंतीतून मिळणारा आनंद, समाधान त्यापेक्षा कितीतरी जास्त! जगण्याचे बळ फिरतीतून मिळवणाऱ्या या जोडीला, उतारवयात कुटुंबीय, मित्रमंडळींकडून शहाणपणाचे, बचतीचे, कर्ज न काढण्याचे अनेक सल्लेही मिळालेत. पण या सगळ्याला मागे टाकून त्यांचा पुढचा प्रवास चालूच आहे.
आपला हा प्रवास अनेकानेक लोकांपर्यंत पोहचावा म्हणून या चिवट माणसाने एक shortfilm काढायचे ठरवले. अनेक नामांकित हस्तीपुढे प्रस्ताव ठेवला, पण प्रत्येकाने दहा मिनिटांची फिल्म तीन-चार मिनिटांची करा, असा सल्ला दिला. आता हातात पैसा नसताना, कुणाही सरळमार्गी माणसाने हा सल्ला ऐकला असता. पण मोहनन यांना ते काही पटले नाही.
मग या माणसाने Copybook Films ही अशीच एक छोटीशी फिल्मसंस्था गाठून, स्वतःच दहाएक मिनिटांची Invisible Wings नावाची फिल्म अपार कष्टाने तयार केली. आणि मागील महिन्यात म्हणजेच १५ ऑक्टोबर, अब्दुल कलामांच्या जन्मदिनी रिलीज केली. ...... हा हा म्हणता नेटच्या जगतात ही फिल्म वाऱ्यासारखी पसरली... पसरत आहे.यातून कित्येक लोक प्रेरणा घेताहेत. पण त्यामुळे त्यांचे कर्ज काही फिटत नाही. तरीही त्यांची जिद्द अपरंपार आहे. ही फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी, कळावी म्हणून ते ती निरनिराळ्या भाषांमध्ये डब करायच्या तयारीत आहेत. आणि हो, २०२० मध्ये आर्जेन्टिनाची सफर करायचा प्लानही तयार आहेच.
जगण्याच्या धकाधकीत आपली स्वप्नं कधी विरून गेली कळतही नाही. असुरक्षिततेची भावना, भविष्याची चिंता आपल्याला सतत करकचून बांधून ठेवते. पण अशी माणसे आपल्या स्वप्नांसाठी सगळ्या परीस्थितीवर मात करत हसतमुखाने समोर येतात, तेव्हा आपली स्वप्ने किमान उचकटून तरी बघण्याची इच्छा निर्माण होते. मोहनन यांचे शब्द ‘It’s possible! It’s possible! It’s possible!’ , पुन्हा जगण्याचे, स्वप्नांचे नकाशे हातात घ्यायला भाग पाडतात.
सामान्य माणसातील जिद्द, संघर्ष, आणि भटकंतीच्या या वेडाला सलाम!
या विषयीच्या अनेक पोस्ट्स सोशल मिडीया वर आहेतच. फिल्मचा धागा....
https://www.youtube.com/watch?v=GdDl_YFfhwc
प्रतिक्रिया
19 Nov 2015 - 9:28 pm | मांत्रिक
वा! ताई अगदी वेगळाच विषय मांडलात. अगदी अवलिया कुटुंब आहे खरेच. ग्रेट अवलिया!!! नमस्कार त्यांना!!!
19 Nov 2015 - 9:39 pm | ट्रेड मार्क
पूर्वी कधीतरी एकदा या जोडप्याबद्दल वाचलं होतं, पण आज जरा जास्त माहिती मिळाली. सवडीने तुनळी वरची फिल्म पण बघीन.
खरंच आपण सगळे किती साचेबद्ध आयुष्य जगतो. स्वप्नं तर सगळेच बघतात परंतु ती पूर्ण करण्यासाठी केलेल्या कष्टाला सलाम!
20 Nov 2015 - 9:29 am | खेडूत
+१
कुठे वाचलंय आठवत नाही. पण प्रेरणादायी.
लेख आवडला.
19 Nov 2015 - 9:45 pm | रेवती
माहिती आवडली.
19 Nov 2015 - 11:09 pm | पद्मावति
वाह, मस्तं लेख. या जगावेगळ्या, मस्तं मौला जोडप्याची फारच सुंदर ओळख.
लेख खूप आवडला.
19 Nov 2015 - 11:27 pm | मुक्त विहारि
माहितीबद्दल धन्यवाद....
19 Nov 2015 - 11:40 pm | भाऊंचे भाऊ
अस्सं कस्सं वागतात लोकं ? आँ ?
19 Nov 2015 - 11:43 pm | पगला गजोधर
भारतातल्या चाहवाल्यांना विदेशदौरे आवडतात, आणि काहीही झालं तरी ते आपली हौस पूर्ण करतात.
20 Nov 2015 - 10:58 am | sagarpdy
+१
20 Nov 2015 - 12:19 am | रातराणी
मस्त!
20 Nov 2015 - 12:50 am | रुपी
छान माहिती!
20 Nov 2015 - 5:00 am | सानिकास्वप्निल
लेख आवडला.
20 Nov 2015 - 7:00 am | मितान
व्वा! त्या अवलिया जोडप्याचं खूप कौतुक न हेवा वाटतोय !
20 Nov 2015 - 7:57 am | इडली डोसा
यांच्यावर हिंदुमधे एक लेख वाचल्याचं आठवतये.
शिवाय परदेशातही अशी बरीच उदाहरणं दिसतात. हे कुटुंब बघा, बायको जर्नलिस्ट, नवरा फोटोग्राफर आणि दोन लहानग्या मुलींसोबत कसे बिनधास्त फिरतायेत. किती धाडस लागतं अश्या गोष्टी करायला. खरचं स्वप्नवत आहे यांच आयुष्य.
20 Nov 2015 - 10:03 am | शिव कन्या
इडो ,वाचला लेख. सुंदर आहे लहानग्यांची भटकंती पण.
20 Nov 2015 - 8:12 am | कैलासवासी सोन्याबापु
एकच नंबर!!!
20 Nov 2015 - 8:32 am | अमृत
हेही जरूर वाचा. आपल्या अमरावतीचे श्री लक्षमण राव जे दिल्लीला एक चहाचे दुकान चालवितात व त्यांनी २०पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत.
http://www.firstpost.com/living/new-delhis-famous-tea-seller-meet-laxman...
http://www.ndtv.com/delhi-news/meet-laxman-rao-tea-seller-novelist-and-s...
20 Nov 2015 - 10:05 am | शिव कन्या
अमृत, शेअरींग बद्दल धन्यवाद.
खरोखर प्रेरणादायी!
20 Nov 2015 - 9:50 am | अजया
काय विलक्षण जोडपं आहे.हिंडणभूल पडलेलं.आवडला लेख.
20 Nov 2015 - 10:06 am | शिव कन्या
अजया, हिंडणभूल भारीय.:):)
20 Nov 2015 - 1:07 pm | मार्गी
वा! अत्यंत प्रेरणादायी! धन्यवाद!! :)
20 Nov 2015 - 5:39 pm | बोका-ए-आझम
प्रेरणादायी!
20 Nov 2015 - 5:53 pm | मधुरा देशपांडे
+१
20 Nov 2015 - 7:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त लेख ! एखादं वेड माणसाच्या डोक्यात असायला पाहिजेच... पण आपले वेड प्रत्यक्षात आणण्यासाठी पाहिजे ती खटपट करायची चिकाटी जास्त महत्वाची !
भटक्या जोडगोळीला __/\__ आणि पुढच्या अनेक भटकंतींसाठी शुभेच्छा !
21 Nov 2015 - 9:59 pm | अभिजीत अवलिया
मस्त लेख ...
22 Nov 2015 - 1:43 pm | मयुरMK
हौसेपोटी कोण काय करेल सांगता येत नाही. लेख आवडला
पण मला पण भटकायला आवडते पण . मोकळा तरी मुक्त मी . हा ही ओळ चपखल बसते .
22 Nov 2015 - 1:45 pm | मयुरMK
मोकळा तरी ना मुक्त मी आस म्हनायच आहे
22 Nov 2015 - 1:58 pm | चाणक्य
भारीये.
22 Nov 2015 - 2:25 pm | मारवा
धागा फार आवडला
पॅशन इज ऑल
पुन्हा प्रत्यय आला.
22 Nov 2015 - 4:06 pm | पैसा
आणि साध्या साध्या अडचणींचा बाऊ करणारे आपण!
22 Nov 2015 - 5:09 pm | विशाल कुलकर्णी
त्रिवार मुजरा या दंपतीला...
माहीतीसाठी धन्यवाद _/\_