कर्वेनगरात
जून २०१० मध्ये कॉलेज संपल्यावर नोकरीसाठी (डोळ्यांत ऐटदार (किंवा आयटीदार) स्वप्नं वगैरे घेऊन इतरांसारखा) पुण्यात दाखल झालो. यापूर्वी पुणे एकदोनदाच पाहिलेलं आणि पुण्यात कोणी पाहुणे नसल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे तिथे राहायचा योग कधीच आला नव्हता. हरखलेलो एकदम.
बस आता १२-१३ मजल्याची एक काचेची इमारत आणि संपूर्ण वातानुकुलीत असलेल्या एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत ५.३, ३.७ किंवा अगदीच नाही तर २.८ वगैरे पॅकेजचा जॉब मिळवून मस्त सेटल व्हायचे मांडे खात होतोच मनात.