स्मृतीची पाने चाळताना: एक
शाळेत, वर्गात, गावात कुठेही असला तरी अरमान कधी चिडला, रागावला असं अपवादानेच घडलं असेल. वर्गात भिंतीकडील रांगेत कोपऱ्यातला शेवटचा बाक याची बसायची नेहमीची जागा. ही याची शाळेतील स्वयंघोषित जागीर. येथे बसलो म्हणजे मास्तरांचं लक्षच नसतं आपल्याकडे, हे याचं स्वनिर्मित तत्वज्ञान. शाळा आणि याच्या पत्रिकेतील गुण कधी जुळले नाहीत. अम्मी-अब्बा जबरदस्तीने येथे पाठवतात, म्हणून त्यांच्या समाधानासाठी हा येथे येणारा. शारीरिक शिक्षणाचा एक तास वगळला, तर सगळे विषय एकजात याच्या शत्रूयादीत येऊन स्थानापन्न झालेले. मराठीच्या तासाला अहिराणीत एखादा पाठ का नसावा? या प्रश्नाचं याला सतत कोडं पडलेलं असायचं.