रोजरोज ईज्जतिचा भाजीपाला न होऊ देता, घरमालकाकडे आंघोळीले, त्याच्या घरातून बाथरूम मदे जाण, हे काई आता जमत नॊत. त्यातल्या त्यात आमी तिघेही पयल्यान्दाच घरा बाहेर राहायले आलो होतो. मग अशात काहीतरी फालतू गोष्टी वरून, वाद होणार नाई त मंग ती दोस्ती कायची? नेहमी अनोळखी लोकांपेक्षा जे आपल्याले लय लाड करतात, जाच्यावर आपला हक्क आहे अस वाटते, अन मंग जर त्याने आपली मर्जी राखली नाई, त दुःख होऊन, राग याले लागतो, त्यातूनच भांडण होतात. अशाच कुठल्यातरी फालतू कारणामुळे, मी दुसऱ्या कुठल्यातरी मित्रांसोबत रूम शिफ्ट केली.
मनीष अन राहुल्याले, मनश्याच्या वडिलांच्या ओळखीच्या काकांन, राहायला रूम दिला. तरी दोस्ती लय वंगाळ असते, आज कट्टी तर उदया बट्टी. "ये दोस्ती हं नही छोडेंगे, छोडेंगे, दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे" आमची अजून दोस्ती झाली.
तिघेही एकदा, रात्री ९ ते १२ चा पिच्चर पाहाले गेलो, वापस याले कमीतकमी बारा, साडेबारा झाले असणं. राहुल्या अन मन्या, गप्पा मारत मले माया रूमवर सोडाले आले होते. माया रूम हा पहिल्या माळावर. अन माया रूम पार्टनर पप्प्या अन नित्या दोघेही अमरावतीचेच, पण प्रोडक्शन इंजिनीरिंग ब्रँचचे . घरमालकांन व्हरांडयाच्या गेटले, बारावाजता कुलूप लावल होत अन त्याची चाबी व्हरांडयातच सुमडीत ठेवली होती.
मी गेट बाहेरूनच "पप्प्या ,पप्प्या, नित्या, नित्या" जोरजोरान हाका मारल्या. पण उन्हाळ्याच्या दिवसात आमच्या विदर्भात आधीच मोठ मोठे एक्झॉस्ट कुलर लावाचे, त्यात आमचा रूम पहिल्या माळ्यावर. माया, राहुल्या, मनश्या कोणाचाई आवाज रूमपर्यत पोहोचत नोता. अन पोहचला जरी असन, तरी हे दोघ ढोरा वाणी झोपले असणं. आता इलाज नव्हता, काईतरी जांगडबुत्ता लावाचा होता. हम्म... अकलेच्या बाबतीत, इचारूच नका, आमच्यासारखे विद्वान पंडित, त दिवा घेऊन शोधल, तरी जगात कुठच दिसणार नाई. म्या कंपाऊंडवॉलवरून आत उडी मारली. राहुल्या अन मनश्या बाहेरच उभे होते. व्हरांडयाच्या वर जिना चढाले, आतून पायऱ्या होत्या. अन तेथेच, एक छोटी खडकी होती, जी मले पहिल्या मजल्याच्या आत एन्ट्री देणार होती. ही खिडकी जमिनीपासून कमीतकमी पंधराफुटावर तरी असणं. अन मले आता तिथं पोचाच होत.
रात्रिच्या अंधारात, रस्त्यावर ट्यूब लाईटच्या मंद प्रकाशात, मी त्या खिडकीपर्यंत कस पोहचाच, याचा विचार करू लागलो. अचानक, माया लक्षात आल, की त्या भिंतीले, चोकोनी नक्षी होती. मधात एकदोन ईंच खोल, अशा खाचा होत्या. बस आता कोंढाणा काबीज कारले, एवढ्या खाचा, माया सारख्या मावळ्यासाठी, लय होत्या. पायातली चप्पल तेथेच काढून, मंग मी गड, म्हणजेच भिंत चढू लागलो. एक आठ दहा फूट चढलो असणं, त रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या, असलेल्या एक घरातील, एका माणसानं त्याच्या हॉलची खडकी उघडली. "अबे, हे भामटे चोर त नसणं" अश्या नजरेनं तो आमा तिघांले पाहत होता. मायतल्या मावळ्याले, आता भीती वाटू लागली. काय दिमाग लावला रे अन हे "अचाट शक्तीचे ,गचाट प्रयोग करायची आयडिया देली रे देवा." असे, मले वाटू लागले. या आधी, की तो माणूस आरडाओरडा करीन, नायत पोलिसांले फोन मारिन, मी ज्या स्थितीत होतो तेथूनच ओरडलो.
"अहो काका, चाबी नाई हो, अन मित्र झोपले आहे, आवाज जात नाई, म्हुणुन असा चडून रायलो. मी इथेच रायते. काका प्लिज विश्वास ठेवा."
लगेच राहूल अन मन्या न पण
"हो काका, हा इथेच राहतो, आमी दोघे त्याचे मित्र, त्याले रूमवर सोडाले आलो आहे." मित्रांनीं या संकट समयी, मले एकट टाकून पळ काढला नोता, हीच खरी दोस्तीची ओळख. त्या माणसाले आमच बोलण कदाचित पटल, अन त्यान काही न बोलता खिडकी बंद केली. परत दुसरी काही आफत याच्याआधी, मी झपाझप वर चढलो, अन खिडकीतून आत आलो. खाली परत येऊन चाबीन गेट उगडून, चप्पल घातली. दोघांही दोस्त्याले बाय सांगत त्याचा निरोप घेतला. काम फत्ते झाल होत अन हा कोंढाणा पण, काबीज झाला होता.
मित्रानो, या लोकडाऊन टाईमत आमच्या अमरावती ग्रुप मदे, मी राहुल्याचा म्यासेज पायला, अन मंग आज नकळत त्याले, वन टू वन मेसेजे टाकला. त्यान पण एका मिनटात रिप्लाय दिला, "अरे कसा आहे? काय म्हणतो?" अन मनीषची आठवण काढली. आज वीस, बावीस वर्षांनंतर, आम्ही परत एकदा वॉटस अँपच्या एका नवीन ग्रुपच्या मधून एकत्र आलॊ. परत आमच्या अकोल्यातल्या त्या अतरंगी आठवणीं ताज्या झाल्या. किती टाईमपास ते दिवस, अन एक एक इरसाल नमुने, अन प्रसंग.
माये मित्र, मस्त मस्त वॉट्सअप पोस्ट पाठवतात. मायाकडे त काहीच नाई, पण मंग, ह्याच आठवणी शेअर केल्या त कस? आमी कशे नमुने होतो हे आमच्यापोट्याना, आत्ताच्या मित्राले, ऐकाले किती मजा ईन? त मित्रांनो अशेच काही इंजिनरींगचे दिवस, मी तुमच्या माध्यमातून का होईना पण अजून एकदा जगलो, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. अन तुमाले पण लोकडाऊन मदे काई तरी मजेदार वाचाले , नाई त ऐकाले भेटलं अशी आशा करतो. मले अजून कधी, दुसर काही सुचल, आठवल, त मी परत तुमच्या भेटीले, माई आठवणींची गाठोडी घेऊन, नक्की येईन. तो पर्यंत राम राम मंडली.
अरे बावा, एक्दम महत्वाचं, त सांगाचच रायल होत. मी काई लय हुशार नाई, हे त तुमाले आदी पासूनच माहीत असणं, अन आता समजलंई असणं. अजून मले काही पुस्तक वाचाचा, शोकई नाई पण
"समजदार व्यक्ती बरोबर घालवलेला टाईम, किंवा गप्पा, ह्या हजारो पुस्तक वाचन्यापेक्षा श्रेष्ठ आहे."
त मंग आपल्या जीवनाच्या प्रत्येक मार्गावर, आपल्याले काही मार्गदर्शक म्हणजेच, गुरु, कदाचीत सद् गुरु त लागतेच रे बा. अन मंग मले पण मायाच दोस्तच्या खजिन्यातल्या अशाच काई सद् गुरु, माया या लिखाणात, माये मार्गदर्शन केल. एकाने त त्याचा बिझी आयुश्यातुन, कित्येक क्षण माया अश्या पागलपणासाठी खर्ची खातलॆ. दुसऱ्या एकानं मले
"अरे तु मूळचा अमरावतीकर मंग ठेव तोच अंदाज अन लि भन्नाट." अशी कमालीची आयडिया दिली. बाकी मायापेक्षा वयाने लहान
"काय दादा, काय लिहीता" म्हणत मले चण्याच्या झाडावर चढवलं. या टायमात माया वाटयाला आलेली घरातली, आर्धाडझन काम म्या कदी कदी केली नाई, त माया पोरीनं अन होममिनिस्टर न पण, माय हे नवीन पागलपण सांभाळून घेतल. असे सगळे मोठे, समवयस्क, छोट्या गुरूंचा मी मनापासून आभारी आहे.
गुरु ब्रम्हा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा।।
गुरु साक्षात पर ब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नमः ।।
|| सूचना||
लॉकडाऊन कमी होत हाय, पण अजून सुरुच हाय, त मंग घरातच गुपचूप बसा रे बावा. तुमी पण तुमच्या आठवणींच्या गाठोडीतुन, मायासाठी अन तुमच्या दोस्तासाठी काई तरी आठवणीचा नजराणा पेश करा.
चांगल्या मित्रांची दोस्ती झाली असणं, तर अशी सांभाळा, की एक दिवस देवाले पण तुमच्याशी दोस्ती कराले आवडल. अन, ज्या दिवशीपासून, देवान तुमच्याशी दोस्ती केली, त्या दिवसानंतर तुमाले, स्वतःले पण, संभाळाची गरज रायणार नाई.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
16 Jun 2020 - 1:24 pm | प्राची अश्विनी
छान झाली सिरीज. अजून येऊद्या
16 Jun 2020 - 3:42 pm | श्रीकांतहरणे
धन्यवाद.
16 Jun 2020 - 7:54 pm | Nitin Palkar
मजा येतेय. लिहित रहा.
21 Jun 2020 - 10:14 am | श्रीकांतहरणे
धन्यवाद.